मुंबई (अक्षय मांडवकर) - रायगड जिल्ह्यामधील चिरगावातील बागेची वाडी हे गाव सध्या एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहे (raigad vulture). वाडीतील घरांच्या मागच्या परसातच तब्बल ५० ते ६० गिधाडांचा वावर असलेल्या या गावाने त्यांच्या संवर्धनासाठी डीजे आणि बॅन्जो पार्टीवर बंदी घातली आहे (raigad vulture). गिधाडांच्या घरट्यांना आणि त्यांच्या पिल्लांना मोठ्या आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय वन्यजीव संवर्धनातील एक आगळावेगळा आदर्श ठरत आहे. (raigad vulture)
महाराष्ट्रात गिधाडांच्या चार स्थानिक आणि तीन स्थलांतरित प्रजाती आढळतात. बागेच्या वाडीमध्ये प्रामुख्याने पांढऱ्या पाठीचे गिधाड आढळते. त्याचबरोबर लांब चोचीचे गिधाडही येथे विसाव्यासाठी येते. लांब चोचीची गिधाडे प्रामुख्याने कडेकपारी आणि खडकाळ भागात घरटी करतात. मात्र, पांढऱ्या पाठीची गिधाडे या गावाच्या परिसरातील मोठ्या झाडांवर घरटी बांधतात. गावालगतच्या सुमारे ४३ हेक्टर राखीव वनक्षेत्रातील आंबा, वावळ, बेहडा, अर्जुन, बिवळा, शेडाम आणि सातवीण यांसारख्या उंच झाडांवर गिधाडांची घरटी आढळतात. साधारण १३ ते २० मीटर उंचीवर ही घरटी असतात. ऑक्टोबर ते मार्च हा त्यांच्या विणीचा आणि प्रजननाचा महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र, गिधाडांसाठी हे गाव नेहमीच सुरक्षित नव्हते. सुमारे दोन दशकांपूर्वी या परिसरातील गिधाडांची संख्या आणि त्यांचा अधिवास वेगळ्या परिस्थितीत होता. अशावेळी ’सोसायटी ऑफ इको-एन्डेन्झर्ड स्पिसीज कॉन्झर्वेशन अॅण्ड प्रोटेक्शन’ (सिस्केप) या संस्थेने गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात गिधाड संवर्धनाचे काम सुरू केले. सातत्यपूर्ण संवर्धनाच्या कामामुळे गावात गिधाडांची संख्या वाढली आहे.
गावकऱ्यांनी गिधाडांना आपलेसे केले आहे. विशेषतः प्रजननाच्या काळात मोठ्या आवाजामुळे गिधाडांना त्रास होऊ नये, त्यांच्या घरट्यांमधील पिल्लांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी गावात डीजे आणि बॅन्जो पार्टीला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी केवळ आवाजावरची बंदी नाही, तर गावकऱ्यांनी स्वीकारलेली गिधाडांच्या अस्तित्वाची जबाबदारी आहे. लग्नसमारंभ, उत्सव आणि इतर कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजाचा वापर टाळून गिधाडांच्या अधिवासाला शांतता देण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. गिधाडांसारख्या संकटग्रस्त पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सरकारी यंत्रणांबरोबरच स्थानिक समुदायाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे बागेची वाडी दाखवून देते. गिधाडांसाठी डीजेचा आवाज थांबवणारे हे गाव आज माणूस आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाची कहाणी सांगत आहे.
डीजे आणि बॅन्जो पार्टीवर बंदी घातल्यापासून वाडीत गिधाडांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे गिधाडांनी वाडीतील घरांना लागूनच असणाऱ्या झाडांवर घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. समजा त्यांची पिल्लं घरट्याखाली पडली की आम्ही ती उचलून पुन्हा घरट्यात ठेवतो. त्यामुळे गिधाडांना देखील आता आमच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. - किशोर गुलगुले, ग्रामस्थ - बागेची वाडी
ज्यावेळी सिस्केप या संस्थेने दोन दशकांपूर्वी या वाडीत ग्रामस्थांना हाताशी धरुन गिधाड संवर्धनाचे काम सुरू केले, त्यावेळी येथील गिधाडांची संख्या १० होती. मधल्या काळात ही संख्या सुधारली. त्यानंतर २०२ मध्ये या वाडीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका या गिधाडांना बसला. असे असूनही यंदा या वाडीत २८ घरट्यांमधून १७ पिल्लांनी जन्म घेतला असून साधारण ५० ते ६० गिधाडे या वाडीत वस्तीला असतात. - प्रेमसागर मेस्त्री, संस्थापक (सिस्केप)