राहुलबाबा, आधी घरात बघा!

    07-Sep-2026
 
Rahul Gandhi Women’s Empowerment
 
काँग्रेसला महिलांनी पितृसत्तेविरुद्ध लढावे असे वाटते, चांगले आहे. फक्त एक अडचण आहे, ती म्हणजे काँग्रेसच्या मंत्रिमंडळात लढण्यासाठी तरी आधी महिला असायला हव्यात! राहुल गांधींनी ‘छात्रों की गूंज’मध्ये विद्यार्थिनींसमोर उभे राहून, स्त्रियांना पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान देण्याचे आवाहन केले. पण, भाषण संपल्यानंतर काँग्रेसशासित राज्यांच्या मंत्रिमंडळांची यादी उघडली, तर दिसणारे चित्र फारच विरुद्ध! कर्नाटकात काँग्रेसच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, हिमाचल प्रदेशातही तीच अवस्था. 'केरळम्'मध्ये दोन महिला मंत्री, तर तेलंगणात दोन महिला मंत्री होत्या. पण त्यांपैकी कोंडा सुरेखा यांना त्यांच्या मुलीने केलेल्या टीकेमुळे मंत्रिमंडळातून काढण्यात आले. महिलांना लढण्याचा सल्ला देणार्‍या काँग्रेसने, आधी त्यांना सत्तेच्या मैदानात उतरवण्याची तरी व्यवस्था करावी. आता यावर काँग्रेसचे उत्तर काय? तर पक्षशिस्त! ठीकच आहे. पक्षशिस्तीचा निर्णय पक्षाचा अधिकार आहे; पण मग महिला प्रतिनिधित्वाचा प्रश्न कोणाचा अधिकार? कारण, एखाद्या महिलेची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे, हा पक्षाचा अधिकार असेल, तर महिलांना मंत्रिमंडळात किती स्थान द्यायचे, हा प्रश्नही पक्षाच्याच इच्छेवर अवलंबून आहे.
 
राहुल गांधींनी भारतीय स्त्रियांना पितृसत्तेविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन करण्यापूर्वी, आपल्या मुख्यमंत्र्यांना एकदा एवढेच विचारावे की, ‘तुमच्या मंत्रिमंडळात स्त्रिया कुठे आहेत?’ कदाचित याचे उत्तरच त्यांना पितृसत्तेविरुद्धची पुढची सभा कुठे घ्यायची, याचे ठिकाणही सांगून जाईल. महिला आरक्षणाचा विरोध करणारी काँग्रेस, स्त्रीमुक्तीची पवाड गात आहे, हाच एक विनोद आहे! मोदी सरकारमध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखाते आहे, अन्नपूर्णा देवींकडेही महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. तेव्हा काँग्रेसने आता महिलांना सल्ले देण्याचा उद्योग कमी करून, स्वतःच्या मंत्रिमंडळातील खुर्च्या त्यांच्यासाठी सोडाव्यात. कारण, ज्या पक्षाच्या सरकारात महिला मंत्री शोधण्यासाठी दुर्बीण लागते, त्या पक्षाने देशाला महिला सशक्तीकरणावर ज्ञान देणे, म्हणजे दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ बघण्याचाच उद्योग आहे. महिलांना खुर्च्या द्याव्यात, अधिकार द्यावेत, निर्णय घेण्याची संधी द्यावी आणि हे करण्याची हिंमत नसेल, तर राहुल गांधींच्या भाषणांचे आयोजन आधी स्वतःच्या मंत्रिमंडळाच्या दाराबाहेरच करावे!
 
‘डिजिटल इंडिया’चे असेही यश
 
डिजिटल क्रांतीचा परिणाम मोजताना आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने ‘यूपीआय’चे आकडे येतात. मोबाईलवरून काही सेकंदांत होणारा पैशांचा व्यवहार हे डिजिटल भारताचे दृश्य रूप. पण, या क्रांतीचा आणखी एक दूरगामी परिणामही आहे. भारतीयांचा पैसा आता केवळ बँकेच्या बचत खात्यात पडून राहात नाही; तो म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि अन्य वित्तीय साधनांकडे वळत आहे. डिजिटल तंत्रज्ञान हाती आल्याने भारतीयांच्या हातात केवळ व्यवहाराचे साधनच दिले नाही, तर पैशाबाबत निर्णय घेण्याची संधीही दिली आहे. म्युच्युअल फंडातील डायरेट प्लॅनकडे वाढणारा कल त्याचे महत्त्वाचे उदाहरण. मार्च २०२१ मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची डायरेट प्लॅनमधील गुंतवणूक १.६ लाख कोटी रुपये होती. मार्च २०२६ मध्ये ती जवळपास सात लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या एकूण म्युच्युअल फंड मालमत्तेत, डायरेट प्लॅनचा वाटाही २१.४ टक्क्यांवरून तब्बल ३६.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
 
या आकड्यांमागे गुंतवणुकीच्या पद्धतीत झालेला मूलभूत बदलही कारणीभूत आहे. पूर्वी गुंतवणूकदाराला मध्यस्थाची मदत अपरिहार्य वाटे. आता मोबाईल अ‍ॅप, ऑनलाईन केवायसी, डिजिटल पेमेंट, तत्काळ माहिती आणि विविध वित्तीय प्लॅटफॉर्ममुळे, गुंतवणूकदार स्वतः निर्णय घेऊ शकतो. स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे, ही सुविधा आज महानगरांच्याही पलीकडे गेली आहे. त्यामुळे आर्थिक सहभागाची दारे अधिकच व्यापक झाली. डायरेट प्लॅनमध्ये मध्यस्थ नसल्याने खर्च तुलनेने कमी असतो, दीर्घकाळाच्या गुंतवणुकीत खर्चातील ही बचतही महत्त्वाची ठरते. मात्र, डिजिटल प्रवेश म्हणजे आर्थिक ज्ञान नव्हे. आज एका लिकवर गुंतवणूक करता येणे सोपे आहे; योग्य गुंतवणूक निवडणे, जोखीम समजून घेणे आणि बाजारातील अस्थिरतेत संयम राखणेही तितकेच आवश्यक आहे. डिजिटायझेशनमुळे हे ज्ञानही सामान्य माणसाला आज उपलब्ध आहे. म्हणूनच, ‘डिजिटल इंडिया’चे यश केवळ किती व्यवहार ऑनलाईन झाले, याने मोजता येणार नाही. डिजिटल गुंतवणुकीने भारतीयांची आर्थिक मानसिकताच बदलण्यास सुरुवात केली आहे. ‘डिजिटल इंडिया’चे हेही एक यश आहे!
 
- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर