मुंबई : (PM Narendra Modi Mumbai) पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर येणार असून, मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६चे उद्घाटन केल्यानंतर ते गुजरातमधील वडोदरा येथे ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि राष्ट्रार्पण करणार आहेत.
मुंबईत पंतप्रधान मोदी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६चे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित करतील. ८ ते ११ सप्टेंबरदरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आलेला हा फिनटेक क्षेत्रातील जगातील प्रमुख वार्षिक कार्यक्रमांपैकी एक आहे. यंदाच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची थीम “Potential to Impact: Agentic AI, Tokenisation, Quantum - Trusted, Connected, Global Systems for Inclusive Finance” अशी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वासार्ह, परस्पर जोडलेली आणि सर्वसमावेशक जागतिक वित्तीय व्यवस्था उभारण्यावर यावेळी भर राहणार आहे. (PM Narendra Modi Mumbai)
धोरणकर्ते, नियामक, केंद्रीय बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि अन्य जागतिक भागधारक या परिषदेत सहभागी होणार आहेत. डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रातील भारताचे नेतृत्व पुढे नेत नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि सर्वसमावेशक परिणाम साधण्यावर परिषदेत चर्चा होणार आहे. (PM Narendra Modi Mumbai)
वडोदऱ्यात ३५ हजार कोटींच्या प्रकल्पांना चालना
मुंबईनंतर पंतप्रधान मोदी गुजरातमधील वडोदरा येथे दुपारी सुमारे १२ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. या प्रकल्पांची एकूण किंमत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तीन महत्त्वपूर्ण मार्गिकांचे राष्ट्रार्पण करतील. सुमारे ३२६ मार्ग किलोमीटर लांबीच्या या तीन मार्गिकांसाठी २०,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.(PM Narendra Modi Mumbai)
सानंद (उत्तर)-मकरपुरा, न्यू उंबरगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-जेएनपीटी या मार्गिकांचा यात समावेश आहे. पंतप्रधान ३२९ किलोमीटरच्या तीन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. रस्ते वाहतुकीसाठीही सुमारे १,७८० कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच कंदारी चौकडी आणि लुवारा पाटिया येथील सहापदरी उड्डाणपुलांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (PM Narendra Modi Mumbai)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.