भांडुपमध्ये छेडछाड करणार्‍या नराधमाला ‘निर्भया पथका’ने शिकवला धडा; थरारक कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    07-Sep-2026   

मुंबई: (Nirbhaya Squad) मुंबईतील भांडुप परिसरातून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि धडक कारवाई समोर आली आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या महिलांची छेड काढणार्‍या आणि त्यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या एका नराधमाला मुंबई पोलिसांच्या ‘भांडुप-६ निर्भया पथकाने’ रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण नाट्यमय कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिक पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक करत आहेत.
 
मुंबईतील भांडुप भागातील एका मुख्य रस्त्यावर एक अज्ञात व्यक्ती उभी राहून तिथून जाणार्‍या-येणार्‍या महिलांना त्रास देत होती, त्यांची छेड काढत होती. त्याच वेळी, मुंबई पोलिसांचे ‘भांडुप-६ निर्भया पथक’ परिसरात नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग (गस्त) घालत होते. गस्तीवर असलेल्या महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आणि महिलांना होणारा त्रास तात्काळ लक्षात आला.पोलिसांची गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच त्या छेडछाड करणार्‍या आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच सतर्क असलेल्या निर्भया पथकाने कोणतीही वेळ न घालवता त्याचा थरारक पाठलाग केला. (Nirbhaya Squad)


आरोपीने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा आणि त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनुसार, खाकी वर्दीशी हुज्जत घालणार्‍या या मजनूला महिला पोलिसांनी कडक भाषेत धडा शिकवत, रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराजवळ लोळवून पूर्णपणे नियंत्रणात आणले आणि बळाचा वापर करून पोलीस व्हॅनमध्ये कोंडले. (Nirbhaya Squad)

महिलांसाठी हेल्पलाईन १०३ (१०३) या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा महिला सुरक्षेची खात्री दिली आहे. मुंबईत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी महिलांना असुरक्षित वाटल्यास किंवा छेडछाडीचा सामना करावा लागल्यास, त्यांनी थेट मुंबई पोलिसांच्या महिला हेल्पलाईन क्रमांक १०३ (१०३) वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा क्रमांक २४ तास कार्यरत असून, तक्रार मिळताच निर्भया पथक काही मिनिटांत मदतीसाठी घटनास्थळी दाखल होते. भांडुपमधील या कारवाईने गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, मुंबईत महिलांची छेडछाड अजिबात सहन केली जाणार नाही. (Nirbhaya Squad)








योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर