पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात आंदोलन

    07-Sep-2026   
MPSC Protest In Pune

पुणे :
(MPSC Paper Leak) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाची भरती प्रक्रिया पदाचा पेपर फुटल्यानंतर पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारों विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले.
 
शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर चौक ते, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. रोहित पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक विरोधक या मोर्चात सहभागी झाले होते. (MPSC Paper Leak)
 
पेपरफुटीप्रकरणी प्रकरणी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट व्हावे, इथून पुढे सर्व परीक्षा पारदर्शक व्हाव्या आणि भविष्यातील गैरप्रकारांना आळा घालावा, यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. (MPSC Paper Leak)
 
रोहित पवारांची स्टंटबाजी
 
या आंदोलनादरम्यान रोहित पवार यांची स्टंटबाजी पाहायला मिळाली. त्यांनी हातात संविधानाची प्रत घेत ट्रकवर चढून भाषण दिले. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा असून यात कुठलेही राजकारण नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही केली. (MPSC Paper Leak)
 
शिवाय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांच्या कॉलेजमध्ये त्यांचे सिनियर होते आणि ते मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत, असा दावा रोहित पवारांनी केला. एवढंच असेल तर, तुमच्या पक्षात करा. त्यांना आमदारकी, खासदारकी द्या, असेही ते म्हणाले. त्यामुळे एकीकडे या मोर्चात राजकारण नाही असे म्हणणाऱ्या रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या मोर्चात राजकीय टोलेबाजी करणे कितपत योग्य आहे? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतोय. (MPSC Paper Leak)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर