
मुंबई - (jammu kashmir film festival )सप्टेंबरची थंडगार रात्र, मोकळे आकाश, समोर दाल सरोवराचे शांत पाणी आणि पडद्यावर शम्मी कपूर 'काश्मीर की कली'वर नाचत असल्याची कल्पना करा. १० सप्टेंबरपर्यंत श्रीनगर रोज रात्री ८ वाजल्यापासून एका जादुई दृश्याचा साक्षीदार होणार आहे. कारण आजपासून पासून जम्मू आणि काश्मीर फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून 'जंगली', 'आरजू' आणि यश चोप्रा यांचा 'कभी कभी' यांसारखे अजरामर चित्रपट दाल सरोवरावरील चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. चार दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'रंग ए सिनेमा' आजपासून १० सप्टेंबरपर्यंत श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात सुरू झालाय. यामध्ये ४१ देशांमधील १३५ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
'शोले' या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि निर्माते रमेश सिप्पी, तसेच '3 इडियट्स', 'पीके' आणि 'मिशन काश्मीर' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे जम्मू आणि काश्मीरस्थित दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आणि संपादक विधू विनोद चोप्रा हे या महोत्सवात विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले आहेत. जम्मू आणि काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी संतोष सिवन, डॉरोथी वेनर, केको बँग, श्रीराम राघवन आणि हिमांशू शेखर खटुआ यांचा समावेश असलेली एक प्रतिष्ठित ज्युरी स्थापन करण्यात आली आहे. (jammu kashmir film festival)
या नामवंत चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीमुळे, जम्मू आणि काश्मीर हे चित्रपट निर्माते, कलाकार, कथाकार आणि चित्रपटप्रेमींसाठी भारत व जगाशी जोडले जाणारे एक चैतन्यमय ठिकाण म्हणून उदयास येण्याच्या प्रक्रियेला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.जम्मू आणि काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने आयोजित केलेला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम म्हणून संकल्पित आहे. हा महोत्सव सिनेमाच्या वैश्विक भाषेचा गौरव करेल आणि प्रस्थापित व उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना एकमेकांशी जोडले जाण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि त्यांच्या कथा व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. (jammu kashmir film festival)
महाकुंभाच्या काळात दाल सरोवराच्या लाटांवर तरंगणारा हा चित्रपट महोत्सव काश्मीरच्या जुन्या चित्रपटसृष्टीच्या परंपरेला आणि सांस्कृतिक वारशाला पुनरुज्जीवित करेल. हा केवळ एक चित्रपट महोत्सव नसून त्या युगाला दिलेली एक आदरांजली असणार आहे. त्यामुळे हा चित्रपट महोत्सव प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल. (jammu kashmir film festival)