रत्नागिरी जिल्ह्यात २०२६च्या प्रजनन हंगामात ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ आणि धनेशमित्रांच्या सहकार्याने ‘महाधनेश’, ‘मलबारी राखी धनेश’, ‘भारतीय राखी धनेश’ आणि ‘मलबारी कवड्या धनेश’ या चार प्रजातींच्या १०३ नैसर्गिक घरट्यांचे वैज्ञानिक निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणाअंती समोर आलेल्या बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख...
यंदा कोकणातील धनेश पक्ष्यांचा प्रजनन हंगाम मे महिन्याच्या अंती समाप्त झाला. यावर्षी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या माध्यामातून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात धनेशमित्रांच्या सहकार्यातून महाधनेश, मलबारी राखी धनेश, भारतीय राखी धनेश आणि मलबारी कवड्या धनेश यांच्या मिळून १०३ ढोल्यांचे निरीक्षण केले. याच प्रयोजनातून यावर्षीच्या हंगामात नोंदवण्यात आलेली निरीक्षणे आणि त्याबद्दलची माहिती ही डोळे उघडणारी ठरली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून धनेश प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी हात पुढे येत आहेत. रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि वनविभाग यांनीही पुढाकार घेत महाधनेश प्रजातीला ‘रत्नागिरी जिल्ह्याचा महत्त्वाचा पक्षी’ म्हणून घोषित केलं, हे ‘धनेशमित्र’ चळवळीचे एक महत्त्वाचे यश मानावे लागेल. मात्र, अनेक ठिकाणी निरीक्षण आणि संवर्धन सुरू होणे गरजेचे आहे. २०२६च्या प्रजनन हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील १०३ नैसर्गिक घरट्यांचे नियमित वैज्ञानिक निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणातून एकूण ५८ ढोल्यांमध्ये मादीने प्रवेश केला; म्हणजेच सुमारे ५५.८ टक्के घरटी वापरात होती. त्यांपैकी ४३ ढोल्यांमधून पिल्ले यशस्वीरीत्या बाहेर पडली. एकूण १०३ घरट्यांपैकी ४१ टक्के ढोल्यांमध्ये यशस्वी प्रजनन झाले. वापरात आलेल्या ५८ ढोल्यांपैकी जवळपास ७४ टक्के ढोल्यांमधून पिल्ले यशस्वीपणे उडाली. धनेश पक्षी हे पूर्णतः झाडांच्या ढोल्यांमध्येच पिल्लांना जन्मास घालतात. शिवाय, ते एकच ढोली दरवर्षी वापरतात. त्यामुळे ढोल्यांचे हे निरीक्षण महत्त्वाचे ठरले.
प्रजननाच्या अनुषंगाने प्रजातीनुसार निरीक्षणामधून काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. मलबारी कवड्या धनेश ही सर्वाधिक नोंद झालेली प्रजाती असून ७० घरट्यांपैकी ४१ घरटी वापरात आढळली. यांपैकी ३१ घरट्यांमधून पिल्ले यशस्वीपणे बाहेर पडली; म्हणजे वापरात आलेल्या घरट्यांपैकी ७५.६ टक्के प्रजनन यश नोंदविण्यात आले. महाधनेशाच्या २९ घरट्यांपैकी १६ घरटी वापरात होती. त्यांपैकी ११ घरट्यांमध्ये यशस्वी प्रजनन झाले, म्हणजे ६८.८ टक्के प्रजनन यश नोंदविण्यात आले. भारतीय राखी धनेशाच्या निरीक्षण केलेल्या दोन घरट्यांपैकी एक घरटे वापरात आले आणि त्यामध्ये पिल्ले यशस्वीपणे उडाली. मलबारी राखी धनेशाच्या दोन घरट्यांचे निरीक्षण करण्यात आले. मात्र, या हंगामात कोणतीही प्रजननक्रिया आढळली नाही.
धनेश पक्ष्याच्या प्रजननाचे एक वर्षाचे निरीक्षण महत्त्वाचे असले, तरी संवर्धनासाठी ते पुरेसे नसते. अनेक धनेश वर्षानुवर्षे त्याच घरट्यांचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक घरट्याचा माहितीकोश तयार करणे अत्यंत आवश्यक ठरते. दीर्घकालीन निरीक्षणामुळे कोणती घरटी दरवर्षी वापरली जातात, कोणती झाडे सर्वाधिक सुरक्षित आहेत, कोणत्या भागात प्रजनन यश जास्त आहे, हवामानबदल, जंगलतोड किंवा मानवी हस्तक्षेपाचा प्रजननावर काय परिणाम होतो, कृत्रिम घरटी आणि अधिवास पुनर्निर्मिती किती प्रभावी ठरते, या प्रश्नांची उत्तरे मिळतात. ही सर्व माहिती भविष्यातील संवर्धन धोरण तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आमच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग. ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि वनविभाग यांच्या सहकार्याने अनेक घरट्यांवर नियमित लक्ष ठेवले जाते. प्रत्येक घरट्याची ‘जीपीएस’ नोंद, छायाचित्रे, निरीक्षण, प्रजननाची माहिती आणि परिसरातील खाद्यझाडांची माहिती संकलित केली जाते. यामुळे स्थानिक समाज केवळ माहिती देणारा नसून संवर्धनाचा प्रत्यक्ष भागीदार बनतो.
धनेशांचे अस्तित्व मोठ्या, जुन्या वृक्षांवर अवलंबून असते. अशा वृक्षांची संख्या कमी होत गेल्यास धनेशांचे प्रजननही कमी होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच प्रत्येक घरटे संरक्षित करणे, म्हणजे मोठ्या वृक्षांचे संरक्षण, जैवविविधतेचे संरक्षण, बीजप्रसाराची नैसर्गिक प्रक्रिया जपणे आणि भविष्यातील जंगल सुरक्षित ठेवणे. ‘धनेशमित्र’ उपक्रमांतर्गत पुढील काही वर्षांत अधिकाधिक घरट्यांचे दीर्घकालीन निरीक्षण, कृत्रिम घरट्यांची उभारणी व परिणामकारकतेचे मूल्यमापन, धनेशांच्या खाद्य वनस्पतींची लागवड, ‘जीआयएस’आधारित डेटाबेस तयार करणे, कॅमेरा मॉनिटरिंगचा विस्तार, प्रत्येक गावात प्रशिक्षित ‘धनेशमित्र’ स्वयंसेवक तयार करणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘धनेशमित्र’ मंडळे स्थापन करण्याचे काम आम्ही करणार आहोत. मात्र, धनेशांचे संरक्षण केवळ वनविभाग किंवा संशोधकांचे काम नाही. आपल्या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण मोठ्या नैसर्गिक झाडांचे जतन करणे, घरटे असलेल्या झाडांची माहिती आम्हाला कळवणे, प्रजनन काळात घरट्याजवळील मानवी व्यत्यय टाळणे, स्थानिक फळझाडांची लागवड करणे, ‘धनेशमित्र’ स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे, ‘धनेशमित्र’ उपक्रमाला देणगी देऊन पाठबळ देणे, ढोली असणारे झाड दत्तक घेणे आणि धनेश अधिवास पुनर्निर्मितीसाठी आपली जागा देऊन योगदान देऊ शकता.
प्रतीक मोरे
(लेखक ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ या संस्थेचे संस्थापक सदस्य असून ‘आययूसीएन’च्या आंतरराष्ट्रीय धनेश संवर्धन गटाचे सदस्य आहेत.)
७७९८२३३२४३