सायकल हे प्रत्येकाच्या जीवनातील पहिले वाहन! जसे, वय वाढते तसे त्याच्या चाकांची संख्या कमी होते. मात्र, अनेकदा सायकल ही एक सीट असलेलीच आपण पाहिली आहे. मात्र, दोन सीटची क्षमता असलेल्या सायकलही पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. या सायकल त्यांचा इतिहास, वैशिष्ट्य यांचा मागोवा घेणारा हा लेख...
प्रिय आरोग्यप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींना पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केलेले आवाहन वाचनात आले. डॉ. मेधा कुलकर्णींच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित होणारी, ‘पुणे ऑन पेडल्स’ ही सायकल रॅली आणि ज्यांच्याकडे सायकल नसेल किंवा चालवणे शक्य नसेल, अशांसाठीची ‘पुणे वॉकेथॉन’ यावर्षी रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतचे ते आवाहन होते. गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले आहे. सगळ्यांना सोयीस्कर असलेला रविवारच त्यांनी निवडला. ध्यानचंद स्टेडियमवरून दिल्लीकर जसे दर रविवारी धावतात, तसेच पुणेकरही ‘सायकल ऑन संडे’ला धावणार आहेत.
खरं तर आपला देश सायकलच्या बाबतीत, मागास असल्याचेच म्हणावेसे वाटते. आपण आपल्या मुलामुलींना त्यांच्या लहानपणी, प्रथम तीनचाकी सायकल आणतो; नंतर दोनचाकी सायकल देतो. जसा ही मुले महाविद्यालयात जातात, तशी त्यांची सायकलची चेन गंजू लागते. कारण, आपण त्यांना दुचाकी आणून देतो. ज्यांची आर्थिक कुवत असते, ते चारचाकीही आणून देतात. पुढे नोकरी-धंद्याला लागल्यावर त्या मुलाचे दोनाचे चार करत, त्याच्या लग्नाचा बार उडवून देतो. नवविवाहित जोडपी मग हळूहळू व्यायामासाठी रविवारी सायकल चालवू लागतात. एरव्ही जोडप्याला कुठे जोडीने जाण्यासाठी चारचाकी दिमतीला असतेच; तसेच सुटीच्या दिवशी ग्रुपवर फोटो झळकावत ते ‘सायकल ऑन संडेमॅन/संडेवुमन’ही होतात. भारतातील सायकल परंपरा आणि विदेशांतील सायकल परंपरा यात प्रचंड फरक मला जाणवतो, तो ‘डबलसीट’वरून!
आपण विदेशाचे अनेक बाबतीत अनुकरण करतो. त्यांच्यासारखे जिमला जातो, ज्यांना परवडतं, ते घरीच ‘ट्रेडमिल’वर व्यायाम करतात. एकट्याने सायकल चालवताना, विदेशांतील दुकट्याने चालवलेली सायकल आपण विसरतो. साठएक वर्षांपूर्वी पायडल मारत सायकलवरुन ‘डबलसीट’ जाताना कोणी आढळले, तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जात असे. कधीकधी सायकलच्या चाकातील हवा सोडून, व्हॉल्हची पिनही काढून घेतली जाई. त्याआधी पालिकेने दिलेला सायकलचा बिल्लाच जप्त करीत. पूर्वी सायकल मालक दरवर्षी पालिकेकडे कर भरत. त्याची पोचपावती म्हणून, सायकलवर लावण्यासाठी धातूचा एक बिल्ला मिळे. तसे बिल्ले लावून सायकलिंग करणारी पिढीच दिसेनाशी झाली आहे. ते दुचाकी कर-बिल्ले कसे होते, हे आपल्याला समजावे, म्हणून लेखासमवेत ‘बायसिकल टॅक्स बॅजेस’चा एक फोटोही आपण बघू शकता. पुण्यातील माझे स्नेही श्रीयुत विक्रम पेंडसे यांच्या सहकार्याने मिळालेल्या फोटोत ते आपल्याला दिसेल. या लेखात आपण ज्या ‘डबलसीट’ सायकलबद्दल जाणून घेणार आहोत, त्या ‘डबलसीट’ दुचाकीचा एक फोटोही विक्रम पेंडसे यांनीच पाठवला आहे.
विदेशात मात्र ‘डबलसीट’ला आजही प्रोत्साहन मिळते. आपणही पूर्वीची ‘डबलसीट’ प्रणाली विसरून, विदेशी ‘डबलसीट’ प्रणाली अमलात आणायला काय हरकत आहे! हो, त्यासाठी विदेशी ‘डबलसीट’ प्रकरण समजून घेऊया. हे समजून घेण्यासाठी, एका गाण्याचा धडा घेणे आवश्यक आहे. ‘डेझी बेल’ हे सायकलच्या इतिहासातील प्रसिद्ध इंग्रजी गाणे. १८९२ मध्ये हॅरी डेक्रे या ब्रिटिशाने ते लिहिले. ‘सायकल बिल्ट फॉर टू’ या नावानेही ओळखल्या जाणार्या गाण्याला, आपण ‘डबलसीट साँग’ म्हणूया. गवत फूल, मराठी साहित्यात भा. रा. तांबेंच्या ‘गवतफुला रे गवतफुला’ या कवितेमुळे, या शब्दाला भावनिक ओळख मिळाली. सूर्यफूल, झेंडू आणि शेवंती या फुलांच्या पठडीतीलच एक असे फूल, ज्याला शास्त्रीयभाषेत ‘बेलिस पेरेनिस’ म्हणतात. इंग्रजीमध्ये ‘डेझी’ या नावाचा उगम ‘डेज् आय’ शब्दापासून झाला. कारण, हे फूल सूर्योदयाला उमलते आणि सूर्यास्तानंतर झोपी जाते. ‘डेझी बेल’ या गाण्याच्या नावातील ‘बेल’ हा इंग्रजी शब्द, एका मुलीचे आडनाव आहे. या गाण्यातील मुख्य पात्राचे नाव ‘डेझी बेल’. ज्या मुलीवर कवीचे प्रेम असते त्याचे नाव हॅरी डेक्रे.
१९व्या शतकाच्या शेवटी जेव्हा सायकलची आवड होती, तेव्हा या गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला. हॅरी डेक्रे जेव्हा इंग्लंडमधून पहिल्यांदा अमेरिकेला गेले, तेव्हा त्यांनी सोबत स्वतःची सायकलही नेली. अमेरिकन सीमाशुल्क विभागाने त्या सायकलवर आयातशुल्क आकारले. यावर त्यांच्या एका मित्राने गमतीने म्हटले होते की, "नशीब, तू दोन सीटवाली सायकल-दोन सीट आणि दोन जोडी पेडल आणली नाहीस! नाहीतर तुला दुप्पट टॅक्स भरावा लागला असता!” असो. तर, या ‘सायकल बिल्ट फॉर टू’ अर्थात दोघांसाठी तयार झालेली सायकल, या वायानेच डेक्रे यांना प्रेरित केले. पुढे त्यांनी ‘डेझी बेल’ नावाचं गाणं रचले. त्या इंग्रजी गाण्याचे बोल असे आहेत, ""Daisy, Daisy, give me your answer, do! I'm half crazy, all for the love of you! It won't be a stylish marriage, I can't afford a carriage, But you'll look sweet upon the seat of a bicycle built for two.'' त्याचा मराठी भावार्थ असा होईल, "डेझी, डेझी, मला तुझं उत्तर दे ना! तुझ्या प्रेमापायी मी वेडा झालोय! आपलं काही थाटामाटाचं लग्न नसेल, माझ्याकडे गाडी घेण्याइतके पैसेही नाहीत. हो, पण त्या सायकलच्या सीटवर तू खूप छान दिसशील, जी खास दोघांसाठी बनवली आहे!” एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालताना, गायलेले हे गाणे. त्याच्याकडे घोडागाडी नसली, तरी तो तिला ‘दोन आसनी सायकल’वरून फिरवायचे वचन देतो ‘डेझी बेल’ हे गाणे तेव्हा संगीतासाठीच गाजलं होतं असं नाही. तर, १९६१ मध्ये आय.बी.एम.च्या महासंगणकाने मानवी आवाजात ‘टेस्ट-टू-स्पीच’ तंत्रज्ञान विकसित करताना, पहिल्यांदाच गायलेले गाणे ‘डेझी बेल’च होते.
यावरून प्रेरित होऊन १९६८च्या ‘ए स्पेस ओडिसी’ या इंग्रजी चित्रपटात जेव्हा नायकाचा मुख्य संगणक बंद केला जातो, तेव्हा तो मृत्यूसमयी ‘डेझी बेल’च गाणे गाताना दाखवलं आहे. हिंदी चित्रपटांमध्येही अनेक लोकप्रिय गाण्यांमध्ये, नायक-नायिका किंवा कुटुंबे सायकलवरुन ‘डबलसीट’ फिरताना दाखवली आहेत. ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटात देव आनंद मुमताजला, सायकलवरुन ‘डबलसीट’ नेताना दाखवले आहे. ‘चांदी की सायकल सोने की सीट’, ‘आओ चलें डार्लिंग चलें डबलसीट’ हे गोविंदा आणि जुही चावलाचे, एक सीटवाल्या सायकलबरोबरचे गीत प्रसिद्ध आहे. त्यांना पोलीस साधी ताकीदही देत नाहीत; कारण त्यावेळेस ते कुठे गेलेले असतात, हे त्या चित्रपटाचा निर्माताच जाणे! पण ही भीती ‘डबलसीट’ सायकलवाल्यांना नसते; कारण जगभरात तो प्रकार अधिकृत आहे.
‘सायकल बिल्ट फॉर टू’वरची दोन हिंदी चित्रपटगीते तुम्हाला लक्षात येतात का बघा. दोघांनी एकत्र पायडल मारायच्या ‘टँडम’ या ‘डबलसीट’वर एक गीत आहे. ‘सांवले सलोने आए दिन बहार के’ हे गीत सुनील दत्त, मीना कुमारी आणि बालकलाकार डेझी इराणी यांचं असून, त्यात कुटुंब सहलीला एकत्र सायकल चालवताना दाखवलं आहे. १९५६च्या ‘एक ही रास्ता’ या चित्रपटासारखे दुसरं ‘टँडम’ सायकलचं गाणं आहे ते ‘बेवकूफ’ या चित्रपटातलं, आशा भोसले, किशोर कुमार यांनी सचिन देव बर्मन यांच्या संगीत-दिग्दर्शनात गायलेले मजरूह सुलतानपुरी यांचं ‘मायकल हैं तो सायकल हैं’.
अशी लोकांना भुरळ पाडणारी ‘डबलसीट’ गाणी मोठ्यांना आकर्षित करतात, तेवढीच छोट्यांनाही. आज अनेक लहान मुलांच्या बडबडगीतांमध्ये चित्रपट आणि ‘छान छान गोष्टीं’मध्ये ‘डेझी बेल’चा वापर होतो. ‘डेझी बेल’ अनेकांना माहीत झालं असेल, ‘टँडम’ सायकल चित्रपटात बघायला वगैरे आवडतही असली, तरी भारतीय मात्र या ‘डबलसीट’चे अनुकरण त्या प्रमाणात करताना आढळत नाहीत. त्याला असलेली कारणे तशी सयुक्तिक असावीत. आपले रस्ते, रहदारी ही कारणं या ‘डबलसीट’ सायकलींना योग्य नाहीत. ‘टँडम’ सायकल सामान्य सायकलपेक्षा बरीच लांबलचक असते. भारतातील अरुंद गल्लीबोळांतून अशी सायकल वळवणे आणि ती सांभाळणे अत्यंत जिकरीचेच. ही सायकल मुख्यत्वे दोनजणांसाठीच तयार केली असल्याने, जर दुसर्या सहकार्याला कुठे जायचे नसेल, तर एकट्या व्यक्तीला ही लांब सायकल चालवणे अत्यंत गैरसोयीचे ठरते. भारतातील घरांमध्ये किंवा पार्किंग लॉटमध्ये, अशा मोठ्या सायकली ठेवण्यासाठी पुरेशी जागाही नसते. कारण ती जागा स्कुटर, मोटारसायकल, चारचाकी गाड्यांसाठी असल्याने; मोटारींनाच प्राधान्य मिळते.
जरी या सायकली वाहतुकीसाठी वापरल्या जात नसल्या, तरीही पुण्याच्या बावधन येथे तशा सायकलींचा आनंद लुटताना आपले दृष्टिबाधीत दिव्यांग बांधव दिसतात. दिव्यांशू गणात्रा हे पुणेकर त्यांच्या वयाच्या १९व्या वर्षी अंध होऊनही, भारताचे पहिले अंध सोलो पायलट झाले होते. आज ‘अॅडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स फाऊंडेशन’ ही संस्था ते चालवतात. सर्वसामान्य लोक आणि दिव्यांग व्यक्तींना एकत्र आणून, विविध साहसी खेळांचे ते आयोजन करतात. ‘टँडम’ सायकलचा उपयोग करून, एक सामान्य व्यक्ती आणि एक दिव्यांग व्यक्ती अशी ‘टँडम’ सायकल चालवत ‘डबलसीट’चा आनंद यात उपभोगला जातो. या सायकलमध्ये दृष्टिदोष असलेले खेळाडू मागे बसतात. त्यांना ‘स्टोकर’ म्हणतात, त्यांच्या पुढे एक मार्गदर्शक खेळाडू बसतो, त्याला ‘पायलट’ म्हणतात. पायलट सायकल नियंत्रित करतो.
याशिवाय, काही पर्यटनस्थळांवरही, मनोरंजनासाठी या सायकली भाड्याने उपलब्ध आहेत. या ‘टँडम’ सायकली १९०८ ते १९७२ या काळात, ऑलिम्पिकचा एक नियमित क्रीडाप्रकार होता. १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकनंतर हा क्रीडाप्रकार ऑलिम्पिकमधून वगळण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये हा खेळ बंद झाला असला, तरी पॅरालिम्पिक खेळांमध्ये तो आजही अत्यंत लोकप्रिय आहे. कदाचित, एखाद्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा परत अंतर्भावही होऊ शकतो! आणि जर तसं खरंच झालं, तर काय? आपण त्याही स्पर्धेत उतरायला केव्हाही तयार असू का? कारण, ज्या खेळांमध्ये भारत सध्या पात्रही ठरत नाही, अशा किमान ३/४ स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंनी उतरावे, असे ध्येय आपल्या पंतप्रधान मोदींनी ठेवले आहेच ना!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४