Mumbai biodiversity - मुंबईच्या जैवविविधतेच्या नोंदीसाठी ‘विंग्ज अँड रूट्स’ उपक्रम

    07-Sep-2026
Mumbai biodiversity
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील जैवविविधतेच्या नोंदी करण्यासाठी आणि स्थानिक अधिवासांचे जाळे बळकट करण्यासाठी ‘विंग्ज अँड रूट्स’ हा शहरव्यापी उपक्रम सुरू होणार आहे (Mumbai biodiversity). नागरिकांनी आपल्या परिसरातील झाडे, पक्षी आणि इतर सजीवांची नोंद करावी, तसेच स्थानिक वनस्पतींचे अधिवास विकसित करावेत, असे आवाहन संस्थेने केले आहे. (Mumbai biodiversity)
 
 
‘नेचर-रे’ ही ‘आरपीजी फाउंडेशन’च्या पाठबळातून सुरू झालेली पर्यावरणविषयक ना-नफा संस्था आहे. मुंबईतील जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईच्या परिसरात पूर्वी स्थानिक जंगले, खारफुटी आणि पाणथळ जागा मोठ्या प्रमाणात होत्या. मात्र, १९९१ पासून शहराने आपल्या हिरव्या आच्छादनापैकी जवळपास ४० टक्के भाग गमावल्याचा संशोधनाधारित अंदाज आहे. उरलेली हिरवाईही अनेक ठिकाणी तुकड्यांत विभागली गेली असून, विदेशी प्रजातींचे वर्चस्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून शहराच्या विविध भागांत जैवविविधतेचे छोटे अधिवास विकसित करून त्यांना जोडण्याचा प्रयत्न ‘द नेस्ट’ या संकल्पनेच्या आधारे फाऊंडेशन करत आहे. अशा ‘स्टेपिंग स्टोन’ अधिवासांमुळे पक्षी, फुलपाखरे, परागीभवन करणारे जीव आणि इतर शहरी वन्यजीवांना शहरात अधिक मुक्तपणे हालचाल करता येईल, अशी संस्थेची अपेक्षा आहे.
 
 
‘नेचर-रे’च्या ग्रीन कॉरिडॉर उपक्रमाअंतर्गत मलबार हिल येथे निर्माण केलेले ‘द नेस्ट’ हा या संकल्पनेचा प्रारंभिक नमुना आहे. ‘विंग्ज अँड रूट्स’च्या माध्यमातून शहरातील लहान हिरव्या जागांना अधिवासांच्या साखळीत जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘विंग्ज अँड रूट्स’च्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या परिसरातील वन्यजीवांची नोंद करावी आणि स्थानिक अधिवास विकसित करावेत. प्रत्येक सहभाग विकसित केलेली बाग, अंगण किंवा गच्ची ही या साखळीतील आणखी एक स्टेपिंग स्टोन ठरेल,” असे ‘नेचर-रे’च्या संस्थापक आणि आरपीजी फाउंडेशनच्या संचालक राधा गोएंका यांनी सांगितले.
 
 
या उपक्रमासाठी ‘विंग्ज अँड रूट्स’ अॅपचा वापर करता येणार आहे. नागरिकांना आपल्या परिसरातील झाडे, पक्षी आणि इतर सजीवांची नोंद करण्याची सुविधा त्यातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. औपचारिक पर्यावरणीय सर्वेक्षणांचे महत्त्व कायम ठेवून नागरिकांच्या सहभागातून जैवविविधतेच्या नोंदी शहराच्या दैनंदिन जीवनाशी जोडण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या नेटवर्कचा विस्तार झाल्यास शहरात सलग हिरवा पट्टा निर्माण होऊन तापमान नैसर्गिकरीत्या कमी होण्यास आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका फाऊंडेशनने मांडली आहे.




संबंधित मजकूर