कायद्याच्या पुस्तकांपासून रंगमंचाच्या प्रकाशझोतात आणि एकांकिकांच्या स्पर्धांपासून राष्ट्रीय पुरस्काराच्या व्यासपीठापर्यंतचा अभिजीत अरविंद दळवींचा प्रेरणादायी प्रवास...
कायद्याची पुस्तके समोर ठेवून भविष्याचा विचार करणारा तरुण आणि त्याचवेळी रंगमंचाच्या प्रकाशझोतात पात्रांच्या माध्यमातून जगण्याचा अर्थ शोधणारा कलाकार म्हणजेच, अभिजीत अरविंद दळवी. एका बाजूला ‘मास्टर्स इन बिझनेस लॉ’चे शिक्षण, ‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ची पदवी आणि पुढे मुंबईच्या उच्च न्यायालयातील कायद्याची वाटचाल; तर दुसर्या बाजूला नाटक, एकांकिका, अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि चित्रपट! सुरक्षित व्यावसायिक वाट निवडतानाही, त्यांनी मनातल्या कलाकाराला कधीही शांत बसू दिले नाही.
अभिजीत यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे आजोबा एका कारखान्यात ‘युनियन लीडर’ होते, तेथे कामगार नाट्याचीही परंपरा होती. त्यांच्या वडिलांनीही लहानपणी नाटकांमध्ये काम केले होते. वडिलांना कवितेचीही विशेष आवड असल्याने घरात नाटक, कविता आणि संगीताचे वातावरण असे. यातूनच अभिजीत यांच्यात अभिनयाची बीजे रुजली. अहिल्यानगरच्या ‘समर्थ विद्यामंदिर’मध्ये शिक्षण घेताना, त्यांच्या नकला करण्याच्या आवडीला एका शिक्षकांनी दिशा दिली. त्यानंतर कथाकथन, एकपात्री अभिनय, जाहिरात सांगणे, नाट्यछटा आणि वक्तृत्वासारख्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली. यात त्यांना अनेक बक्षिसेही मिळाली. मात्र, अभिनय हेच आपले भविष्य असेल, असे त्यांना वाटत नव्हते.
‘सारडा महाविद्यालया’मध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेताना, मंगेश जोशी या शिक्षकांचा परिचय झाला. त्यांनी अभिजीत यांच्यातील कलागुण हेरून त्यांना एकपात्री स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मार्गदर्शन केले. पुढे ‘सारडा महाविद्यालय’, ‘रोटरी क्लब’ आणि ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’सारख्या व्यासपीठांवरील स्पर्धांत अभिजित यांनी यश मिळवले. एकपात्री अभिनयाने आलेल्या आत्मविश्वासामुळेच, पुढे एकांकिकेची दारे उघडली. एकांकिकेची फारशी माहिती नसतानाही, त्यांनी या माध्यमात प्रवेश केला. मिलिंद शिंदे यांच्यासारख्या कलाकारांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. शमीम शेख आणि मिलिंद शिंदे यांच्या कार्यशाळांतून प्रशिक्षण घेतल्यानंतर, ‘जाणून बुजून’ या नाटकाने त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाला महत्त्वाचे वळण दिले. एका भूमिकेपासून सुरुवात करून, नंतर आठ-दहा भूमिका करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेतही यश मिळाले. संतोष पवार आणि सतीश लोटकेंसारख्या दिग्दर्शकांकडून, अभिनयाची व्याप्ती आणि रंगभूमीची शिस्त शिकता आली.
पुण्यातील शिक्षण काळात, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एकांकिका बसवण्यासाठी त्यांना बोलावले जाऊ लागले. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम करताना ,लेखनही आपल्यालाच करावे लागेल, याची जाणीव त्यांना झाली. ‘सिम्बायोसिस’मध्ये असताना त्यांनी, "An Interview' ही पहिली एकांकिका लिहिली. ‘जाहला सोहळा अनुभव’ ही एकांकिका, त्यांच्या प्रवासातील निर्णायक ठरली. २००९ मध्ये या एकांकिकेने, महाराष्ट्रभर त्यांना ओळख मिळवून दिली. कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह विविध स्पर्धांमध्ये, या एकांकिकेने यश मिळवले. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही स्तरांवर, त्यांच्या कामाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. याच काळात त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीनेही वेग घेतला. २००९ मध्ये ‘मास्टर्स इन लॉ’ पूर्ण केल्यानंतर, त्यांनी मुंबईत येऊन, उच्च न्यायालयात काम सुरू केले.
नाटकातून चित्रपटाकडे वळताना, त्यांनी चित्रपटाची स्वतंत्र दृश्यभाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला. ‘कोविड’च्या काळात ‘कुंकूमार्चन’ ही लघुपटाची संकल्पना त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. मर्यादित तांत्रिक साधनांमध्येही कथाकथनाच्या ताकदीवर त्यांनी विश्वास ठेवला. या चित्रपटाला २१ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, ‘एडमंटन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अधिकृत निवड व स्क्रीनिंग झाले. मेलबर्नसह इतर महोत्सवांमध्येही हा चित्रपट पोहोचला. ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कुंकूमार्चन’ला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सन्मान मिळाला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अभिजीत दळवींना ‘रजतकमळा’ने गौरवण्यात आले.
त्यानंतर ‘कालसर्प’ या चित्रपटातून विक्रम गोखले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली. दळवींच्या शब्दांत विक्रम गोखले हे एक विद्यापीठ आहेत. संवाद नसलेल्या ‘कालसर्प’ने, दृश्यांच्या माध्यमातून कथा सांगण्याचा प्रयोग केला. यालाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आणि पुढे ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "Best Short Film' चा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर ‘हमसफर’ आणि ‘भेळ’ यांसारख्या लघुपटांवरही त्यांनी काम केले.या प्रवासात विनय आपटे, विक्रम गोखले, सुनील बर्वे, विजय पाटकर, नरेंद्र फिरोदिया, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांसारख्या व्यक्तींचेही मार्गदर्शन त्यांना मिळाले.
एकांकिकेच्या रंगमंचापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत, कायद्याच्या क्षेत्रापासून चित्रपटाच्या दृश्यभाषेपर्यंत आणि स्थानिक कलाकारांसोबतच्या प्रयोगांपासून आंतरराष्ट्रीय महोत्सवांपर्यंत अभिजित यांचा प्रवास विस्तारला आहे. आजही नव्या लघुपटांसोबतच, चित्रपट आणि ‘ओटीटी’साठी लेखन सुरू आहे. एका छोट्या शहरातून सुरू झालेला कलाप्रवास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला, तरी पुढची कथा अजून लिहिली जात आहे. अभिजीत दळवी यांच्या भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप खूप शुभेच्छा!