"जर मला व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून पैसे मिळाले नसते, तरीही मी अगदी फुकट (काहीही न घेता) फुटबॉल खेळलो असतो,” या लक्षवेधी वायातच, दिग्गज लिओनेल मेस्सीची सॉकर निष्ठा अधोरेखित होते. फुटबॉल त्याच्यासाठी केवळ खेळ नसून, ती तर त्याची जणू मूलभूत गरज आहे. त्यामुळे हा खेळ तो केवळ खेळलाच नाही, तर अक्षरशः जगला. या जगण्यातील त्याचा प्रवास संघर्षाने भरलेला होता. घरची परिस्थिती जेमतेमच. चरितार्थ चालवण्यासाठी त्याचे आई-बाबा मजुरी करत. घरात असलेल्या आजीने त्याच्या फुटबॉलप्रेमाला ओळखले आणि प्रोत्साहन दिले.
मेस्सीने ‘ब्लाईंड साईड’ या हॉलीवूड चित्रपटातील मायकेल ओहेरची भूमिका खरीखुरी जगली, दोघेही समदुःखीच. एकाला वर्णभेदाचा फटका, तर दुसर्याला दुर्मीळ आजाराचे निदान. गरिबी मात्र दोघांच्याही पाचवीलाच पुजलेली होती आणि संघर्ष काही त्यांची पाठ सोडत नव्हता. मात्र, तरीही ते दोघेही यशस्वी झाले.
वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी मेस्सीला ‘ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी’ नावाच्या दुर्मीळ आजाराचे निदान झाले. या आजारामुळे, त्याच्या शरीराची वाढ खुंटली होती. पण, उपचाराचा अफाट खर्च कुटुंबाच्या आवायाबाहेरचा होता. अखेर वयाच्या १३व्या वर्षी मेस्सीच्या प्रतिभेची चुणूक पाहून, स्पेनच्या बार्सिलोना लबने त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी मेस्सीला त्याचे घर, कुटुंब आणि देश सोडून स्पेनला जावे लागले. पुढे अर्जेंटिनाकडून खेळताना, त्याच्यावर मायदेशातीलच चाहत्यांकडून प्रचंड टीका झाली. बार्सिलोना लबकडून खेळताना तो जीवतोड खेळतो; मात्र अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून खेळताना तो मनापासून खेळत नाही, असा अविश्वासही त्याच्यावर दाखविण्यात आला. पण यानेही तो खचला नाही, उलट संघर्षाने तो अधिक भक्कम झाला.
२०१४ची ‘फिफा विश्वचषक’, २०१५ची ‘कोपा अमेरिका’ आणि २०१६ची ’कोपा अमेरिका सेंटेनारियो’ अशा सलग तीन स्पर्धांमध्ये, अर्जेंटिनाला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. त्यामुळे हताश झालेल्या मेस्सीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. मात्र, तितक्याच तातडीने त्याने ती निवृत्ती मागेही घेतली. हाच निर्णय त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.
२०२१च्या ’कोपा अमेरिका’ स्पर्धेत मेस्सीने, आपल्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलविरुद्ध विजय मिळवून देत प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. २०२२ फिनालिसिमा स्पर्धेत, युरो कप विजेत्या इटलीला नमवून अर्जेंटिनाने ऐतिहासिक बाजीही मारली. २०२२ची ’फिफा वर्ल्डकप’ स्पर्धा तर मेस्सीच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षणच. कतार येथे झालेल्या विश्वचषकात, मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने सरशी साधत, देशाला ३६ वर्षांनंतर विश्वविजेता केले. २०२४च्या कोपा अमेरिका स्पर्धेत, मेस्सीच्या संघाने आपले वर्चस्व कायम राखत सलग दुसर्यांदा कोपा अमेरिका चषकावर नाव कोरले.
त्याच्याकडे फुटबॉलची अफाट विद्वत्ता आहे. त्याच्या विलक्षण अशा ड्रिबलिंग कौशल्याने, भल्या भल्या बचावपटूंच्या हातावर तुरी दिली. चेंडू हा त्याच्या पायाला फेविकॉलसारखा चिकटलेलाच असतो. तो अत्यंत कमी जागेत आणि अधिक बचावपटूंना चकमा देण्यात अत्यंत माहिर आहे. वेग आणि दिशा यांच्यावर त्याचे कमालीचे नियंत्रण असून, धावताना तो वेग आणि दिशा बदलून बचावपटूंना चटकन फसवतो. विचारदृष्टी आणि खेळाची समज यांतही तो हुशारच. त्यामुळे गोल करण्याची संधी नसल्यास, तो सहकार्याला अचूक पास देतो. ‘लिनिकल फिनिशिंग’मध्ये त्याचा हातखंडा. त्याने आजवर बर्याचदा अशयप्राय वाटणारे गोल मारले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि लब अशा दोन्ही स्तरांवर त्याने, अभूतपूर्व यश संपादन केले.
फुटबॉलमधला तो दिग्गज झाला असला, तरी त्याचा स्वभाव कायम विनम्र राहिला. कदाचित बालपणापासूनचा संघर्ष त्याच्यासमोर जसाच्या तसा तरळत असावा. त्यामुळेच त्याने आपला विवेक यत्किंचितही ढळू दिला नाही. हेच त्याच्या स्वभावातले मोठेपण अनेकांना भावते. राष्ट्रीय जर्सीत तो आता मैदानात खेळताना दिसणार नसला, तरी लबस्तरीय स्पर्धेत त्याच्या खेळाची जादू नक्कीच पाहायला मिळेल.
- रोहित गुरव