मुंबई (Western Dedicated Freight Corridor) : देशातील मालवाहतूक व्यवस्थेला अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक बनविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तीन विभागांचे राष्ट्राला समर्पण येत्या उद्या, मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. यावेळी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए), उरण येथून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरील मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार असून, विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
भारतात सध्या ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे दोन प्रमुख मालवाहतूक मार्ग कार्यान्वित आहेत. ईस्टर्न कॉरिडॉर सुमारे १,३३७ किमी लांबीचा असून पंजाबमधील न्यू सहनेवाल ते बिहारमधील न्यू सोननगरदरम्यान धावतो. तर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुमारे १,५०६ किमी लांबीचा असून उत्तर प्रदेशातील न्यू दादरीपासून हरियाण, राजस्थान आणि गुजरातमार्गे महाराष्ट्रातील न्यू जेएनपीटीपर्यंत पोहोचतो. (Western Dedicated Freight Corridor)
दोन्ही कॉरिडॉर मिळून सुमारे २,८४३ किमीचे उच्च-क्षमतेचे समर्पित रेल्वे मालवाहतूक नेटवर्क तयार झाले आहे. या मार्गांमुळे औद्योगिक आणि उत्पादन केंद्रे बंदरे व प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्रांशी अधिक वेगाने जोडली जात आहेत. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे डबल-स्टॅक कंटेनर रेक्स महत्त्वाच्या बंदरांशी थेट जोडणे शक्य झाले आहे. परिणामी मालवाहतुकीचा वेग आणि वाहून नेण्याची क्षमता वाढली असून, पारंपरिक रेल्वे मार्गांवरील मालगाड्यांचा ताणही कमी झाला आहे. त्याचा थेट फायदा प्रवासी रेल्वे सेवांच्या परिचालनासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होण्यास होत आहे.
दरम्यान, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तिसऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील डानकुनि येथून सुरू होणारा हा प्रस्तावित मार्ग झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गे गुजरातला जोडण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्रात हा कॉरिडॉर समृद्धी महामार्गाला समांतर जोडण्याची व्यवहार्यताही तपासली जात आहे. दि. ८ सप्टेंबरचे लोकार्पण पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या विस्ताराला आणि देशातील आधुनिक मालवाहतूक व्यवस्थेला आणखी मोठी चालना देणारे ठरणार आहे. (Western Dedicated Freight Corridor)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.