काही व्यक्ती अशा असतात, ज्यांचे संघटनेच्या तथा समाजाच्या पायाभरणीत चिरंतन योगदान असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी संस्कारित असलेल्या कुटुंबात वाढलेले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी भगूरमधील देशभक्तीचे व समाजकार्याच्या संस्कारात तयार झालेले निष्ठावान कार्यकर्ते, माजी नगरसेवक विलास यशवंत कुलकर्णी यांचे दि. ३० ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. आज रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विलास कुलकर्णी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
विलास कुलकर्णी यांच्या निधनाने भगूर शहरातील संघपरिवार तथा भाजपचा एक निष्ठावान, तळमळीचा आधारस्तंभच ढासळला आहे. समाजातील सर्व घटकांशी आपल्या संवादकौशल्याने संपर्क साखळी निर्माण करण्याचे, संपर्कसूत्र बांधण्याचे काम विलास कुलकर्णी यांनी केले. भगूरसह नाशिक परिसरात भाजपचा विस्तार व्हावा, पक्षाच्या कामात स्थिरता यावी, पक्षाच्या विचारांचा प्रचार-प्रसार विविध स्तरांवर अनेक उपक्रमांमधून होत राहावा, यासाठी विलास कुलकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले. स्व. मधुकर अण्णा जोशी, स्व. श्रीधरपंत रहाणे, स्व. मधुकर शिंदे, स्व. रामदास आंबेकर, एकनाथराव शेटे, सहकार्यामध्ये मधुकर कापसे, अशोक लोया, प्रभाकर गायकवाड, स्व. दिलीप गायकवाड, स्व. दिलीप कातकाडे, स्व. रमेश शेटे, रवींद्र रहाणे, युनूस शेख, अनाजी कापसे, राजेंद्र शाह, शांताराम शेटे आदी सर्वांसह पक्षकार्यासाठी विलास कुलकर्णी सदैव कार्यरत असत. याशिवाय, विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम-उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
भगूर परिसरातील समाजातील सर्व ज्ञातीतील- मराठा, तेली, वंजारी, धनगर, सुतार, कुंभार, चांभार, जैन, मारवाडी, शिंपी, भिल्ल, वडार, सोनार, मुस्लीम, बेलदार अशा सर्व बारा बलुतेदार घटकांसोबत वैयक्तिक संवादातून त्यांचा सदैव संपर्क होता.
गावातील सामान्य नागरिकांपासून ते देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक मंत्री, खासदार, आमदारांपर्यंत संपर्क हे त्यांच्या संवादकौशल्याचे वैशिष्ट्य होते. त्यांना भेटलेला माणूस न हसता जावा, असे कधीही घडले नाही. कारण, विलास कुलकर्णी यांची खुमासदार विनोदीशैली. त्यांचे अतिशय मार्मिकपणे एखाद्याशी संवाद साधण्याचे कौशल्य हे समाजात आपलेपणाची जोडणी करण्याचे माध्यम ठरले. ‘व्यक्ती जोडणे’ हा त्यांच्या संवादातून घडणारा सामाजिक कार्यासाठी मोठा सकारात्मक परिणाम होता.
भगूरमधील सावरकर जन्मभूमी स्मारकाजवळ त्यांचे ‘लक्ष्मीनारायण मंदिर’ हे घर म्हणजे सावरकर स्मारक समितीचे पूर्वीचे कार्यालयच होते आणि पुढे सावरकर स्मारकास भेट देणार्या प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांसाठी तेच संपर्क कार्यालय ठरले. परंतु, विलास कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबाने नेहमी येणार्या सावरकरभक्तांचे हसतमुखाने स्वागतच केले.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अनेक व्यक्तिरेखांचा सुरेख संगम म्हणजे विलास कुलकर्णी हे व्यक्तिमत्त्व, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आपले संवादकौशल्य, बुद्धिमत्ता व वागणुकीचा उपयोग सद्विचार, राष्ट्रविचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करणे, हाच त्यांचा ध्यास. तसेच कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही, तरी विलास कुलकर्णी आवर्जून फोन करायचे आणि मनातील भाव प्रकट करायचे, प्रसंगी परखडपणे मतही मांडायचे. पण, आज आपल्या सहज वागण्यातून समाजाच्या सर्व ज्ञातींना सातत्याने जोडणारा हा सद्भावनेचा दूत हरपला आहे.
पक्षाच्या विचारांचा निष्ठावंत, सर्वांना आपला माणूस वाटणार्या विलास कुलकर्णी यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याच्या निधनाने फक्त भाजपचेच नव्हे, तर सुदृढ अशा समाजाचीदेखील खूप मोठी हानी झाली आहे. त्यांचे सद्वर्तन, संस्कार सदैव भावी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी व अनुकरणीय ठरतील. त्यांच्या सद्गुणांचे आचरण करणे, हीच त्यांना सर्वार्थाने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
साधना अखंड साधना, संघ साधना
राष्ट्र देवता की पूजा, संघ साधना
व्यक्ती व्यक्ती जोडूनी, माला गुंफणे
हीच आमुची साधना, संघ साधना..
प्रा. डॉ. मृत्युंजय कापसे
(लेखक भगूर नगर परिषद, नाशिकचे नगरसेवक आहेत.)
९८६०३१०१३०