रेल्वे सुरक्षेसाठी ‘मिशन मोड’मध्ये मोहीम; निष्काळजी पुरवठादारांना कायमचे ब्लॅकलिस्ट

 
Railway Safety Mission Mode
 
मुंबई (Railway Safety Mission Mode): रेल्वेच्या सुरक्षेतील तांत्रिक आणि देखभालविषयक त्रुटींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील रेल भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.(Railway Safety Mission Mode)
 
या बैठकीला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, बोर्डाचे सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच झोनल रेल्वेचे महाव्यवस्थापक उपस्थित होते. रेल्वे नेटवर्कमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तांत्रिक त्रुटी, देखभाल व्यवस्था आणि दर्जाहीन साहित्याचा पुरवठा या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.(Railway Safety Mission Mode)
 
रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेशी संबंधित तांत्रिक त्रुटी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. या त्रुटींची दुरुस्ती नियमित प्रक्रियेत न ठेवता ‘मिशन मोड’मध्ये करण्याचे निर्देश वैष्णव यांनी दिले. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनशी संबंधित यंत्रणा सुरक्षित आणि कार्यक्षम राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यास सांगण्यात आले.(Railway Safety Mission Mode)
 
रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड इक्विपमेंट मधील ज्या घटकांनी निर्धारित सेवा आयुष्य पूर्ण केले आहे, त्यांची देखभाल आणि आवश्यकतेनुसार तातडीने बदली करण्याचे निर्देश देण्यात आले. या घटकांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी आणि देखभालीला प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले.(Railway Safety Mission Mode)
 
कार्यशाळांमधील देखभाल मानके सुधारण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. विशेषतः प्रवासी डब्यांमधील विद्युत सर्किट आणि वायरिंगची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेची सुरक्षितता आणि देखभाल अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले.(Railway Safety Mission Mode)
 
रेल्वेसाठी साहित्य आणि उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबाबतही रेल्वेमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली. सिग्नलिंग-टेलिकम्युनिकेशन, ओव्हरहेड इक्विपमेंट, ट्रॅक, कोच किंवा वॅगनशी संबंधित साहित्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधित पुरवठादारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास संबंधित पुरवठादाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे साहित्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर वाढली आहे.(Railway Safety Mission Mode)
 
कोच आणि मालवाहू वॅगनच्या कपलर तसेच चाकांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले. त्याचबरोबर ट्रॅकच्या देखभालीसाठी पॉइंट मशीन, टर्नआउट आणि फास्टनर्सची योग्य तपासणी व देखभाल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आगामी सण, यात्रा आणि मेळ्यांच्या काळात प्रवाशांची अचानक वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आधीपासून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता असल्यास संबंधित जिल्हा आणि राज्य प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक व्यवस्था करण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी केवळ अपघातानंतर उपाययोजना न करता तांत्रिक त्रुटी, देखभाल आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे.(Railway Safety Mission Mode)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर