७०० डिजिटल व्हिडिओ अन् बालविवाह रोखणारे ’माऊली’ हाथ; महाराष्ट्राच्या चार आदर्श शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    06-Sep-2026   
 
National Teacher Award 2026
 
नवी दिल्ली (National Teacher Award 2026) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून, दि. ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित अत्यंत दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील चार आदर्श शिक्षकांना ’राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी प्रतिपादन केले की भारताला ’विकसित भारत’ बनवण्याचे स्वप्न केवळ आणि केवळ देशातील शिक्षकांच्याच हाती आहे. जो समाज आपल्या शिक्षकांचा मनापासून आदर करतो, तोच खर्‍या अर्थाने प्रगती करू शकतो," केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशभरातील उत्कृष्ट शिक्षकांमध्ये महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश असून, त्यांच्या कल्पक, डिजिटल आणि सामाजिक प्रयोगांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. युट्युबवर ७०० हून अधिक गणिताचे व्हिडिओ बनवून हा विषय सोपा करणारे लातूरचे वैभव कुलकर्णी असोत, की ऊसतोड कामगारांच्या मुलींचे बालविवाह रोखून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार्‍या नाशिक आणि बीडच्या शिक्षिका असोत; या चारही शिक्षकांनी राज्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
 
 
 
पुरस्काराने सन्मानित झालेले महाराष्टाचे शिक्षक आणि त्यांचे कार्य
 
१. वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) - गणिताचे डिजिटल ’गुरू’:विद्यार्थ्यांच्या मनातली गणिताची भीती घालवून हा विषय खेळकर बनवला. अत्यंत अल्पखर्चात तयार केलेल्या शैक्षणिक साधनांसह ‘ मॅथ्य मेड इझी युट्युब चॅनेलवर गणिताचे ७०० हून अधिक व्हिडिओ अपलोड केले. त्यांच्या या डिजिटल प्रयोगाचा फायदा आज देशातील लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी होत आहे. (National Teacher Award 2026)
 
२. कुंदा बच्छाव (नाशिक) - वंचितांसाठी शिक्षणाचा ’लोकनिधी’: वर्गाच्या चार भिंतीबाहेर जाऊन संपूर्ण गावात ’ज्ञानभिंती’ उपक्रम राबवला. गरिबीमुळे शिक्षण सुटणार्‍या १५० हून अधिक मुलींचे बालविवाह रोखले आणि सोशल मीडियातून लोकनिधी उभा करून त्यांचे शिक्षण पूर्ववत केले. महानगरपालिकेच्या मुलांना थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवादाची आणि ’इस्रो’ची सफर घडवून आणली.
 
३. डॉ. कविता गिट्टे (बीड) - ’कोयता बंद, माऊस हाती’ मोहीम:गेल्या २९ वर्षांपासून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी जीवन समर्पित केले. उसाच्या फडावर भटकणार्‍या मुलांच्या, विशेषतः मुलींच्या हातातील ’कोयता’ सोडवून ’माऊस’ आणि पुस्तके दिली. त्यांच्या प्रभावी समुपदेशनामुळे हजारो मुलींचे बालविवाह टळले आणि आज त्यांचे २५०० हून अधिक विद्यार्थी मोठ्या सरकारी पदांवर कार्यरत आहेत. (National Teacher Award 2026)
 
४.शिवप्रसाद टिंगरे (सातारा) - देशाचे भावी सैनिक घडवणारे ’शास्त्रज्ञ’:पुस्तकी अभ्यासाला फाटा देत विज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडणारी प्रयोगशील शिक्षण पद्धती विकसित केली. सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण करून देशसेवेची आवड निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एनडीए परीक्षा उत्तीर्ण करून लष्करात अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. (National Teacher Award 2026)
 
सोहळ्याची वैशिष्ट्ये
 
एकूण ८२ शिक्षकांचा सन्मान: यावर्षी केवळ शालेय शिक्षकांचाच नाही, तर देशातील एकूण ८२ उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

१. श्रेणीनिहाय विभागणी : या ८२ पुरस्कार विजेत्यांमध्ये ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रशिक्षक सामील होते.
 
२. लिंग गुणोत्तर : ४८ शालेय शिक्षकांमध्ये २६ पुरुष शिक्षक आणि २२ महिला शिक्षिकांचा समावेश होता. हे सर्व शिक्षक देशातील २७ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले गेले होते.

३. लघुपट सादरीकरण : विज्ञान भवनातील सोहळ्यादरम्यान प्रत्येक पुरस्कार विजेत्या शिक्षकाने त्यांच्या शाळेत केलेल्या उत्कृष्ट कार्यावर आणि प्रयोगांवर आधारित एक लहान डॉक्युमेंट्री (लघुपट) सर्व उपस्थितांना दाखवण्यात आली.

४ पुरस्काराचे स्वरूप : एक चांदीचे पदक,एक प्रमाणपत्र, रु. ५०,०००/- रोख रक्कम
 
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८२ शिक्षकांशी संवाद साधला संवादातील मुख्य मुद्दे:
 
१. बालपण जपा: शिक्षकांनी स्वतःमधील आणि विद्यार्थ्यांमधील ’बालपण’ जिवंत ठेवून त्यांच्याशी भावनिक नाते जोडले पाहिजे.
 
२. मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा : शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून मुलांचे स्क्रीन टाईम कमी करावे आणि त्यांना मैदानी खेळ, शारीरिक व्यायाम व सर्जनशील कामांकडे वळवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
 
३. अमली पदार्थांबद्दल जागरूकता : शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बदलत्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवावे आणि त्यांना ड्रग्जच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी सातत्याने जागरूक करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
४. मातृभाषा आणि कौशल्य विकास : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण आणि वर्गाबाहेरील जगाचे ज्ञान देण्यावर त्यांनी भर दिला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा निर्माण होईल.
 
’सोशल मीडिया नेटवर्क’ तयार करण्याचा सल्ला
 
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील चारही शिक्षकांना (वैभव कुलकर्णी, कुंदा बच्छाव, डॉ. कविता गिट्टे आणि शिवप्रसाद टिंगरे) एकत्र संबोधित करताना एक विशेष सुचवले:"तुम्ही सर्वांनी मिळून समाजमाध्यमांवर एक ’राष्ट्रीय आदर्श शिक्षक नेटवर्क’ तयार करावे. महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणाचा पॅटर्न किंवा गणिताचे डिजिटल व्हिडिओ जसे उत्तर प्रदेश, बिहार किंवा ईशान्येकडील राज्यांतील शिक्षकांपर्यंत पोहोचतील, असा प्रयत्न करा. यामुळे देशातील इतर शिक्षकांनाही तुमच्या यशस्वी तंत्रांचा थेट फायदा होईल. (National Teacher Award 2026)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर