मुंबई (Nasha Mukt Bharat 2029) : नक्षलवादाची जवळपास सहा दशकांची समस्या संपवल्यानंतर आता देशाच्या तरुणाईला नशेच्या विळख्यातून मुक्त करण्याची निर्णायक लढाई सुरू झाली आहे. “नक्षलमुक्त भारत झाला, आता नशामुक्त भारत घडवूया,” असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. २०२९ पर्यंत भारताला नशामुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून तीन वर्षांचा मिशन मोड रोडमॅप तयार करण्यात आला असून, ही लढाई केवळ ड्रग्ज जप्त करण्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण तस्करीचे नेटवर्क, आर्थिक साखळी आणि मागणीवर एकाच वेळी प्रहार करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः भारतातील सर्वच राज्यांना भेट देणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवार, दि. ६ सप्टेंबरपासून गोव्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शाह यांनी नार्कोटिक्स नियंत्रण आणि नशामुक्त भारत अभियानावर केंद्र सरकारच्या उपाययोजनांची माहिती देणारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ही होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, २०१९ नंतर नार्कोटिक्सविरोधातील कारवाईला राष्ट्रीय सुरक्षेच्या प्राधान्याचा दर्जा देण्यात आला. पूर्वी वेगवेगळ्या यंत्रणा स्वतंत्रपणे कारवाई करत असत; मात्र आता केंद्र, राज्य, पोलीस आणि विविध केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्यात आला आहे. चार-स्तरीय एनसीओआरडी यंत्रणा, राज्यांतील अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स आणि संयुक्त समन्वय समितीच्या माध्यमातून मोठ्या नेटवर्कवर कारवाई केली जात आहे. (Nasha Mukt Bharat 2029)
Our vision document and roadmap (for drug control and achieving a Nasha Mukt Bharat) are based on four pillars:
1. Intelligence and operations-based enforcement. 2. Control of precursor and synthetic drugs. 3. Demand and harm reduction. 4. Coordination.
२०१४ ते जुलै २०२६ या काळात १ कोटी १९ लाख किलोपेक्षा अधिक नार्कोटिक्स व सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त करण्यात आले. या जप्तीची किंमत तब्बल १ लाख ८९ हजार कोटी रुपये असल्याचे रोडमॅपमधील आकडेवारीत नमूद आहे. २००४-१४च्या तुलनेत जप्तीचे प्रमाण ४.६० पट आणि मूल्य ४.७० पट वाढले आहे. ड्रग्जविरोधातील कारवाईसोबतच त्यातून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशावरही प्रहार केला जात आहे. २०२४ ते जून २०२६ दरम्यान ३,०१६ प्रकरणांत १,८४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. जून २०२२ ते जून २०२६ दरम्यान विविध यंत्रणांनी ३३.७७ लाख किलो ड्रग्ज नष्ट केले. (Nasha Mukt Bharat 2029)
१०० नेटवर्क उद्ध्वस्त, १०० फरार आरोपी भारतात आणणार
२०२६ ते २०२९ हा कालावधी मिशन मोडमध्ये राबवला जाणार असून मार्च २०२९ पर्यंत १०० आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे तसेच १०० फरार आरोपींना भारतात आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डार्कनेट, क्रिप्टो पेमेंट, एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन आणि कुरिअरच्या माध्यमातून होणाऱ्या तस्करीवरही तंत्रज्ञानाच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे. गुप्त सिंथेटिक ड्रग्ज लॅब उद्ध्वस्त करण्यासाठीही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
५० कोटी नागरिकांपर्यंत नशामुक्तीचा संदेश
ड्रग्जची मागणी कमी करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५० कोटी नागरिकांपर्यंत अभियान पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. एनसीसी, एनएसएस आणि ‘माय भारत’च्या माध्यमातून एक लाख ‘नशामुक्ती मित्र’ तयार केले जाणार आहेत. नशेच्या आहारी गेलेल्यांसाठी उपचार व पुनर्वसनाची यंत्रणाही विस्तारली जाणार असून नशामुक्ती केंद्रांची संख्या १,७५१ पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. “नशामुक्त भारत ही केवळ सरकारची जबाबदारी नाही; समाजातील प्रत्येक घटकाने ही लढाई लढली पाहिजे,” असे आवाहन शाह यांनी केले. २०४७च्या विकसित भारतासाठी नशामुक्त युवा शक्ती ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवादावर निर्णायक विजय मिळवल्यानंतर आता नशेच्या साम्राज्यावर अंतिम प्रहार करण्याचा केंद्राचा निर्धार आहे. (Nasha Mukt Bharat 2029)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.