डॉ. श्रीपाद ढेकणे : विद्यार्थी चळवळीपासून सार्वजनिक जीवनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

    06-Sep-2026
 
Dr. Shripad Dhekane
 
डॉ. श्रीपाद ढेकणे हे नाव केवळ एका व्यक्तीचे नव्हते, तर ते संघटनशीलता, अभ्यासूवृत्ती, कार्यकर्त्यांप्रति असलेली आत्मीयता आणि शिक्षण क्षेत्रासाठी असलेल्या समर्पणाचे प्रतीक होते. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे शिक्षण, सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदार्‍यांपर्यंत पोहोचला. प्रत्येक जबाबदारी त्यांनी केवळ पद म्हणून नव्हे, तर कार्याची संधी म्हणून स्वीकारली. त्यांच्या निधनाने एका अभ्यासू, संवेदनशील आणि समर्पित कार्यकर्त्याची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : कार्यकर्त्याच्या जडणघडणीचा काळ
 
डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी १९८३ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ‘विद्यार्थी कार्यकर्ता’ म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. विद्यार्थी अवस्थेपासूनच संघटनकार्याची आवड, समाजातील प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी आणि तरुणांमध्ये काम करण्याची ऊर्जा त्यांच्यात होती. ‘अभाविप’मध्ये काम करताना त्यांनी ‘भाग प्रमुख’, ‘महाविद्यालय प्रमुख’ अशा विविध संघटनात्मक जबाबदार्‍या स्वीकारल्या. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे जिल्ह्यात ‘ग्रामीण विस्तारक’ म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सोलापूर जिल्हा संघटनमंत्री, शिवाजी विद्यापीठ संघटनमंत्री, तसेच पुढे कोकण आणि गोवा संघटनमंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्य केले.
 
या काळात त्यांचा मोठा प्रवास झाला. संघटनविस्तारासाठी गावोगावी, महाविद्यालयांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला. कार्यक्रम, आंदोलने, बैठका, प्रशिक्षणवर्ग आणि संघटनात्मक उपक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीला बळ देण्याचे काम केले. शहर कार्यकारिणीपासून प्रांत टीम आणि केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत विविध स्तरांवर त्यांनी ‘अभाविप’मध्ये जबाबदार्‍या पार पाडल्या. मात्र, त्यांच्या कार्याची खरी ओळख पदांपेक्षा वेगळी होती. कार्यकर्ता जपणे, त्याची काळजी घेणे आणि त्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहणे, हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. पूर्णवेळ कार्यकर्ता असो किंवा नंतरच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेला कार्यकर्ता असो, त्यांच्याशी असलेले नाते त्यांनी कधीही तुटू दिले नाही.

प्राध्यापक म्हणूनही कार्यकर्त्याची भूमिका कायम
 
व्यक्तिगत जीवनाला सुरुवात केल्यानंतर डॉ. ढेकणे यांनी खडकी येथील टी. जे. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अध्यापन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतरही ‘अभाविप’शी असलेला त्यांचा संबंध कायम राहिला. पुणे शहरातील ‘अभाविप’च्या कार्यात ते अनेक वर्षे सक्रिय होते. प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी ‘भारतीय मजदूर संघा’शी संबंधित ‘श्रम सेवा न्यास’च्या ‘विमर्श’ या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळातही कार्य केले. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जबाबदारी थांबली असली, तरी कार्यकर्त्याची भूमिका मात्र त्यांच्या आयुष्यातून कधीच संपली नाही.
 
अभ्यासूवृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक महत्त्वाची बाजू होती. अध्यापनाची कारकीर्द सुरू असतानाच त्यांनी ‘पीएचडी’ पदवी पूर्ण केली. ‘महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर त्यांनी विद्यापीठात प्रबंध सादर केला. सार्वजनिक प्रशासन, अर्थकारण आणि शिक्षण यांचा अभ्यास करण्याची त्यांची दृष्टी त्यांच्या पुढील कामातही दिसून आली.
 
कुटुंबवत्सल श्रीपादजी
 
सार्वजनिक जीवनात कितीही व्यस्त असले, तरी कुटुंबाशी असलेले त्यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. आई, पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब. एका मुलीचे लग्न झाले असून, त्यांच्या लहान नातवाशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. मुंबईत असतानाही ते दररोज रात्री व्हिडिओ कॉलवरून आपल्या नातवाशी संवाद साधत असत. आजोबा आणि नातवाचे हे नाते अत्यंत प्रेमळ आणि घट्ट होते. सार्वजनिक जीवनातील धावपळ, बैठका आणि जबाबदार्‍या यांच्यामध्येही कुटुंबासाठी वेळ काढण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारी होती.

भारतीय जनता पक्षातील संघटनात्मक कार्य
 
पुढील काळात डॉ. ढेकणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे भाजपचे प्रवक्ते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. लोकसभा, विधानसभा, तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये पुण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक जबाबदार्‍या स्वीकारल्या. पक्षसंघटन आणि निवडणूक व्यवस्थापन हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. निवडणुकीतील बारकावे समजून घेणे, संघटनात्मक नियोजन करणे, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य उपयोग करून रणनीती आखणे, यामध्ये त्यांना विशेष रस होता. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये, तसेच मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीतही ते सक्रिय होते. निवडणूक म्हणजे केवळ मतदानाचा दिवस नसून, त्यामागे दीर्घकालीन संघटन, नियोजन आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करावे लागते, याची त्यांना उत्तम जाण होती.
 
मंत्रालयातील महत्त्वपूर्ण योगदान
 
२०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विनोद तावडे यांनी ‘शिक्षणमंत्री’ म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्याकाळात डॉ. श्रीपाद ढेकणे शिक्षण मंत्रालयात ‘विशेष अधिकारी’ म्हणून कार्यरत होते. शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांचा सखोल अभ्यास करून ते प्रशासन आणि मंत्री कार्यालय यांच्यात प्रभावी समन्वय साधत असत. विद्यापीठ कायद्यातील बदल, खासगी विद्यापीठांचा विषय, शालेय शिक्षण, ग्रंथालये, प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील इतर अनेक विषयांवर त्यांनी विशेष लक्ष दिले. एखादा विषय केवळ कागदोपत्री पुढे नेण्यापेक्षा त्याचा अभ्यास करून त्यातील अडचणी समजून घेणे आणि योग्य तो मार्ग काढणे, ही त्यांची कार्यपद्धती होती.
 
२०२२ नंतर आणि पुढे २०२५ मध्ये फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात ‘विशेष अधिकारी’ म्हणूनही त्यांनी काम केले. या काळात शिक्षण विभागाशी संबंधित विषयांमध्ये त्यांनी विशेष लक्ष घातले. प्रशासन, मंत्री कार्यालय आणि प्रत्यक्ष कार्यरत यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक परिणामकारक व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
 
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत योगदान
 
डॉ. श्रीपाद ढेकणे यांच्या कार्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित त्यांचे काम. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
 
महाराष्ट्रातील शालेयस्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना विविध संस्थांमध्ये समन्वयाची आवश्यकता होती. बालभारती, राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यात योग्य समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले.
 
धोरण तयार करणे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी असते. ही दरी कमी करण्यासाठी प्रशासन, मंत्री कार्यालय, सुकाणू समिती आणि शिक्षण विभाग यांच्यात प्रभावी संवाद आवश्यक असतो. हा समन्वय साधण्यामध्ये श्रीपादजींचे योगदान महत्त्वाचे होते. शिक्षणातील बदल हा केवळ शासनाच्या निर्णयाने होत नाही; तर शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण शैक्षणिक यंत्रणेच्या सहभागातून घडतो, याची त्यांना जाणीव होती.
 
कार्यकर्ता म्हणून कायम स्मरणात
 
डॉ. श्रीपाद ढेकणे यांच्या जीवनाकडे पाहिले, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते- पद बदलत गेले, जबाबदार्‍या बदलत गेल्या; पण कार्यकर्ता मात्र कायम राहिला. ‘अभाविप’मधील विद्यार्थी कार्यकर्ता, पूर्णवेळ संघटक, प्राध्यापक, अभ्यासक, संपादकीय मंडळातील सदस्य, भाजपचे प्रवक्ते, निवडणूक रणनीतिकार, मंत्रालयातील विशेष अधिकारी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतील समन्वयक अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. मात्र, प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांची मूळ ओळख होती- एक संवेदनशील, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांना जपणारा माणूस!
 
त्यांच्या सहवासात आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी श्रीपादजी हे केवळ वरिष्ठ नव्हते; ते मार्गदर्शक, मित्र आणि विश्वासाचा आधार होते. एखाद्या कार्यकर्त्याची अडचण ऐकून घेणे, त्याला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्याच्या पाठीशी उभे राहणे, हा त्यांचा सहज स्वभाव होता.
 
आज डॉ. श्रीपाद ढेकणे आपल्यात नाहीत. परंतु, त्यांनी उभे केलेले कार्यकर्ते, त्यांनी दिलेले मार्गदर्शन, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी निर्माण केलेली कार्यशैली ही त्यांच्या स्मृती जिवंत ठेवणारी आहे. श्रीपादजींचे जीवन म्हणजे विद्यार्थी चळवळीपासून शिक्षणव्यवस्थेपर्यंत आणि संघटनापासून प्रशासनापर्यंत अखंड कार्याचा प्रवास होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मात्र, त्यांनी दाखविलेला कार्यकर्त्याचा मार्ग, अभ्यासाची वृत्ती आणि माणसे जोडण्याची ताकद, हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल.

- ज्ञानेश्वर राक्षे




संबंधित मजकूर