काहींचे म्हणणे आहे की, "विद्यानंद बापटने गणेशोत्सवासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले, ते योग्य आहेत,” तर काहींचे म्हणणे, "बापटने हिंदू उत्सवांना ‘लष्कर-ए-उत्सव’ असे हिणवून दहशतवादीच ठरवले आहे.” समर्थनआणि विरोध या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी असलेल्या संतोष चव्हाण या तरुणाने ‘बापटांना दोन वाजवायचे आहे,’ असे म्हणत हल्लाही केला. अनेक विचारवंत, सर्वच राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेधही केला. तरीही, या घटनेचे तर्कनिष्ठ विवेचन होणे गरजेचे आहे. पण, या बहुचर्चित घटनेचा मागोवा घेताना जाणवते की, कुणी बुद्धिमत्तेचा आव आणत कितीही बडबड केली, तरी त्यांचे द्वेषपूर्ण अज्ञानी सत्य कालांतराने बाहेर येतेच. अशांना व्याकरण कोळून प्यायलेला आधुनिक ‘सखाराम गटणे’ म्हणावे की, संस्कृत भाषा वापरतो असे दाखवत भलतेच बरळणारा ‘तात्या विंचू’ म्हणायचे?
ते हल्ली म्हणतात ना, कुठच्या पार्सलमध्ये नेमके काय निघेल, हे आजकाल कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच ‘पर्यावरणरक्षक’ किंवा ‘मानवतावादा’च्या पार्सलमध्ये हिंदूविरोधी किंवा समाजविरोधी मानसिकता असलेली मंडळीही सर्रास आढळून येतात. या पार्श्वभूमीवर लेखक पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीने अजरामर झालेल्या ‘सखाराम गटणे’ या व्यक्तिरेखेच्या पद्धतीची भाषा बोलत, शून्यात नजर लावत ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्’ म्हणत स्वतःला अति-अति बुद्धिमान आणि महान समजत, अहंमन्यतेने ठार उर्मट झालेला विद्यानंद बापट याला सध्या काही लोकांनी डोक्यावर घेतले आहे. (हे माझे मत आहे आणि संविधानाने जसे बापट याला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे, तसा तो मलाही दिला आहे.) तर, देश-समाज अस्थिर करण्यासारखे असेल किंवा हिंदूंची बदनामी होत असेल, तरच काही तेच-तेच लोक किंवा त्याच-त्याच संघटना पावसाळ्यात बेडकांनी बाहेर यावे, तसे टणाटणा उड्या मारत बाहेर येतात. या अशा संघटना आणि लोकांचाही विद्यानंद बापट अल्पावधीत लाडका झाला. (अपवाद काही सज्जन लोकही समर्थन करतात.) पण, या संघटना का समर्थन करत असतील, याचा मागोवा घेतल्यावर सत्य बाहेर आलेच.
विद्यानंद बापट म्हणाला, "सण आणि उत्सवाच्या माध्यमातून दहशत पसरवली जाते. जसे ‘लष्कर-ए-तोयबा’, तसे ‘लष्कर-ए-उत्सव’ आहेत. मी नास्तिक आहे. तुम्ही गणपती बाहेर काढा अथवा काढू नका, मला फरक पडत नाही. ९९ टक्के मूर्ख लोक गणपतीचे दर्शन घ्यायला जातील. माझ्यासारखा एखादा शहाणा असेल, तो जाणार नाही. उत्सवच नको किंवा लग्नाच्या किंवा इतर मिरवणुका या शहराबाहेरून काढा,” ही असली संतापजनक विधाने करून हिंदूंचा उत्सव कसा समाजाला त्रासदायक आहे, हे धादांत खोटे ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न विद्यानंदने केला. त्यामुळेच ‘दिमागी नक्षल्यां’ना मोठा आनंद झाला, हेच सत्य आहे. अर्थात, मी हे लिहिले म्हणून विद्यानंदच्या भावना दुखावणार नाहीत. कारण, त्याचे स्वतःचे म्हणणे आहे की, "भावना म्हणजे काय डोके आणि छाती आहे दुखायला?”
दुसरीकडे, "मला दोन तरी वाजवू द्या, हा गणेशोत्सवावर का बोलला? मीडियाने या मूर्खाला डोक्यावर का घेतले?” असे म्हणत संतोष चव्हाण याने विद्यानंद बापटवर हल्ला केला. (मुद्द्यांचे उत्तर मुद्द्यांनीच द्यायचे असते. त्यामुळे या हल्ल्याचेे कदापि समर्थन होऊच शकत नाही!) पण, ही घटना घडल्यावर बापट म्हणाला की, "त्याच्यावर हल्ला करणारा व्यक्ती हा वेडा होता आणि प्रसिद्धीसाठी त्याने हे सगळे केले.” मात्र, यावर अनेकांचे म्हणणे आहे की, बापटवर हल्ला करणार्या व्यक्तीला पत्रकार बंधू-भगिनी सातत्याने विचारत होते, "तुमची भूमिका मांडा, तुमची भूमिका स्पष्ट करा.” तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, "माझी काही भूमिका नाही, मला काही भूमिका मांडायची नाही.” याचा अर्थ, त्या व्यक्तीला मीडियासमोर मुलाखती देऊन, मतं मांडून प्रसिद्ध व्हायचे नव्हते. आता यावरही काही लोक म्हणतील की, हल्लेखोराचे समर्थन कसे काय होऊ शकते? हल्लेखोराचे समर्थन नाही, तर बहुसंख्य लोकांचे म्हणणे इथे मांडले. याच आयामात ‘डीजेवर बंदी घाला’ अशी मागणी बापटने केली म्हणून, त्याला मारहाण झाली, असेही चित्र निर्माण झाले. पण, सर्व डीजे आणि प्रखर लेझर लाईटवर बंदी यावी, हे तर याआधीही हिंदू समाजातील अनेकांनी म्हटले आहे. मग बापटवर हल्ला का झाला? त्याच्यावर हल्ला करणारा तरुण कुठेही असे म्हणताना दिसला नाही की, "बापट डीजेबंदी करण्याची मागणी करतो म्हणून मी त्याला दोन वाजवणार आहे.” त्याचे म्हणणे होते की, "बापट हिंदूविरोधी, देव-श्रद्धाविरोधी आहे आणि काहीही बोलतो.” (अर्थात, आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार असलेल्यांवर हल्ला करू नयेच, विचारांचे उत्तर विचारांनीच द्यावे!)
पण, हल्ला करणार्या तरुणाचे आणि त्याचे समर्थन करणार्यांचे मत असे का झाले असेल? कारण, हजारो वर्षांच्या पारतंत्र्यामध्ये हिंदू समाजाने धर्मांधांचे अविरत अत्याचार भोगले आहेत. हिंदूंची शक्ती ही हिंदूंच्या धर्म-जाणिवेत आणि उत्सवप्रियतेत आहे, हे जाणून विध्वंसक शक्तींनी देव, धर्म आणि उत्सवांवर निर्बंधही टाकण्याचा प्रयत्न केला होता. एकदा दुधाने तोंड पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो. हजारो वर्षे संस्कृती आणि श्रद्धेवर झालेला आघात हिंदू समाज विसरू शकत नाही. त्यामुळेच विद्यानंद बापट ज्यावेळी गणेशोत्सवाला केंद्रस्थानी ठेवून डीजेबंदीबद्दल बोलतो, त्यावेळी समाजातील मोठ्या गटाला यात काहीतरी काळेबेरे दिसते आणि आग असल्याशिवाय धूर येत नसतो. हिंदूंचा असा दृष्टिकोन व्हावा, याला कारणीभूत समाजविघातक शक्ती आहेत. यानुसार, बापटने धर्म, समाज, परंपरा यावर व्यक्त केलेले विचार याचाही पुनर्विचार खुद्द बापट आणि त्याच्या समर्थकांनी करणे आवश्यक आहे. कारण, समाजसुधारणा करण्यासाठी त्या समाजाबद्दल आत्मीयता, प्रेम हवे. आपणच खूप विद्वान-महान आहोत आणि समाजाला काहीच कळत नाही, ही भूमिका निदान आजच्या काळात तरी चालणार नाही.
याबाबत स्वामी विवेकानंदांची एक प्रसिद्ध घटना आहे. तत्कालीन मद्रास येथील समाजसुधारकांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, "आपला हा भारतीय समाज किंवा राष्ट्र म्हणजे एक जुनी, भव्य राष्ट्रीय नौका आहे. जर आज या नौकेला (समाजाला) काही चुकांमुळे किंवा काळाच्या ओघात छिद्र पडले असेल, तर समाजसुधारकांनी समाजातल्या दोषांवर केवळ ओरडून, त्याला शिव्या देऊन किंवा समाजाचा तिरस्कार करून चालणार नाही. जर तुम्ही नौकेला लाथा मारल्या किंवा तिच्यावर आरडाओरडा केला, तर ती वाचणार नाही. उलट, ती अधिक वेगाने बुडेल. तिला दोष देऊ नका, तिचा द्वेष करू नका. आपल्या पूर्वजांनी केलेल्या उपकारांचे स्मरण ठेवा. आपल्या रक्ताचे पाणी करा आणि ही नौकेची छिद्रे बुजवा. सर्वांनी मिळून या नौकेला पुन्हा चालना द्या.”
स्वामी विवेकानंदांच्या या विचारानुसार ज्यांना-ज्यांना वाटते की, हिंदू समाजात काही चुकीच्या प्रथा निर्माण होत आहेत, त्यांनी समाजाला शिव्या देण्याऐवजी, कुचेष्टा-निंदा करण्याऐवजी समाजाला सोबत घेऊन त्यावर काम करावे. अर्थात, हे सगळे खर्या हिंदूचिंतकांसाठी आहे. या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापटची भूमिका कोणती, हा प्रश्न ‘टू बी ऑर नॉट टू बी’ सारखा अनिश्चित आहे. पण, त्याची भूमिका कशासाठीही असो, हिंदू समाजाने मात्र स्वतःमध्ये नेहमीच सकारात्मक बदल केला आहे. त्यामुळे आताही काळाची पावले ओळखत हिंदू आपले सण-उत्सव, रूढी-परंपरा, पारंपरिक धार्मिकतेने आणि तितक्याच उत्साहाने शाश्वत मानवी मूल्ये जपत साजरे करतात, यात शंका नाही. यापुढेही सण-उत्सव अशाप्रकारे साजरा करू की, समाजसुधारणेचा बुरखा पांघरत कुणालाही हिंदू श्रद्धेला, समाजाला विरोध करता आलाच नाही पाहिजे. नाहीतर मग आहेतच, हिंदूंना त्यांच्या श्रद्धांना विरोध करून प्रसिद्धी मिळवता येते पाहून प्रत्येक मीडियावर जाऊन तोंड वाजवत, सवंग प्रसिद्धीसाठी उतावीळ झालेले विद्यानंद बापटसारखे लोक! आता याला आधुनिक ‘सखाराम गटणे’ म्हणावे की, संस्कृत भाषेचा वापर करीत तर्काच्या नावाखाली भलतेच बरळणारा ‘तात्या विंचू’ म्हणायचे?
९५९४९६९६३८