'यूएसएस अब्राहम लिंकन'चे संकट आणि भारतासाठी धडे!

    06-Sep-2026   
 
USS Abraham Lincoln
 
कोणतेही युद्ध हे मनाच्या निर्धारावर लढले जाते. ज्या सैन्याचा निर्धार मोठा, त्याच्या विजयाची निम्मी दारे आधीच उघडली असतात. त्यामुळे सैन्याचे मनोबल राखण्यासाठी, सातत्याने सैन्यात प्रयत्न होतात. दीर्घ युद्धात हे मनोबलच, जय-पराजयातील अंतर ठरते. आज अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धात हीच बाब प्रकर्षाने दिसून येते. अमेरिकेच्या या अनुभवामागील कारणे आणि भारतासाठी असलेल्या धड्यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
अमेरिकेचे विमानवाहू युद्धनौका दल, हे जगातील सर्वांत शक्तिशाली लष्करी साधन मानले जाते. परंतु, अलीकडे ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या विमानवाहू नौकेच्या विक्रमी नऊ महिन्यांच्या तैनातीमुळे, अमेरिकन नौसैनिकांना आलेला थकवा, मानसिक ताणामुळे एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे, तो म्हणजे अमेरिकेकडे अत्याधुनिक शस्त्रे, प्रचंड अर्थव्यवस्था आणि जागतिक सामर्थ्य असूनही, दीर्घकालीन युद्ध एखाद्या महासत्तेलाही कमकुवत करू शकते का?
 
‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील परिस्थिती आधुनिक युद्धातील मानवी घटक, लष्करी सहनशक्ती, ‘लॉजिस्टिस’, पुरवठा साखळी आणि सैनिकांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करते. याचे परिणाम केवळ मध्य-पूर्वेतच नाहीत, तर संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सामरिक संतुलनावरही दिसत आहेत.
 
दीर्घ तैनातीमुळे निर्माण झालेला थकवा
 
सामान्यतः अमेरिकन विमानवाहू नौकांची तैनाती सहा ते सात महिन्यांची असते. परंतु, मध्य-पूर्वेतील तणावामुळे ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ आणि तिच्या युद्धगटाला जवळपास नऊ महिने समुद्रात राहावे लागले. अनेक नौसैनिकांनी पहिल्यांदाच सलग २५० दिवसांपेक्षा अधिक काळ, कोणत्याही महत्त्वाच्या बंदरभेटीशिवाय समुद्रात घालवला. समुद्रातील जीवन हे अत्यंत कठीण असते. मर्यादित जागा, सततची ड्युटी, कुटुंबापासून दूर राहणे, युद्धसज्जतेचा ताण आणि बंदिस्त वातावरणामुळे मानसिक तणाव वाढतो. त्यातच अन्नपुरवठा, स्वच्छ पाणी, निवासव्यवस्था आणि स्वच्छतागृहांशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास, परिस्थिती अधिकच गंभीर होते.
 
दीर्घकाळच्या या तैनातीमुळे सैनिकांमध्ये थकवा, चिडचिड, निर्णयक्षमता कमी होते आणि कार्यक्षमतेत घट दिसून येते. आधुनिक युद्धात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाचे असले, तरी त्याचे संचालन करणारा सैनिकच निर्णायक असतो. सैनिक मानसिकदृष्ट्या खचला, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रेदेखील अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत.
 
मानसिक आरोग्य आणि मनोबलाचा प्रश्न
 
अमेरिकन नौदलातील काही अहवालांमध्ये आत्महत्येचे विचार, नैराश्य आणि जहाजावरून उडी मारण्याच्या प्रयत्नांसारख्या गंभीर घटनांचाही उल्लेख आढळतो. जरी अमेरिकन नौदलाने अशा अहवालांचे महत्त्व कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला असला, तरी अमेरिकन संसदेतील काही सदस्यांनी मात्र या विषयावर चिंता व्यक्त केली आहे.
 
युद्धशास्त्रातील एक मूलभूत तत्त्व सांगते की, मनोबल हे युद्धातील अदृश्य शस्त्र आहे. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनने जर्मनीविरुद्ध आणि व्हिएतनाम युद्धात उत्तर व्हिएतनामने अमेरिकेविरुद्ध टिकून राहण्यामागे केवळ लष्करी क्षमताच नव्हे, तर सैनिक आणि समाजाचे मनोबलही महत्त्वाचे कारण ठरले होते. ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील परिस्थिती दर्शवते की, मानवी सहनशक्तीची मर्यादा ओलांडल्यास युद्धक्षमता घटते. थकलेल्या सैनिकांकडूनच चुका होण्याची शयता वाढते. विमान उड्डाणे, क्षेपणास्त्र प्रणाली, रडार ऑपरेशन्स किंवा समुद्री नाकेबंदीसारख्या जटिल मोहिमांमध्ये, अशा चुका गंभीर परिणाम घडवू शकतात.
 
अमेरिकेच्या लष्करी कार्यक्षमतेवर परिणाम
 
मध्य-पूर्वेत इराण आणि त्याच्या समर्थित गटांविरुद्ध, अमेरिकेला सातत्याने समुद्रात नौदल तैनात ठेवावे लागत आहे. लाल समुद्रातील ‘हुती’हल्ले, इस्रायल-इराण संघर्ष आणि आखाती प्रदेशातील अस्थिरता, यामुळेही अमेरिकन नौदलावर प्रचंड दबाव आहे. या परिस्थितीत युद्धसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. क्षेपणास्त्रे, दारुगोळा आणि इतर सामग्रीची पुनर्भरण प्रक्रियाही अपेक्षेपेक्षा अधिक वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे. पुरवठा साखळीवरील ताणामुळे, नौदलाच्या दीर्घकालीन मोहिमांवरही परिणाम होऊ शकतो.
 
सैनिकांचा थकवा आणि संसाधनांवरील ताणामुळे, अमेरिकेच्या जागतिक प्रतिसाद क्षमतेवर मर्यादा येतात. जगभरात एकाच वेळी अनेक संकटांना तोंड देण्याची क्षमता, ही अमेरिकेच्या सामरिक शक्तीची ओळख राहिली आहे. परंतु, जर एका प्रदेशातील संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि साधने गुंतून राहिली; तर इतर भागांतील उपस्थितीही कमकुवत होण्याची शक्यता वाढते.
 
इंडो-पॅसिफिकमध्ये निर्माण होणारी सामरिक पोकळी
 
अमेरिकेचे लक्ष मध्य-पूर्वेकडे वळल्याने, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील उपस्थितीवर परिणाम होत आहे. दक्षिण चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि पश्चिम पॅसिफिक हेच चीन-अमेरिका स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. जर अमेरिकेचे विमानवाहू नौकादल मध्य-पूर्वेत अडकून राहिले, तर चीनला या प्रदेशात तुलनेने अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. चीनने गेल्या दशकात दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेटे उभारून, त्यांचे लष्करीतळांमध्ये रूपांतर केले आहे. धावपट्ट्या, क्षेपणास्त्र प्रणाली, रडार नेटवर्क आणि नौदल सुविधा उभारून, चीनने या भागात आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अमेरिकन उपस्थिती कमी झाल्याचा फायदा घेत, चीन आपल्या दाव्यांना अधिक आक्रमकपणे पुढे रेटू शकतो. व्हिएतनाम, फिलीपिन्स आणि मलेशिया यांसारख्या देशांवरही त्यामुळे दबाव वाढू शकतो. चीनची सागरी ‘मिलिशिया’ आणि ‘कोस्ट गार्ड’ जहाजे, आधीच या भागात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.

दक्षिण चीन समुद्राचे वाढते महत्त्व
 
दक्षिण चीन समुद्रातून दरवर्षी ट्रिलियन्स डॉलर्स किमतीचा जागतिक व्यापार होतो. भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी आणि पूर्व आशियाशी व्यापारासाठीही हा सागरीमार्ग महत्त्वाचा आहे. जर चीनने या भागावर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित केल्यास त्याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे; तर भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि आसियान देशांवरही होईल. ‘मुक्त नौकानयना’चा सिद्धान्त कमकुवत झाल्यास, जागतिक व्यापार साखळीवरही परिणाम होऊ शकतो.
 
रशिया दर महिन्याला युक्रेन युद्धात, भरतीपेक्षा सहा हजार अधिक सैनिक गमावत आहे. रशिया दर महिन्याला सुमारे एक हजार सैनिकांची भरती करते; परंतु हा वेग युद्धात मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्यांपेक्षा कमी आहे. रशियाला युद्धात होणारी हानी आणि भरती यात दर महिन्याला सुमारे सहा हजार सैनिकांची तफावत आहे.
 
राजकीय आणि आर्थिक धोका
 
सैनिकांची सक्तीची भरती, रशियासाठी राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मोठा धोका ठरू शकतो. अशा प्रकारची शेवटची भरती २०२२च्या शरद ऋतूत झाली. यामुळे सुमारे दशलक्ष रशियन नागरिक (बहुतेक उच्च कौशल्य असलेले) देश सोडून गेले होते, त्यांपैकी निम्म्याहून कमीच परतले.

रशियन सैन्यासमोरील आव्हान
 
रशियन सैन्याला शेकडो-हजारो नवीन भरती झालेल्या सैनिकांना सामावून घेता येईल का, हे अद्याप स्पष्ट नाही. कारण, उपकरणे आणि अधिकार्‍यांची कमतरता आहे. युक्रेनने वारंवार रशियन तेलाशी संबंधित लक्ष्यांवर हल्ले केल्याने, इंधनाची टंचाई आहे.
 
रशिया, अमेरिका आणि इस्रायल यांसारख्या देशांनाही, युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर सैन्याची गरज आहे. त्यामुळे दीर्घकालीन युद्धासाठी प्रशिक्षित सैनिकांचा पुरवठा असणेही अत्यावश्यकच आहे. भारतात रिटायर झालेले ‘अग्निवीर’ सैनिक मोठ्या प्रमाणावर, रिझर्व्ह सैनिक म्हणून दिर्घकालीन युद्धासाठी सामील केले जाऊ शकतात.
 

भारतासाठी महत्त्वाचे धडे
 
दीर्घकालीन युद्धासाठी ‘लॉजिस्टिक’ क्षमता : रशिया-युक्रेन युद्ध, गाझा संघर्ष आणि ‘यूएसएस अब्राहम लिंकन’चा अनुभव एकच गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे युद्ध केवळ रणांगणावर जिंकले जात नाही; ते पुरवठा साखळी आणि ‘लॉजिस्टिस’वर जिंकले जाते. भारताने दारुगोळा, क्षेपणास्त्रे, इंधन आणि सुट्या भागांचा दीर्घकालीन साठा निर्माण करणे आवश्यक आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादन वाढवून, युद्धकाळातील बाह्य अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे.
 
सैनिकांच्या ‘रोटेशन’ची प्रभावी व्यवस्था
 
लडाख, सियाचीन, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील तैनाती दीर्घकालीन स्वरूपाच्या असतात. त्यामुळे सैनिकांचे नियमित ‘रोटेशन’, विश्रांती आणि पुनर्वसन यांना प्राधान्य देणेही आवश्यक आहे. मानवी संसाधन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास, सैनिकांचा थकवा युद्ध लढण्याच्या क्षमतेला क्षती पोहचवू शकतो. आधुनिक युद्धात सैनिकांचे मानसिक आरोग्यही, शस्त्रास्त्रांइतकेच महत्त्वाचे आहे.
 
मानसिक आरोग्य आणि मनोबल
 
भारतीय सशस्त्र दलांनी मानसिक आरोग्य कार्यक्रम, समुपदेशन, कुटुंबीयांशी संपर्क व्यवस्था आणि ताण व्यवस्थापन यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. भविष्यातील युद्धे अधिक प्रदीर्घ आणि बहुआयामी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनिकांचे मनोबल टिकवून ठेवणे, हीच राष्ट्रीय सुरक्षेची गरज आहे.

इंडो-पॅसिफिक भागीदारी अधिक बळकट करणे
 
भारताने जपान, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, फिलीपिन्स आणि अमेरिकेसोबतचे संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. ‘क्वाड’, समुद्री सराव, माहितीची देवाणघेवाण आणि सागरी क्षेत्र जागरूकता यांचा विस्तारही गरजेचा आहे.
 
विशेषतः व्हिएतनाम आणि फिलीपिन्स यांच्यासोबत संरक्षण सहकार्य वाढवणे, हे दक्षिण चीन समुद्रातील सामरिक संतुलनासाठी उपयुक्त ठरू शकते.

निष्कर्ष
 
‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील संकट हे आधुनिक युद्धातील एक महत्त्वाचे वास्तव आहे. मानवी सहनशक्ती, मनोबल आणि ‘लॉजिस्टिस’ या घटकांकडे दुर्लक्ष केल्यास, महासत्तादेखील अडचणीत येऊ शकते. अत्याधुनिक विमानवाहू नौका, क्षेपणास्त्रे आणि तंत्रज्ञान असूनही, थकलेले सैनिक दीर्घकाळ प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. अमेरिकेच्या या अनुभवातून भारताने स्पष्ट धडा घ्यायला हवा. भविष्यातील संघर्ष दीर्घकालीन, बहुआयामी आणि संसाधनकेंद्रित असतील. त्यामुळे मजबूत ‘लॉजिस्टिस’, पुरेशा युद्धसाठ्यांची उपलब्धता, सैनिकांचे ‘रोटेशन’, मानसिक आरोग्य व्यवस्थापन आणि विश्वसनीय भागीदारी हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे प्रमुख स्तंभ असतील.
 
युद्धातील विजय केवळ रणांगणावर नव्हे; तर सैनिकांच्या मनात, पुरवठा साखळीत आणि राष्ट्राच्या दीर्घकालीन सहनशक्तीत आधी होतो. हाच ‘यूएसएस अब्राहम लिंकन’च्या अनुभवातून, भारताने शिकण्यासारखा सर्वांत मोठा धडा आहे.




हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

संबंधित मजकूर