ठाणे (Kharegaon Car Accident) : कळवा परिसरातील खारेगाव येथे रविवारी सकाळी १० च्या सुमारास कार चालकाने घडवून आणलेल्या भीषण अपघातात अपंग असलेल्या घरकामगार महिलेचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातादरम्यान चालकाने मयत महिलेला थेट 'श्री गणेशाय नमः' सोसायटीच्या कॉर्नरपर्यंत फरफटत नेल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या अपघातात एकूण तीन व्यक्तींसह पार्किंगमधील एका चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (Kharegaon Car Accident)
नेमका अपघात कसा घडला ?
रविंद्र हॉटेल जवळून नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरून एक चारचाकी गाडी वेगात जात होती. धुमारे हाऊस परिसरात पोहोचताच चालकाने आयुष पाटील (वय २२) या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर घाबरून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. (Kharegaon Car Accident)
त्याचवेळी घरकाम संपवून घरी परतणाऱ्या शुभांगी पाटील (वय ४५) या अपंग महिलेला या कारने थेट उडवले आणि 'श्री गणेशाय नमः' सोसायटीच्या कॉर्नरपर्यंत फरफटत आणले. ही धडक आणि फरफट इतकी भयानक होती की, शुभांगी पाटील यांचा पाय मोडून त्या बेशुद्ध पडल्या आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुढे ही कार नियंत्रण सुटून थेट 'धुमारे हाऊस'च्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये घुसली. तेथे उभ्या असलेल्या कारला जोरात धडक देत, जवळच स्कूटरवर असलेल्या मालाश्री प्रवीण पुजारी (वय ३२) यांनाही उडवले. यात मालाश्री पुजारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Kharegaon Car Accident)
कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला; आर्थिक मदतीची मागणी
मयत शुभांगी पाटील या स्वतः अपंग असतानाही दुसऱ्यांच्या घरी कष्ट करून संपूर्ण कुटुंबाचा गाडा चालवत होत्या. त्यांचे पतीदेखील अपंग असून त्यांना एकुलती एक मुलगी आहे. घरातील कमावती व्यक्तीच अपघातात दगावल्याने हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. या अत्यंत बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबाला प्रशासनाने आणि शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी खारेगावातील स्थानिकांकडून केली जात आहे. (Kharegaon Car Accident)
चालक पोलिसांच्या ताब्यात
घटनेचे वृत्त समजताच ( कळवा पारसिक) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार चालकासह एकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर गर्दी कमी होती, तरीही या भीषण अपघातामुळे स्थानिकांमध्ये बेदरकार चालकांविरुद्ध प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. (Kharegaon Car Accident)