मुंबई (Gaimukh-Payegaon Creek Bridge) : ठाण्याला भविष्यातील महत्त्वाचे मोबिलिटी आणि आर्थिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या पायाभूत विकासाला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी गायमुख–पायेगाव खाडी पुलाच्या कामाला वेग आला असून प्रकल्पाचे सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे ठाणे खाडीच्या भागातील पाइल फाउंडेशनचे काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.
खाडी भागातील पुलाच्या पायाभरणीचे काम अंतिम टप्प्यात असून पिअर उभारणी आणि पिअर-कॅपचे कामही वेगाने सुरू आहे. गायमुख तसेच पाये-पायेगाव या दोन्ही टोकांकडील कामांमध्येही लक्षणीय प्रगती झाली आहे. सुमारे ६.५ किलोमीटर लांबीचा हा खाडी पूल ठाण्याच्या एकात्मिक मल्टिमोडल वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. गायमुखला घोडबंदर रोडमार्गे चिंचोटी आणि पायेगावशी जोडल्यामुळे ठाणे, भिवंडी, वसई तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तरेकडील भागांदरम्यान अधिक थेट आणि वेगवान संपर्क निर्माण होणार आहे. (Gaimukh-Payegaon Creek Bridge)
सध्या ठाण्याकडून चिंचोटी, पायेगाव किंवा वसईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना घोडबंदर परिसरातील घाट भागातून प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. प्रस्तावित खाडी पुलामुळे हा घाटाचा भाग पूर्णपणे टाळता येणार असून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी अधिक जलद पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
या पुलामुळे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, ठाणे कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, दिवा-वसई रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ आणि अंजूर–चिंचोटी मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे गायमुख-पायेगाव खाडी पूल हा केवळ वाहतूक सुलभ करणारा पूल न राहता ठाण्यातील विविध परिवहन प्रकल्पांना एकत्र जोडणारा महत्त्वाचा मोबिलिटी लिंक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ठाण्याची प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढण्याबरोबरच व्यापार, उद्योग आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. (Gaimukh-Payegaon Creek Bridge)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.