‘सारेगमप’ : गीतांच्या पुननिर्मितीचे सुरेल पर्व...

    05-Sep-2026
 
Sa Re Ga Ma Pa Marathi
 
‘सारेगमप’च्या नव्या पर्वाच्या निमित्ताने गायक-संगीतकार अवधूत गुप्ते तब्बल आठ वर्षांनी, तर गायिका वैशाली सामंत तब्बल १६ वर्षांनी या कार्यक्रमात पुनरागमन करत आहेत. सोबतीला सूत्रसंचालक म्हणून मृण्मयी देशपांडे आहेच. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने नुकतीच ‘सारेगमप’च्या मिरा रोड येथील भव्य सेटला भेट दिली आणि अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि मृण्मयीशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी गाण्याची पुनर्निर्मिती करणे, ही संकल्पना असून ‘रिमिस’शी त्याचा काहीही संबंध नसल्याचे तिघांनीही बोलताना सांगितले. तसेच ‘झी-मराठी’सोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे सगळेच भावुक झाले आणि जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ‘सारेगमप’च्या टीमसोबत मारलेल्या या सुरेल गप्पा...

‘सारेगमप’चे नवीन पर्व, तोच उत्साह, तोच जोश! आठ वर्षांनी तुम्ही पुन्हा एकदा या मंचावरती येत आहात. घरी परतल्यासारखं वाटतंय का?

अवधूत : बरोबर. आठ वर्षांनी या मंचावर येत असल्यामुळे घरी परतल्यासारखं वाटतंय. हा मंच माझ्या करिअरमध्ये खूप महत्त्वाचा राहिलाय. अगदी स्पर्धक म्हणून सुरुवात मी याच मंचावरून केली होती. सोनू निगम तेव्हा सूत्रधार होते. मी तेव्हा महाविद्यालयातून बाहेर पडलो होतो. त्यावेळेला मी ते पर्व जिंकलं होतं. तिकडून मग पुढे माझी वाटचाल परीक्षकाच्या खुर्चीपर्यंतपण झाली आणि हे सगळं माझ्यासाठी स्वप्नवत होतं.
 
या मंचावर यायला १६ वर्षे का लागली?

वैशाली : प्रत्येक गोष्ट घडून वेळ जायला लागतो, असं माझं मत आहे. मला शेवटच्या पर्वाचा शेवटचा दिवस आठवतोय. गेल्या पर्वाच्या वेळी मी देवाला म्हटलेलं, "मला छान पर्व दिलं. देवा, आता परत कधी यायचा योग येतोय तूच ठरव,” असं म्हणूनच मी तिथून बाहेर पडलेले. आज १६ वर्षांनी बाप्पाला माझी आठवण झाली. आम्ही कलाकार म्हणून, माणूस म्हणून अजून प्रगल्भ झालोय, आमची अनुभवाची शिदोरी अजून बळकट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धकांना याचा चांगलाच फायदा होईल.
 
‘झी-मराठी’सोबत तुझं खूप जुनं नातं आहे. म्हणजे तुला जी काही ओळख मिळाली, ती ‘झी’मुळेच आणि आज पुन्हा एकदा ‘झी’च्या मंचावरती आहेस आणि तोपण ‘झी’चा ‘नंबर वन’ शो ‘सारेगमप’ची सूत्रसंचालक म्हणून कमबॅक करतेस.
 
मृण्मयी : ‘सारेगमप’च्या मंचावर सूत्रसंचालन करण्याची पुन्हा संधी मिळतेय, यासाठी मी खूप आनंदी आहे. मला स्वतःला गाणी ऐकायला फार आवडतात. ‘सारेगमप’मध्ये सूत्रसंचालन करणं माझ्यासाठी ‘झी’ कुटुंबात घरी परत आल्यासारखं आहे. कारण, ‘झी-मराठी’वर मी बर्‍याच मालिका आणि कार्यक्रम केले आहेत. माझ्या ‘कुंकू’ मालिकेनंतर ‘एका पेक्षा एक’, ‘जोडीचा मामला’, ‘अप्सरा आली’ आणि बरेच रिअ‍ॅलिटी शो मी केले. त्यानंतर ‘सारेगमप’चा प्रवास सुरू झाला. त्यामुळे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय आणि सुरेल प्रवास आहे. इथे खूप छान आणि आवडती गाणी ऐकायला मिळतात; अनेक आठवणी पुन्हा रंगतात. ‘सारेगमप’चं सूत्रसंचालन करताना एकदम मस्त आणि छान वाटतं.
 
‘सारेगमप’च्या यंदाच्या पर्वाची संकल्पना खूप चित्तवेधक आहे. जुनी गाणी पुनर्निर्मित करण्यात येणार आहेत. त्याला ‘रिमिस’ नाही म्हणता येणार. नेमकं काय वेगळेपण असेल?
 
अवधूत : आम्ही परीक्षक म्हणून जुन्या आणि नव्याचा एक मिलाफ साधण्याचा प्रयत्न करत आहोत. स्पर्धकांचं खरं संगीत, खरं कौशल्य हे प्रेक्षकांसमोर आणणं, जे खरोखर कुशल आहेत, त्यांना प्रोत्साहन देणं, हे जरी परीक्षकांचं काम असलं, तरी नव्या माध्यमांसमोर जायला आजच्या पिढीला तयार करणं, हीदेखील एका परीक्षकाची जबाबदारी आहे, अशा मताचा मी आहे. त्यामुळे माझे लक्ष या पर्वाला या गोष्टीवरसुद्धा असेल की समाजमाध्यमांवर किंवा इतर नवीन माध्यमांवर स्पर्धकांनी त्यांचं संगीत कशा प्रकारे मांडायला हवं. त्यासाठी काही मार्गदर्शन करण्याचा आम्ही परीक्षक म्हणून जरूर प्रयत्न करू. ‘झी-मराठी’ यात काही वेगळा प्रयोग करतं नाही असं नाही, तर याआधीही असं झालंय. पण, यंदा आमचं वेगळेपण काय, तर आम्ही गाणी थेट ‘रिमिक्स’ न करता, ती पुनर्निर्मित करणार आहोत. ‘रिमिस’ या शब्दाला इतकी वाईट वागणूक मिळाली आहे की त्याचा आम्ही धसकाच घेतलाय. गाणं पुनर्निर्मिती करणे, म्हणजे एखादा अंतरा नवीन लिहून तो सादर करणे. मराठी असेल किंवा हिंदी असेल, अनेक जुन्या गाण्यांचे ‘रिमिक्स’ केले जातात. याला ‘पुनर्निर्मिती करणे’ नाही म्हणत. खरे संगीतप्रेमी म्हणतात की, जुन्या गाण्यांची अशा प्रकारे दुर्दशा नाही, आम्ही नाही बघू शकत. गाणी ‘रिमिक्स’ करून जुन्या गाण्यांचा वारसा आपण संपवतो. तेच बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
 
वैशाली : त्या काळातील श्रोत्यांची गरज ओळखून संकल्पना ठरते, असं माझं मत आहे. श्रोत्यांना काय हवंय, त्यांना काय ऐकायचं आहे, त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय, त्यातून आपण काय देऊ इच्छितो, हा सगळा विचार करून संकल्पना ठरते. हा बदल स्तुत्य आहे. अर्थात, तो फार जबाबदारीने केलाय. हा मंच किती सुंदर सजलाय. हा मराठी भाषेचा गौरव आहे. ‘झी-मराठी’ची आतापर्यंतचा जो वारसा आहे, त्याचा हा मान आहे आणि या वारशामध्ये आम्ही दोघे आलो आहोत, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
 
मृण्मयी : संगीत हा धागा सगळ्यांना जोडून ठेवतो, हे ‘सारेगमप’वर सातत्याने अनुभवायला मिळतं. मला वाटतं, या नव्या पर्वात प्रेक्षकांपैकी जे कोणी मराठी संगीतापासून थोडेसे दुरावले आहेत किंवा गाण्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग ज्यांना आवडतात, जुन्या गाण्यांचं नव्या पद्धतीने सादरीकरण ज्यांना आवडतं, अशा सगळ्यांसाठी ही नवी पर्वणी नक्कीच खास असणार आहे. जुनी गाणी ज्यांना आवडतात, त्यांच्यासाठी हे पर्व पुनर्प्रत्ययाचा आनंद देणारं असेल. तसेच संगीतापासून दुरावलेले अनेकजण पुन्हा संगीताशी जोडले जातील.
 
‘सारेगमप’च्या यंदाच्या पर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथे हिंदीसारखा ‘मेलोड्रामा’ नाही, आरडाओरडा नाही, गोंधळ नाही, त्यामुळे प्रेक्षकांचं खूप जास्त प्रेम या कार्यक्रमाला मिळतंय. त्याविषयी काय सांगाल?
 
अवधूत : कसं आहे बघा, आपली खूप जुनी परंपरा आहे. खूप मोठे दिग्गज आपल्याकडे होऊन गेले. त्यांचे आपल्यावर संस्कार आहेत. त्यामुळे ‘टीआरपी’साठी असला फालतूपणा इकडे होत नाही. शुद्ध करमणूक मिळत असल्यामुळेच प्रेक्षकांचं आम्हाला भरभरून प्रेम मिळतं.
 
वैशाली : अर्थातच आपली ही वृत्तीच नाही. प्रेक्षकांना फक्त मनमुराद कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. असल्या नाटकांवर त्यांचा विश्वास नाही. महाराष्ट्रातला प्रेक्षक खूप समजूतदार आहे. त्यांना स्वतःची मतं आहेत. त्यामुळे असला थिल्लरपणा त्यांना आवडत नाही.
 
मृण्मयी : या पर्वाचा दिग्दर्शक संकेत प्रचंड हुशार आहे. त्याने बरोबर प्रेक्षकांची नस ओळखली आहे. प्रेक्षकांना काय हवं, काय नको, सगळं त्याला माहीत आहे. त्यामुळे असला थिल्लरपणा आपल्याकडे होत नाही. या कार्यक्रमाचा वेगळा वारसा आहे. माझ्या आईचं स्वप्न होतं की, मी ‘सारेगमप’च्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं. यावरून या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा तुम्ही अंदाज लावू शकता. त्यामुळे असले प्रकार करण्याची आपल्याला गरज नाही.

या मंचावर पुन्हा आल्यामुळे जबाबदारी वाढली आहे, असं वाटतं का?
 
अवधूत : परीक्षक म्हणून माझा निकष कधीच बदलणार नाही. पहिलं म्हणजे सूर आणि ताल, दुसरं म्हणजे काव्याची जाण, शब्दांचा अर्थ समजून घेतला आहे की नाही, याची परीक्षा आणि त्यामुळे येणारी भावुकता. या गोष्टी सगळ्यांत जास्त महत्त्वाच्या आहेत. गाणं गातानाच गायकाचं सादरीकरणही खूप महत्त्वाचं असतं. कारण, गाणं प्रस्तुत करताना ते समोरच्यालाही समजावून सांगता आलं पाहिजे. त्याचे भाव हे समोरच्यालाही जाणवले पाहिजेत आणि हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे.
 
वैशाली : मी नुकतीच पार्ला मार्केटमध्ये गेले असताना, मला तीन-चारजणांनी ‘ओ वैशाली इकडे या की’ अशी हाक मारली. त्यांनी भरभरून कार्यक्रमाचं कौतुक केलं. मी आणि अवधूत भाग घेत असल्यामुळे खूप आनंद झाल्याचंही सांगितलं. त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम बघून नक्कीच जबाबदारी वाढली आहे. १२ स्पर्धक हुशार असल्यामुळे सगळ्यांना भक्कम पाठिंबा देणे, एक परीक्षक म्हणून आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे.
 
अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतसोबत मृण्मयीचं सूत्रसंचालन म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. काय भावना आहेत?
 
मृण्मयी : मी याआधी ‘सारेगमप’च्या दोन पर्वांत सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली आहे. पण, यंदा सेटवर अवधूतदादा आणि वैशालीताई परत आल्यानंतर आनंदाची लाट पसरलेली आहे. सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह आहे. कित्येक स्पर्धकांचं एक वेगळं स्वप्न आणि संघर्ष असतो. मला वाटतं, स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्यासोबतच आवाजात होणारा बदल खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या दिवशी असलेला स्पर्धकाचा आवाज, त्याचं गाणं आणि स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावर त्याच्या गाण्यात झालेली प्रगती, वाढलेला आत्मविश्वास आणि स्टेजवर परफॉर्म करण्याची कला यांमध्ये खूप मोठा बदल झालेला दिसतो. आणि या गोष्टीचं साक्षीदार होता येणं, यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही.
 

(मुलाखत : कपिल देशपांडे)
९८१९९७४१७९




संबंधित मजकूर