मुंबई : (Mumbai Metro 3) गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर आणि गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ अर्थात ॲक्वा मार्गावरील सेवा १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांना भेटी देणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या दोन्ही टोकांच्या स्थानकांवरून रात्री १०.३० वाजता शेवटची मेट्रो सुटते. मात्र, गणेशोत्सवाच्या कालावधीत शेवटच्या फेरीची वेळ दीड तासाने वाढवून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे गणरायाचे दर्शन, विविध मंडळांना भेटी आणि उत्सवाचा आनंद घेतल्यानंतर मुंबईकरांना रात्री सुरक्षितपणे घरी परतता येणार आहे. (Mumbai Metro 3)
मुंबईतील गणेशोत्सवाच्या काळात सिद्धिविनायक मंदिर, दादर, वरळी, महालक्ष्मी आणि गिरगाव यांसह विविध भागांतील गणेश मंडळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. रस्त्यांवर वाढणारी वाहतूक आणि वाहनांची कोंडी लक्षात घेता मेट्रोचा पर्याय भाविकांसाठी अधिक सोयीचा ठरणार आहे. वाहतूक कोंडी टाळून जलद आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरसीने केले आहे. (Mumbai Metro 3)
४५ सेंटीमीटरपर्यंतच्या गणेशमूर्तींनाही परवानगी
गणेशभक्तांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४५ सेंटीमीटरपर्यंत उंचीच्या गणेशमूर्तींना निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन करून मेट्रो-३मधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशमूर्ती घरी आणताना किंवा विसर्जनासाठी नेताना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. (Mumbai Metro 3)
गणेशोत्सव हा मुंबईच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या काळात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, यासाठी एमएमआरसीने सेवा कालावधी वाढवला आहे. मुंबईकरांनी या सुविधेचा लाभ घेत वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे. (Mumbai Metro 3)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.