मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत गोविंदांचा थरार; ‘नशामुक्त महाराष्ट्रा’चा संदेश देत दहीहंडीचा जल्लोष

Mumbai Dahi Handi 
मुंबई : (Mumbai Dahi Handi) श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या निमित्ताने मुंबईत आज उत्साहाला उधाण आले आहे. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष आणि उंचच उंच मानवी मनोरे अशा दिमाखदार वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार ‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र’ या सामाजिक संदेशाची थीम ठरली आहे.
 
मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांना भेट देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. “सर्व गोविंदांनी आनंदाने आणि सुरक्षितपणे दहीहंडीचा उत्सव साजरा करावा. यंदा ‘नशामुक्त महाराष्ट्र’चा संदेश घेऊन हंडी फोडली जात आहे, ही अत्यंत कौतुकाची बाब आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. वरळी, दादर आणि घाटकोपर परिसरातील दहीहंडी उत्सवांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध गोविंदा पथकांकडून सलामी देत सात ते आठ थरांपर्यंतचे मानवी मनोरे उभारण्यात आल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात गोविंदांचा उत्साह वाढवला. (Mumbai Dahi Handi)
 
वरळीतील सदानंद हॉटेलसमोर भारतीय जनता पार्टी आणि राजयोग प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने ‘वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी उत्सव २०२६’ पार पडला. (Mumbai Dahi Handi)


या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजपा मुंबई उपाध्यक्ष किरण शेलार, जिल्हाध्यक्षा शलाका साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. ‘गोविंदा आला रे आला, नशामुक्तीचा संदेश घेऊन आला!’ या घोषणेने वरळीचा परिसर दुमदुमून गेला. दहीहंडीच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत नशामुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या उत्सवांमधून करण्यात आला. (Mumbai Dahi Handi)

वरळीतील जांबोरी मैदानावर ॲड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने ‘परिवर्तन इंडिया फाउंडेशन’च्या वतीने ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’चे आयोजन करण्यात आले. याठिकाणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली.घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला, वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या पुढाकाराने आयोजित दहीहंडी उत्सवात ही मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले. (Mumbai Dahi Handi)
 

 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर