आतापर्यंत तुम्ही मिर्झापूरच्या सिंहासनासाठीची लढाई तीन सीझनमध्ये वेबसीरिजच्या माध्यमातून पाहिली; पण आता अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मिर्झापूर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत तुम्ही कालीन भैय्याचा मुलगा मुन्ना आणि गुड्डू पंडित यांच्यातील लढाई फक्त तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनवरच अनुभवली. पण, ही कथा इतकी चित्तवेधक होती की, प्रत्येकाला ती मोठ्या पडद्यावर पाहण्याचीही इच्छा होती. निर्मात्यांनी प्रेक्षकांची हीच इच्छा पूर्ण केली आणि तीन तासांचा हा थरारपट चित्रपटगृहांमध्ये मोठ्या पडद्यावर आणला. त्यांनी त्याचे नाव ‘मिर्झापूर : द मुव्ही’ ठेवले. कथा तीच, पात्रंही तीच! त्यामुळे जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, दिग्दर्शक गुरमीत सिंहने या सगळ्या चर्चांना या चित्रपटातून अगदी चोख उत्तर दिले आहे.
चित्रपटातील पात्रे आणि कथानक बर्याच अंशी मालिकेसारखेच. मात्र, यावेळी खलनायक आहे बब्बन बबुआ (रवी किशन). त्याला कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) आणि त्याचा मुलगा मुन्ना (दिव्येंदू) यांना ठार मारून मिर्झापूरवर राज्य करायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा धाकटा भाऊ, जे. पी. यादव (प्रमोद पाठक) आणि झरिना (अनंगशा बिस्वास) त्याला कालीन भैय्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात. बब्बनची एक प्रेयसी, मुमताज बीबी (सोनल चौहान)देखील आहे. बब्बन, मुन्ना (अली फजल) आणि बबलू (जितेंद्र) यांच्यामार्फत कालीन भैय्यापर्यंत पोहोचतो आणि सौदा निश्चित करतो. कालीनला मिर्झापूरच्या बाहेर बोलावून ठार मारण्याची त्याची योजना असते. तो यात यशस्वी होतो की नाही, हे बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.
रवी किशन या चित्रपटातील एक सुखद धक्का म्हणावा लागेल. त्याला चित्रपटात सर्वाधिक ‘स्क्रीनटाईम’ देण्यात आला आहे. त्याने आपली भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे. अॅशन-सीन असोत किंवा भावनिक दृश्ये, रवी किशनने प्रत्येक दृश्यात कमाल केली आहे. पंकज त्रिपाठी यांनी अखंडानंद त्रिपाठी, म्हणजेच कालीन भैय्याच्या भूमिकेत आपले वर्चस्व कायम राखलेले दिसते. दिव्येंदूला पुन्हा एकदा ‘मुन्ना’ म्हणून बडबडताना पाहणे खूप छान आहे. गुड्डूच्या भूमिकेत अली फजल पुन्हा एकदा भाव खाऊन गेलाय. बबलूचं कास्टिंग मात्र राहून राहून खटकतं. त्यामुळे विक्रांत मेसीची उणीव चित्रपटात तीव्रपणे जाणवते. जितेंद्र कुमार याचा कोणताही प्रभाव चित्रपटावर पडलेला दिसत नाही. शिवाय, मोहित मलिक, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, सुशांत सिंग आणि शीबा चड्डा यांच्यासह संपूर्ण कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. बावजी (कुलभूषण खरबंदा) या चित्रपटातील ‘सरप्राईझ पॅकेज’ आहेत.
चित्रपटाचे शीर्षक गीत आणि पार्श्वसंगीतही जबरदस्त आहे. अनेक पात्रे असूनही कथानक भरकटत नाही; ते फक्त काही वेळा संथ होते. ‘क्लायमॅस’मधील काही दृश्ये वगळता, अॅशन-सीन्स चांगले आहेत. चित्रपटाची ‘सिनेमॅटोग्राफी उत्तम म्हणता येईल. मिर्झापूर असो किंवा राजस्थानमधली काही दृश्ये, उत्तम पद्धतीने कॅमेर्यात कैद झाली आहेत. चित्रपटाची लांबी थोडी दिग्दशर्क गुरमीत सिंहला कमी करता आली असती, तर चित्रपटाने अजून परिणाम साधला असता. चित्रपटातील गाण्यांमुळे तो जबरदस्तीने लांबवल्यासारखा वाटतो. एकही गाणं लक्षात राहात नाही.
एकूणच काय, तर ‘मिर्झापूर’ या वर्षातील मनोरंजक चित्रपटांपैकी एक आहे. एकदा ‘मिर्झापूर’च्या या विश्वात तुम्ही जाऊन बघाच!
निर्माता : रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर
दिग्दर्शक : गुरमीत सिंह
कलाकार : पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, जीतेंद्र, रवि किशन, रसिका दुग्गल, कुलभूषण खरबंदा आणि श्वेता त्रिपाठी
- कपिल देशपांडे