देशातील तरुणाईच्या नवकल्पनांचा वापर व्यापारवृद्धीसाठी व्हावा, म्हणूनच अनेक कंपन्या प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची निवड महाविद्यालयातूनच करतात. मात्र, काही कंपन्या निवड करुनही, प्रत्यक्ष संधी देण्यात टाळाटाळ करत असल्याचा अनुभव, ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना आला. याबाबत ‘आयआयटी’ने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेणारा हा लेख...
‘आयआयटी’ म्हणजेच, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेनोलॉजी’ या राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी तंत्रज्ञान-अभियांत्रिकी शिक्षण संशोधन संस्थेने, नव्यानेच दोन मोठे धोरणात्मक निर्णय घेतले. या संस्थेने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयाचे, दूरगामी स्वरूपात परिणाम होऊ शकतात. नव्या व बदलत्या शैक्षणिक व व्यावसायिक संदर्भात ‘आयआयटी’ने घेतलेल्या या निर्णयांचा परिणाम, संस्थेच्या विद्यार्थ्यांना रोजगार संधी देणार्या व्यवस्थापन कंपन्या व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन व श्रेणी यांवर होणार असल्यानेच या निर्णयांना नवे संदर्भ व महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना विविध प्रतिष्ठित उद्योग-व्यवसायांमध्ये रोजगार संधी मिळवून देण्याचे कार्य, ‘प्लेसमेंट पॅनेल’च्या मार्फत चालते. यासाठीच्या संपर्क-समन्वयाचे महत्त्वपूर्ण काम, वर्षानुवर्षे याच पॅनलमार्फत केले जाते. याच ‘प्लेसमेंट पॅनेल’ने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार, ‘आयआयटी’च्या पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची आधी चाचणी-मुलाखत अशी निवड प्रक्रिया पार पडते असे. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड-निश्चिती करणार्या कंपन्या, त्यांनी निवड केलेल्या विद्यार्थी-उमेदवारांना त्यांच्या निवडीचे रीतसर पत्र देत. त्यानुसार, निवड झालेले विद्यार्थी कंपनीत रुजू होत.
मात्र, गेल्या काही वर्षांत ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांची निवड करूनही, काही कंपन्या अचानकपणे व कुठलीही पूर्वसूचना न देता, काही विद्यार्थ्यांचे नेमणूकपत्र रद्द करण्याचे प्रकार करत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या होत्या. कालौघात त्यात वाढही होत असल्याचेही समोर आले. यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच, विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ व अस्थिरतेची स्थिती निर्माण होई. याची गंभीर दखल ‘आयआयटी’च्या ‘प्लेसमेंट पॅनेल’ने घेतली असून, कंपन्यांनी असे प्रकार करू नयेत, यासाठी कंपन्यांना सूचित केले आहे.
यासंदर्भातील महत्त्वाची बाब म्हणजे देशाभरात सध्या ‘आयआयटी’च्या २३ शिक्षणसंस्था कार्यरत असणार्या आहेत. या सर्व संस्थांच्या प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी प्रशिक्षण विभागांच्या उच्च मंडळाच्या निर्णयानुसार, देशातील दहा कंपन्यांना त्यांनी ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या त्यांनी दिलेल्या निवडपत्रानुसार रुजू करून घेण्यास सांगितले आहे. कंपन्यांनी असे न केल्यास, संबंधित विद्यार्थ्यांना तीन महिन्यांच्या प्रस्तावित पगाराएवढी रक्कम भरपाईस्वरूपात देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. तसेच, ‘आयआयटी’च्या या सूचनांचे पालन न करणार्या कंपन्यांना, यापुढे ‘आयआयटी’च्या कुठल्याही संस्था वा विद्याशाखेत विद्यार्थी निवडीच्या कार्यक्रमासाठी येण्यास मज्जाव करण्याची रोखठोक भूमिकाही घेण्यात आली आहे.
‘आयआयटी’च्या मध्यवर्ती निवड मंडळाने वर नमूद केल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांचे निवडपत्र रद्द करणार्या कंपन्यांच्या निर्णयाबाबत सूचित करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये ‘ओरॅकल’, ‘इंटरव्ह्यू किकस्टार्ट’, ‘सुपर एजीआय’ यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना निवडपत्र देऊनही, २०२६ मध्ये त्यांना निर्धारित तारखेला रुजू न करणे अथवा विद्यार्थ्यांशी कुठलाही पत्रव्यवहार न करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे कंपन्यांच्या या अन्याय्य व अरेरावी भूमिकेचा फटकाही, ‘आयआयटी’च्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना बसला होता.
याच जोडीला विविध उद्योग कंपन्यांनी ‘आयआयटी’च्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांची निवड करून त्यानुसार अधिकृत पत्र दिल्यानंतरही, अचानकपणे त्यांची निवड रद्द करण्याचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले होते. अशा कंपन्यांना विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्याच्या संदर्भात फेरविचार करण्याबद्दलही, ‘आयआयटी’च्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे सूचित करण्यात आले आहे. या कंपन्यांनी यासंदर्भात नव्याने व सकारात्मक स्वरूपात भूमिका न घेतल्यास, त्यांना यापुढे विद्यार्थी-उमेदवारांची निवड करण्यासाठी ‘आयआयटी’चे सहकार्य मिळणार नसल्याचेही त्यांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे.
यासंदर्भात ‘आयआयटी’ मध्यवर्ती निवड प्रशिक्षण विभागप्रमुख प्रा. जॉन जोस यांनी स्पष्ट केल्यानुसार, विद्यार्थ्यांची निवड करून व त्यांना तसे नेमणूकपत्र देऊनही अचानकपणे ते रद्द करून, हुशार व पात्रताधारक विद्यार्थ्यांची रोजगारसंधी हिरावणार्या कंपन्यांची ‘आयआयटी’ने दखल घेतली आहे. याबाबतच्या धोरणात्मक निर्णयानुसार, २०२६-२७ या शैक्षणिक सत्रात ‘आयआयटी’ची पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांच्या, परीक्षापूर्व मुलाखती व निवड प्रक्रियेमध्ये असे प्रकार करणार्या कंपन्यांना सहभागी होऊ दिले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या सुमारे वर्षभरात, विद्यार्थ्यांच्या नेमणूकपत्रांच्या बाबतीत काही कंपन्यांनी घेतलेल्या अकल्पित व अनाकलनीय भूमिकेच्या संदर्भात, नजीकच्या भविष्यात कंपन्यांतर्फे ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासंदर्भात काही निर्णय नव्याने घेण्यात आले. यात देशांतर्गत सर्व ‘आयआयटी’ संस्थांनी, कंपन्यांप्रमाणेच संस्थेच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी काही सूचना व मार्गदर्शक तत्त्वे नव्याने जारी केली आहेत. ‘आयआयटी’ संस्थांतर्फे नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना कंपन्यांशी रोजगार-संधींच्या संदर्भात व्यवहार करताना अथवा त्यांची ‘आयआयटी’च्या संदर्भातील माहिती देताना, त्यांची ‘जेईई’ वा ‘गेट’ यांसारख्या प्रवेश पात्रता परीक्षांची गुणांची टक्केवारी अथवा गुणांकाचा उल्लेख न करण्याच्या सक्त सूचनाही दिल्या आहेत. या नव्या सूचनांनुसार, सर्व ‘आयआयटी’च्या विद्यार्थी प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन केंद्रांतर्फे, यापुढे ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अद्ययावत शैक्षणिक आलेखाच्या तपशीलातून ‘जेईई’, ‘गेट’सारख्या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांक तातडीने हटवून, यापुढे असा उल्लेख टाळण्याचा धोरणात्मक निर्णय कळवला आहे. मुख्य म्हणजे, यामागे काही कंपन्यांकडून ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे ‘आयआयटी’ संस्थांच्या या दोन्ही निर्णयांचे, संबंधित कंपन्या व संस्थेचे विद्यार्थी या उभयतांवर दूरगामी परिणाम होणार आहेत.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन - सल्लागार आहेत)
९८२२८४७८८६