‘जगाला एका रंगात रंगवता येणार नाही’; संवादातूनच नवा जागतिक सहकार्याचा अध्याय : मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई : (Global Impact Forum 2026) जग एका नव्या आणि अस्थिर वळणावर उभे असताना ‘वसुधैव कुटुंबकम्’चा भारतीय विचार पुन्हा एकदा जगाला दिशा देऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युद्ध, संघर्ष आणि वाढत्या जागतिक विभाजनाच्या काळात देशांना राजकीय मतभेदांपेक्षा लोकांमधील संवाद, संस्कृती आणि समान मूल्यांच्या धाग्यांनी जोडण्याची गरज आहे, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी मुंबईतून जागतिक सहकार्याचा नवा संदेश दिला.

मुंबईत आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’च्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात भारतासह विविध संस्कृतींना एकत्र आणण्याचा आणि सहकार्याचा नवा मार्ग निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. (Global Impact Forum 2026)


जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना फडणवीस यांनी भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचा संदर्भ देत समावेशकता, नीती आणि सत्याचा विजय हा संदेश आजच्या जगासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “आपले विचार, संस्कृती आणि दृष्टिकोन वेगवेगळे असले तरी आपल्याला जोडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत,” असे ते म्हणाले. (Global Impact Forum 2026)

केवळ राजकीय संवाद पुरेसा नाही. लोकांमधील संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यवसाय आणि समान मूल्यांवर आधारित सहकार्यच देशांना जवळ आणू शकते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारधारेचा उल्लेख करताना त्यांनी भारताने जगाला केवळ व्यापारच नव्हे, तर विचार आणि ज्ञानही दिल्याचे नमूद केले. बहुध्रुवीय आणि बहुविध जगव्यवस्था ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी ब्रिक्सच्या माध्यमातून ग्लोबल साऊथच्या आकांक्षांना व्यासपीठ मिळत असल्याचे स्पष्ट केले. (Global Impact Forum 2026)

मुंबई ही आर्थिक, व्यावसायिक, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि संस्कृतीची राजधानी असल्याने ग्लोबल इम्पॅक्ट फोरमसाठी मुंबईपेक्षा योग्य ठिकाण असू शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले. आगामी दोन दिवसांत कला, क्रीडा, संगीत, संस्कृती आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Global Impact Forum 2026)








गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर