कधीकाळी आकाशात उडणारा ड्रोन म्हणजे कॅमेर्याचे एक छोटे यंत्र, अशीच त्याची ओळख होती. आज मात्र हेच ड्रोन शेतीची पाहणी करत आहेत, महामार्ग आणि वीजवाहिन्यांची तपासणी करत आहेत, माल पोहोचवत आहेत आणि युद्धभूमीवर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उद्याच्या जगात ड्रोन केवळ आकाशात उडणार नाहीत, तर अनेक उद्योगांच्या कामकाजाची दिशा ठरवणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, अत्याधुनिक सेन्सर्स, फाईव्ह-जी आणि नव्या ऊर्जा तंत्रज्ञानामुळे ड्रोन उद्योगात अभूतपूर्व बदल घडत आहेत. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर जागतिक ड्रोन बाजार वेगाने विस्तारत असून, २०२५ मधील ८३.८ अब्ज डॉलरचा बाजार २०३३ पर्यंत तब्बल १८२.४ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. २०२६ ते २०३३ या काळात या बाजाराची वार्षिक सरासरी वाढ सुमारे ९.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच, ड्रोनची कहाणी आता केवळ तंत्रज्ञानाची राहिलेली नाही; तर ती पुढील दशकातील जागतिक अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि औद्योगिक परिवर्तनाची कहाणी बनत आहे. तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे जागतिक ड्रोन उद्योग पुढील काही वर्षांत मोठ्या विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ड्रोनच्या जागतिक बाजारात सध्या उत्तर अमेरिकेचे वर्चस्व आहे. २०२५ मध्ये या प्रदेशाचा जागतिक महसुलातील हिस्सा ४० टक्क्यांहून अधिक होता. संरक्षण आणि ‘होमलॅण्ड सियुरिटी’मधील मोठी गुंतवणूक, व्यावसायिक ड्रोनचा वाढता वापर, ड्रोन डिलिव्हरी आणि स्वायत्त तंत्रज्ञानातील प्रगती, यामुळे उत्तर अमेरिका आघाडीवर आहे. मात्र, भविष्यातील सर्वांत मोठी झेप आशिया-पॅसिफिकमध्ये अपेक्षित आहे. २०२६ ते २०३३ दरम्यान या प्रदेशाचा वाढीचा दर ११ टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये शेती, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुरक्षा, ‘लॉजिस्टिस’ आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांमध्ये ड्रोनचा वापर वेगाने वाढत आहे. या आशिया-पॅसिफिक चित्रात भारताची भूमिका विशेष महत्त्वाची ठरते. भारतासाठी हा केवळ वापराचा बाजार नसून ड्रोन उत्पादन, घटकनिर्मिती, सॉफ्टवेअर आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनण्याची संधी आहे. युरोपही ड्रोन अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग बनत आहे. ब्रिटन आणि जर्मनीसारखे देश ड्रोनचा वापर स्मार्ट पायाभूत सुविधा आणि औद्योगिक ‘ऑटोमेशन’मध्ये वाढवत आहेत. ड्रोन उद्योगातील सर्वांत मोठा बदल म्हणजे, मानवी नियंत्रणापासून स्वायत्त उड्डाणाकडे होणारी वाटचाल ठरतो. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ‘एज कॉम्प्युटिंग’ आणि अत्याधुनिक सेन्सर्सच्या मदतीने ड्रोन आता स्वतः मार्ग शोधणे, अडथळे ओळखणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि काही परिस्थितीत निर्णय घेणे, अशा क्षमता आत्मसात करत आहेत.
ड्रोनच्या रचनेतही मोठे बदल होत आहेत. पारंपरिक ‘मल्टी-रोटर ड्रोन’ आज सर्वाधिक वापरले जात असले, तरी ‘हायब्रीड ड्रोन’ वेगाने लोकप्रिय होत आहेत. ‘फिस्ड-विंग’ विमानाची दीर्घकाळ उड्डाण करण्याची क्षमता आणि ‘मल्टी-रोटर ड्रोन’ची उभ्या दिशेने उड्डाण-लॅण्डिंग करण्याची क्षमता यांचा संगम ‘हायब्रीड ड्रोन’मध्ये आहे. त्यामुळे मोठ्या क्षेत्राचे सर्वेक्षण, दीर्घ पल्ल्याची निगराणी आणि ‘लॉजिस्टिस’साठी त्यांचा वापर वाढत आहे. शेतीमध्ये पिकांची पाहणी, फवारणी आणि मातीचे परीक्षण; बांधकाम क्षेत्रात नकाशे आणि प्रगतीचे निरीक्षण; ऊर्जा क्षेत्रात वीजवाहिन्या आणि पवनचक्क्यांची तपासणी; तर ‘लॉजिस्टिस’मध्ये ‘लास्ट-माईल डिलिव्हरी’साठी ड्रोनचा वापर वाढत आहे. संरक्षण क्षेत्रात मात्र ड्रोनचा प्रभाव सर्वाधिक वेगाने वाढताना दिसत आहे. गुप्तचर, निगराणी, लक्ष्य शोधणे आणि विविध लष्करी मोहिमांमध्ये त्यांचा वापर वाढल्याने लष्करी ड्रोन बाजाराला मोठी चालना मिळत आहे.
ऊर्जा तंत्रज्ञानातही स्पर्धा वाढत आहे. सध्या बॅटरीवर चालणारे ड्रोन बाजारात आघाडीवर असून, २०२५ मध्ये त्यांचा हिस्सा ५३ टक्क्यांहून अधिक होता. मात्र, दीर्घकाळ उड्डाणासाठी ‘हायड्रोजन फ्युएल सेल’ तंत्रज्ञान वेगाने पुढे येत आहे. एकूणच १८२ अब्ज डॉलरचा अंदाजित बाजार हा केवळ आर्थिक आकडा नाही, तर जगाच्या आकाशात आकार घेत असलेल्या नव्या औद्योगिक क्रांतीचे स्पष्ट संकेत आहेत.