द्विधा : बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाचे यथार्थ चित्रण

    05-Sep-2026
 
Dwidhā Marathi Movie Review
 
काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. भारतात राहूनसुद्धा मुलींना आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला यायला वेळ नव्हता, म्हणून त्यांनी सगळे विधी व्हिडिओ कॉलद्वारे नुसते बघितले. आता विचार करा, जी मुलं आपल्या पालकांना सोडून परदेशात राहतात, ते काय करत असतील. एकदा का परदेशात स्थिरावले की त्यांना आपल्या जन्मदात्यांचा विसर पडलेला दिसतो. याच भावनिक दुराव्यावर निलेश नाईक दिग्दर्शित ‘द्विधा’ हा मराठी चित्रपट प्रकर्षाने भाष्य करतो.
 
या चित्रपटातील नायिका आपल्या बाबांचं आजारपण समजल्यावर परत परदेशात जाण्यास नकार देते, तर मुलीने आपलं आयुष्य आनंदात जगावं, अशी तिच्या बाबांची इच्छा असते, अशा भावनिक चढउतारांच्या मार्गावरून जाणारा ‘द्विधा’ तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. बाप-लेकीचं नातं शब्दांत व्यक्त करणं तसं कठीण. पण, लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वांत सुंदर रूप असतं. या चित्रपटातही बापलेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या भावना हळूवारपणे उलगडण्यात आल्या आहेत. बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक संघर्ष आणि आयुष्यातील कठीण निर्णयांची कथा मांडणार्‍या या चित्रपटात तुम्हीपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करता.
 
गरोदर असलेली श्रावणी (मानसी कुलकर्णी) आपल्या बाबांना (सतीश पुळेकर) भेटायला भारतात परत येते. अचानक येऊन तिला वडिलांना आश्चर्याचा धक्का द्यायचा असतो. मात्र, घरी आल्यावर प्रत्यक्षात तिलाच धक्का बसतो. कारण, तिचे वडील हे फुप्फुसांच्या गंभीर आजाराचा सामना करत असतात. पण, तिची आत्या (रेणुका दफ्तरदार) आणि आणि आतेभाऊ आदि (निमिष कुलकर्णी) यांपैकी कोणीही तिला याबद्दल कोणतीही कल्पना दिलेली नसते. त्यामुळे हे कळल्यावर मानसीला साहजिकच धक्का बसतो.
 
लहानपणीच मातृछत्र गमावलेल्या श्रावणीचं तिच्या वडिलांशी नातं अत्यंत घट्ट असतं. बालपणी तिने वडिलांना कधीही सोडणार नसल्याचं वचन दिलेलं असतं. वडिलांनीही आपल्या मुलीसाठी अनेक त्याग केलेले असतात. त्यामुळे बाबांची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत बाबांची साथ देण्यासाठी भारतातच राहण्याचा निर्णय मानसी घेते. दुसरीकडे आपल्या मुलाचा जन्म अमेरिकेतच व्हायला हवा, असा हट्ट तिचा नवरा कौस्तुभ (आस्ताद काळे) धरतो. कारण, अमेरिकेत बाळाचा जन्म झाल्यास त्याला तिथल्या नागरिकत्वाचा फायदा मिळू शकतो, या विचाराने तो श्रावणीने अमेरिकेत परत यावं, यासाठी आग्रही असतो. आता बाबांची साथ द्यायची की नवर्‍याचा हट्ट पुरवायचा, अशा द्विधा मनस्थितीत श्रावणी अडकते. आता श्रावणी नेमका काय निर्णय घेते, हे बघण्यासाठी तुम्हाला ‘द्विधा’ बघावा लागेल.
 
चित्रपटाची एकूणच गोष्ट खूपच भावनिक आहे. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणार्‍या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ मनस्थितीत अडकतं. ही भावना संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक निलेश नाईक यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. हा चित्रपट बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, जबाबदारी, त्याग आणि भावनिक द्वंद्व यांची मनाला भिडणारी कथा आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर उभी असलेली मुलगी आणि तिच्या वडिलांमधील नात्याचे भावनिक पदर चित्रपटातून अलगद उलगडले जातात. नात्यांमधील संघर्ष, माणुसकी आणि भावनिक निर्णयांचा हा प्रवास प्रेक्षकांना अंतर्मुख करुन जातो.
 
श्रावणीची भूमिका मानसी कुलकर्णीने अगदी लीलया निभावली आहे. वडिलांना झालेल्या गंभीर आजाराबाबत कळल्यावर ज्या मानसिक द्वंद्वात ती सापडते, तो प्रसंग एकही संवाद न घेता, मानसीने उत्तम रंगवला आहे. वडील की नवरा या द्विधा मनस्थितीत सापडल्यावर तिची होणारी घालमेल मानसी काय ताकदीची अभिनेत्री आहे, हे दाखवून जाते. एवढ्या सशक्त अभिनेत्रीला प्रमुख भूमिका मिळायला एवढा वेळ का लागला, असा प्रश्न ‘द्विधा’ बघितल्यानंतर नक्कीच पडतो. मेकअपशिवाय आणि सहज अभिनयामुळे तिची व्यक्तिरेखा अधिक खरी वाटते. मनोहर नाईकांच्या भूमिकेत सतीश पुळेकर यांनीही कमाल केली आहे. त्यांच्या वाट्याला खूप कमी संवाद असले, तरी फक्त हावभावांमधून त्यांनी बाजी मारलीय. मानसीच्या नवर्‍याच्या भूमिकेत आस्ताद चपखल बसलाय. त्याचा करारीपणा आपल्याला भावतो. भूषण कडूपण चित्रपटात आहे. पण, त्याच्या वाट्याला करण्यासारखं काही नव्हतं. बेबीआत्याच्या भूमिकेत रेणुका दफ्तरदार लक्षात राहतात. विशेष म्हणजे, त्यांचा आणि पुळेकरांचा शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यांत पाणी आणतो. आदिच्या भूमिकेतील निमिषने आपल्या बहिणीच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला भाऊ उत्तम साकारला आहे. बालकलाकार ओवी कुलकर्णीने लक्ष वेधलं आहे. लहानपणीची मानसी साकारताना तिचा पडद्यावरचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे.
 
मराठी चित्रपटात नेहमीच वेगळे प्रयोग होत असतात. ‘द्विधा’ हा त्यांपैकीच एक. एडिटर ते दिग्दर्शक निलेश नाईक यांचा प्रवास वाखाण्याजोगा आहे. पहिल्याच चित्रपटात एवढा संवेदनशील विषय हाताळल्यामुळे त्यांना मानावं लागेल. प्रत्येक फ्रेमवर त्यांनी उत्तम काम केलंय. शिवाय, स्वतः एडिटर असल्यामुळे चित्रपट त्यांनी जास्त फापटपसारा न करता आटोपशीर ठेवलाय. चित्रपटातील अनेक प्रसंग संवादांपेक्षा भावनांतून तुमच्यापर्यंत पोहोचतात.
 
चित्रपटातील गाणीही उत्तम आहेत. ‘बाबा’ हे गाणं मस्त जुळून आलंय. निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वे यांचं संगीत प्रसंगानुरूप आहे. सिमरजित सुमन, अश्विनी पाखरोट आणि श्रीधर अल्ले यांचं कॅमेरावर्क उत्तम. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट सक्षम आहे.
 
चित्रपटात एक संवाद आहे, "माणसापेक्षा पैसा मोठा झालाय, माणूस छोटा झालाय,” याची प्रचिती हा सिनेमा बघताना येत राहते. कारण, पैसे कमवण्याच्या नादात परदेशात स्थायिक झालेले युवक आपल्या जन्मदात्यांनाच विसरतात. हे प्रमाण वाढतंच चाललं आहे. आजच्या तरुण पिढीने एकदा जरूर यावर विचार करणं गरजेचं आहे. एकूणच काय, तर बाप-लेकीच्या नातेसंबंधावर आधारित हा चित्रपट आपल्या मुलांसोबत, आई-वडिलांसोबत तुम्ही एकदा आवर्जून बघावा, असाच!
 
निर्मिती : स्पिनिंग व्हील प्रॉडशन्स, विदुला आजगावकर
कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन : निलेश नाईक
कलाकार : सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, आस्ताद काळे, रेणुका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, भूषण कडू, तन्वी कुळकर्णी, ओवी कुलकर्णी
 
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर