‘विश्व हिंदू परिषद’ स्थापना दिनानिमित्त कुर्ला जिल्ह्यात गोरक्षाप्रमुख म्हणून कार्यरत विकास ठकसेन कांबळे यांनी वस्त्यांपासून जिल्हास्तरापर्यंत केलेल्या संघटनात्मक कार्याचा प्रवास उलगडणारा हा लेख...
श्रीकृष्ण जन्माष्टमीला मुंबईतील पवई येथील ‘सांदीपनी’ साधनालयात १९६४ मध्ये ‘विश्व हिंदू परिषदे’ची स्थापना झाली. ‘मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता’ हे ध्येयवाय घेऊन सुरू झालेल्या या संघटनेच्या कामात हिंदू समाजाचे संघटन, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण, तसेच समाजातील उच्च-नीचतेच्या भेदांवर मात करून समानतेची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात आला. या कामाचा विस्तार स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत गेला. कुर्ला जिल्ह्यात विकास कांबळे यांचा कार्यप्रवास त्याच कामाशी जोडलेला आहे.
कुर्ला परिसरात ‘विश्व हिंदू परिषदे’च्या कामाची सुरुवात विकास यांनी खंडस्तरावरील जबाबदारीपासून केली. सर्वेश्वर प्रखंड, कुर्ला जिल्ह्यात काम करताना विविध वस्त्यांमध्ये जाणे, लोकांशी संपर्क साधणे आणि कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे, यातून त्यांचा कामाचा परिसर विस्तारत गेला. पुढे त्यांच्याकडे कुर्ला जिल्ह्याच्या गोरक्षाप्रमुखाची जबाबदारी आली. जबाबदारी वाढली, कामाचा व्यापही वाढला. मात्र, आधीपासून जोडलेल्या कार्यकर्त्यांशी आणि वस्त्यांशी असलेला संपर्क कायम राहिला.
संघटनात्मक कामात कार्यक्रम हा एक भाग असतो. मात्र, कार्यक्रमानंतरचा संपर्कही तितकाच महत्त्वाचा ठरतो. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सहभाग या विषयांवर तरुणांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना सामाजिक कामाशी जोडण्याचा प्रयत्न करणे, अशी त्यांच्या कामाची दिशा. विविध वयोगटांतील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवताना, संघटनेचे काम करत असतानाच, कुटुंब आणि समाजाप्रति असलेल्या जबाबदार्यांची जाणीव असलेला कार्यकर्ता घडावा, यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे पूर्वी संपर्कात आलेले अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्या संपर्कात आहेत. २००९ मधील ‘श्रीराम सेतू’ आंदोलनाच्या काळातील ‘श्रीराम जागरण अभियान’ हा त्यांच्या कार्यप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. ‘राम सेतू’चा पाण्यावर तरंगणारा दगड वस्त्यांमध्ये नेऊन देशभर ‘श्रीराम जागरण अभियान’ राबविण्यात आले. कुर्ला जिल्ह्यातही हे अभियान मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले होते. विकास यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. या अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना ‘विश्व हिंदू परिषदे’च्या कामाची आणि हिंदू जागरणाच्या उपक्रमांची ओळख झाली. पुढे या कामातून आणखी कार्यकर्ते जोडले गेले.
संघटनात्मक काम करताना परिस्थिती नेहमी अनुकूल असेलच असे नाही. काही वेळा सामाजिक अडचणी येतात, तर काही वेळा वैयक्तिक परिस्थितीही आव्हान देत असते. अशा वेळी काम थांबवण्याऐवजी उपलब्ध परिस्थितीनुसार पुढे जाण्याची पद्धत विकास यांच्या कामात दिसते. एका उपक्रमानंतर दुसरा उपक्रम, एका वस्तीनंतर दुसरी वस्ती आणि जुन्या कार्यकर्त्यांबरोबर नव्या कार्यकर्त्यांशी संपर्क, अशा पद्धतीने काम सुरू राहते. ‘चरैवेति, चरैवेति...’ हा सतत पुढे चालत राहण्याचा विचार त्यांच्या कामाशी जोडलेला आहे.कुर्ल्यात विविध समाजघटक एकत्र राहतात. त्यामुळे संघटनात्मक काम करताना त्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि महापुरुषांविषयीचा आदर लक्षात घेऊन संवाद साधणे, हा त्यांच्या कामाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान झुलेलाल आणि भगवान रामापीर यांसारख्या विविध समाजघटकांच्या आस्थेशी जोडलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान राखण्यावर त्यांचा भर असतो. प्रत्येक समाजाला संघटनात्मक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सण-उत्सवांमध्ये सहभाग असावा आणि विविध समाजघटकांतील कार्यकर्ते एकत्र यावेत, यासाठी ते प्रयत्न करतात.
तरुणांचा सहभाग वाढविणे, हेही त्यांच्या कामातील महत्त्वाचे क्षेत्र. शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या शोधात असलेले युवक किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे तरुण, अशा वेगवेगळ्या स्तरांवर त्यांचा संपर्क राहतो. युवकाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यापेक्षा पुढे त्याने स्वतः जबाबदारी स्वीकारून काम करावे, याला ते अधिक महत्त्व देतात. कार्यकर्त्यांची संख्या वाढण्याबरोबरच जबाबदारी घेणारे कार्यकर्ते तयार होणे, हा त्यांच्या कामातील एक प्रयत्न राहिला आहे. या सगळ्या कामासोबत कौटुंबिक जबाबदार्याही सांभाळाव्या लागतात. संघटनात्मक कामासाठी वेळ देताना सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी येतात. प्रत्येक वेळी परिस्थिती अनुकूल असेलच असे नाही. अशा वेळी कुटुंबातील सहकार्याबरोबरच सहकारी कार्यकर्ते आणि संघटनेचा आधारही महत्त्वाचा ठरतो. विकास यांच्या कार्यप्रवासात हा आधार राहिला आहे.
‘विश्व हिंदू परिषदे’च्या प्रदीर्घ वाटचालीत मोठ्या उपक्रमांबरोबरच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष काम करणार्या कार्यकर्त्यांची भूमिकाही राहिली आहे. कुर्ल्यातील विकास कांबळे यांचा प्रवास त्याच स्थानिक कामाची नोंद करतो. खंडस्तरावरील जबाबदारीपासून कुर्ला जिल्ह्याच्या गोरक्षाप्रमुखापर्यंतचा हा प्रवास केवळ पदांमध्ये झालेली वाढ म्हणून पाहता येत नाही; वस्त्यांशी संपर्क, कार्यकर्त्यांशी संवाद आणि सातत्याने सुरू असलेले काम, यातून त्याची दिशा स्पष्ट होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि ‘विश्व हिंदू परिषद’ स्थापना दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेताना, संघटनेचे काम प्रत्यक्षात कुठे घडते, याकडेही पाहावे लागते. ते वस्त्यांमध्ये होणार्या भेटीत, कार्यकर्त्यांशी होणार्या संवादात, तरुणांना जोडण्याच्या प्रयत्नात आणि एका उपक्रमानंतरही कायम राहणार्या संपर्कात दिसते. विकास कांबळे यांचा कार्यप्रवास याच प्रत्यक्ष कामाची नोंद ठेवणारा आहे.
९९६७०२०३६४