मुंबई (Tarun Chugh) : पंजाबच्या राजकीय-सामाजिक वातावरणाने देशाला संघटनेच्या पातळीवरून राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्माण करणारे अनेक नेते दिले. याच परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते तरुण चुग. सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयाचे प्रभारी, गुजरातचे प्रभारी आणि मध्य प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून ते राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
तरुण चुग यांचा हा प्रवास वारशातून मिळालेला नाही, तर चार दशकांची संघटनात्मक तपश्चर्या, शिस्त आणि समर्पणातून घडलेला आहे. अमृतसरच्या शक्तीनगर परिसरातील गल्लीबोळांतून त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. आजही त्यांचे कुटुंब पंजाबमध्ये परिचित आहे. (Tarun Chugh)
विद्यार्थी परिषदेपासून संघटनेत सक्रिय
महाविद्यालयीन जीवनातच तरुण चुग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. जिल्हा सचिव आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेचा विस्तार करण्यासाठी काम केले.
ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस तरुण चुग यांनी भाजपच्या तळागाळातील संघटनात्मक कामात सक्रीय भूमिका घेण्यास सुरुवात केली. पंजाबमध्ये दहशतवादाचा काळ असतानाही त्यांनी संघटनात्मक काम सोडले नाही. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे, पक्षासाठी पोस्टर लावणे, भिंतींवर लेखन करणे आणि बूथ पातळीवर संघटन मजबूत करणे, अशी कामे त्यांनी केली. १९९९ मध्ये तरुण चुग यांच्या नेतृत्वात पंजामध्ये निघालेली युवा चेतना यात्रा ही त्यांच्या राजकीय जीवनात निर्णायक ठरलीय. (Tarun Chugh)
अमित शाह यांच्या काळात मोठ्या जबाबदाऱ्या
अमित शाह हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संघटनात्मक विस्ताराला वेग आला, त्या काळात तरुण चुग यांच्यावरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव करण्यात आले. त्यानंतर अंदमान-निकोबारचे प्रभारी तसेच दिल्लीचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले. पुढे जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात त्यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी आली. जम्मू-काश्मीर, लडाख आणि तेलंगणा यांसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. (Tarun Chugh)
मध्य प्रदेशातून राज्यसभेत प्रवेश
२०२६ मध्ये भाजपने तरुण चुग यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आणि २९ जून रोजी त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. संसदेत प्रवेश केल्यानंतर त्यांना गृह मंत्रालयाशी संबंधित विभागाच्या संसदीय स्थायी समितीचे सदस्य करण्यात आले.
गुजरातचीही जबाबदारी
भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांना राष्ट्रीय कार्यालयाचे प्रभारी म्हणून नियुक्त केले. राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्यांसोबतच तरुण चुग यांच्यावर गुजरातच्या प्रभारीपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयापासून ते राज्यांच्या संघटनात्मक कामकाजापर्यंत विविध पातळ्यांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. (Tarun Chugh)
तरुण चुग यांचा प्रवास विद्यार्थी परिषद, भाजयुमो आणि भाजपच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांपासून राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय महामंत्री, विविध राज्यांचे प्रभारी आणि आता राज्यसभा सदस्यापर्यंत पोहोचला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मिळाली शिस्त
तरूण चुग यांचा जन्म अमृतसरमध्ये झाला. त्यांचे वडील बनारसी दास चुग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी जोडले गेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून मिळालेली शिस्त, राष्ट्रवाद आणि सेवाभावाचे संस्कार तरूण चुग यांच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी ठरले. (Tarun Chugh)