शिवचातुर्य दिन - कृष्ण कंसाच्या, तर शिवराय औरंगजेबाच्या तावडीतून निसटले!

    04-Sep-2026
Shivaji Maharaj Agra Escape
 
श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर कंसाच्या बंदिशाळेत भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वसुदेवाने मध्यरात्रीच्या मुसळधार पावसात यमुना नदी ओलांडून गोकुळात श्रीकृष्णाला माता यशोदेकडे सुखरुप पोहोचविले. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण कंसाच्या तावडीतून बाहेर पडले, त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय बाल शंभूरांजेसह आग्र्याच्या कैदेतून मिठाईच्या पेटार्‍यात सुखरुप निसटले. तो दिवस होता दि. १७ ऑगस्ट १६६६, तिथीनुसार गोकुळाष्टमीचा. हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शिवरायांची कृष्णनीती आणि या प्रसंगात संदर्भ दिला जाणारे मदारी मेहतरचे पात्र कसे काल्पनिक, संभ्रम निर्माण करणारे आहे, त्याचा ऊहापोह करणारा हा लेख...
 
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शिवकालीन इतिहासाची प्रचंड मोडतोड झालेली दिसते. ‘पुरोगामी’ आणि ‘सेक्युलर’ विचारांच्या हव्यासापायी किंवा याच गोंडस नावाखाली शिवकालीन इतिहासातील सोयीचे व अर्धवट संदर्भ देऊन आपल्या मनात येईल तसा खोटा इतिहास प्रस्तुत करण्यात येत आहे. त्यासाठी नकली इतिहासकारांमध्ये तर एकच चढाओढ लागली आहे. काही स्वयंघोषित इतिहास संशोधक आणि काही बाजारू विचारवंतांमध्ये इतिहास प्रदूषित करण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र उभे झाले. महाराष्ट्रात समाजविघातकांच्या काही दांभिक टोळ्या शिवकालीन इतिहास प्रदूषित करून शिवरायांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक खोट्या घटनांचा खोटा इतिहास रेटून-रेटून प्रस्तुत करून, अनेक काल्पनिक पात्रेसुद्धा उभी करत आहेत.
 
छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याच्या कैदेमधून गोकुळाष्टमी, दि. १७ ऑगस्ट १६६६ रोजी भगवान कृष्णनीतीचे चातुर्य दाखवून आपली सुटका केली होती. त्यामध्ये ‘मदारी मेहतर’ यांचा संदर्भ दिला जातो. तसेच मदारी मेहतर यांचा मुस्लीम उल्लेख करून हिंदू समाजात संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे शिवरायांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लीम असल्याचा कांगावा, सेनापती नूर खान बेगपासून ‘शिवरायांचे गुरू’ म्हणून बाबा याकुत यांना प्रस्थापित करण्याचा खोटा इतिहास समाजात मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे काल्पनिक पात्र ‘मदारी मेहतर’सुद्धा समोर आणले जात आहे. वास्तविक पाहता, शिवरायांच्या शिवकालीन इतिहासामध्ये मदारी मेहतरांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही किंवा कोणत्याही ‘बखर’मध्ये अस्सल समकालीन पुराव्याची नोंदसुद्धा नाही. त्यामुळे केवळ अशाप्रकारच्या अफवाच पसरविल्या जात असतात.
 
मागील वर्षी ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या निमित्तानेसुद्धा महाराष्ट्रात खोटा शिवकालीन इतिहास प्रस्तुत करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचप्रमाणे शिवकालीन इतिहासातील ‘मदारी मेहतर’ काल्पनिक पात्र बनावट कागदपत्रांद्वारे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शिव-शंभूभक्तांनी जागरूक होणे आवश्यक आहे. कारण, शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेनंतर इतिहासामध्ये हिरोजी फर्जंद आणि अन्य मावळ्यांचा उल्लेख आढळतो. मात्र, मदारी मेहतरांचा संदर्भ कोठेही आढळत नाही.
 
आग्रा घटनेनंतर मदारी मेहतरांचे काय झाले, मदारी मेहतर कुठे गेला, याची नोंद नाही. त्यामुळे मदारी मेहतर शिवकालीन इतिहासातील काल्पनिक पात्र वाटते. मदारी मेहतरांच्या काल्पनिक इतिहासावर चर्चा होणे आवश्यक आहे.
 
आग्र्यामध्ये पोहोचले शिवराय
 
छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबच्या ५०व्या वाढदिवसाप्रसंगी औरंगजेबाच्या निमंत्रणानुसार आग्राभेटीला गेले होते. स्वराज्याचा कारभार मातोश्री जिजाऊ यांच्याकडे सोपवून आपल्या काही मावळ्यांसोबत दि. ५ मार्च १६६६ रोजी आग्रा दिशेने निघाले होते. दि. १२ मे १६६६ रोजी शिवराय बाल शंभूराजांसह आग्रा दरबारात पोहोचले. औरंगजेबाच्या आग्रा दरबारात शिवरायांचा योग्य सन्मान करण्यात आला नाही. मुद्दामहून शिवरायांचे आसन ताहीरखानच्या मागे कमी दर्जाच्या म्हणजे, मागच्या तिसर्‍या रांगेत ठेवले गेले होते. तसेच शिवरायांचे आग्रा शहरात यथोचित स्वागत करण्यात आले नाही किंवा दरबारातील कोणताही मोठा अधिकारी स्वागतासाठी आला नव्हता. त्यामुळे दरबारात जे काही घडत होते, त्याविषयी शिवराय प्रचंड संतापले. त्यांनी औरंगजेबाने दिलेली ‘खिल्लत’सुद्धा झिडकारली होती. बादशाहाच्या दरबारात मोठ्या आवाजात बोलून दरबाराच्या मान-मर्यादा भंग केल्या. शिवरायांनी दरबारातील मर्यादाभंग केल्यामुळे शिवराय व बाल शंभूराजे यांना नजरकैदेमध्ये ठेवण्याचा आदेश देऊन क्रूर राजांदाज खानच्या हवेलीकडे नेण्याचा आदेश देण्यात आला. कैद करून सिद्धी फुलादखानची तेथे पाच हजार सैनिकांची छावणी लावण्यात आली. नजरकैदेत असताना औरंगजेबाकडून घातपात घडवून आणण्याच्या दुष्ट हेतूने चौया बसवून सुरक्षासुद्धा वाढविण्यात आली होती; पण औरंगजेबाचा घातपाताचा दुष्ट हेतू लक्षात येताच, शिवरायांनी आपल्या सवंगड्यांशी चर्चा करून बादशाहाच्या हातावर तुरी देऊन निसटण्याची चातुर्य योजना आखली.
 
कंसाच्या तावडीतून कृष्ण सुटला
 
छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना औरंगजेबाचा दुष्ट हेतू लक्षात घेऊन त्यांनी आपल्यासोबत असलेल्या सवंगड्यांना योजनापूर्वक आग्र्याच्या बाहेर पाठविले. आजारी असल्याची बतावणी करून त्यांनी साधुसंत, फकीर यांना मिठाई पाठविण्याची दरबारामधून मागणी मंजूर करून मिठाईचे पेटारे पाठविण्यास सुरुवात केली आणि त्याच मिठाईच्या पेटार्‍यामधून बादशाहाच्या हातावर तुरी देऊन निसटण्याची योजना आखली. दि. १७ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी दिवशी शिवरायांच्या जागी हिरोजी फर्जंद झोपले व काल्पनिक पात्र मदारी मेहतरांचा उल्लेख आहे. अस्सल इतिहासात मदारी मेहतरांचा उल्लेख नाही. शिवराय व बाल शंभूराजे मिठाईच्या पेटार्‍यामधून निसटले. शिवराय मथुरेत पोहोचले. त्यांनी वेश बदलून संन्याशाचा वेश धारण केला. बाल शंभूराजे यांना मथुरेत ब्राह्मण असलेल्या मोरोपंत पिंगळे यांची बहीण लक्ष्मीबाई विसाजीपंत, कृष्णाजीपंत यांच्या जवळ ठेवून आग्रा, मथुरा, अलाहाबाद, वाराणसी, गोवळकोंडा, बिदर, गुलबर्गा, पंढरपूर, फलटण, राजगड असा प्रवास करीत राजगडावर पोहोचून मातोश्री जिजाऊ यांच्या चरणावर मस्तक ठेवले.
 
शिवरायांच्या आग्रा ते राजगड प्रवासाबाबत तथा तारखांबाबत राजस्थानी इतिहास, सेतू माधव पगडी, जदुनाथ, बखरमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. परंतु, त्यामध्ये मदारी मेहतरांचा उल्लेख नाही. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण कंसाच्या तावडीतून बाहेर पडले, त्याचप्रमाणे शिवराय कंसरूपी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले होते. छत्रपती शिवराय औरंगजेबाच्या तावडीतून निसटणे फार मोठी घटना होती.
 
आशिया खंडातील सर्वांत मोठी सुटका
 
औरंगजेब आशिया खंडातील अत्यंत क्रूरकर्मा शासक होता. त्याने आपल्या वडिलांनासुद्धा कारागृहात डांबून छळ केला होता. सख्ख्या भावांच्या हत्या करून स्वतःला ‘आलमगीर’ म्हणायचा. क्रूर औरंगजेबाच्या कैदेमध्ये शिवराय असल्यामुळे स्वराज्यात प्रचंड चिंता निर्माण झाली होती. परंतु, शिवरायांनी चातुर्य दाखवून स्वतःची, बाल शंभूराजे आणि आपल्या सर्व सवंगड्यांची सुखरूप सुटका करून घेतली होती. ही सुटका आशिया खंडातील सर्वांत मोठी सुटका होती. त्यामुळे औरंगजेबाची आशिया खंडात प्रचंड नाचक्कीसुद्धा झाली होती. शिवरायांच्या आग्राभेट व सुटकेच्या शिवकालीन इतिहासामध्ये शिवरायांसोबत त्र्यंबक सोनदेव डबीर, निराजी रावजी, रघुनाथपंत बल्लाळ, हिरोजी फर्जंद, बाजी जेधे, बहिर्जी नाईक, येसाजी कंक, अनेक मावळे असल्याची नोंद आहे. परंतु, मदारी मेहतर यांच्या नावाची नोंद आढळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिवकालीन इतिहासाची मोडतोड करून काल्पनिक पात्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे? खोट्या इतिहासावर चर्चा करून शिवरायांच्या आग्राभेटीतील ‘मदारी मेहतर’ या काल्पनिक पात्रावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे.
 
अशोक राणे
९४२३६५८३८५




संबंधित मजकूर