मुंबई (Pakistan Hindu Temple Demolition): पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील १२५ वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिराच्या पाडकामाच्या घटनेचा भारताने बुधवारी तीव्र निषेध केला. भारताने शहबाज शरीफ सरकारकडे या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले, पाकिस्तानातील ऐतिहासिक हिंदू मंदिर पाडल्याच्या अत्यंत चिंताजनक बातम्यांमुळे आम्ही व्यथित आहोत. शतकाहून अधिक जुने असलेल्या अल्पसंख्याकांच्या या पूजास्थळाची झालेली विटंबना आणि तोडफोड आम्ही कठोर शब्दांत निषेध करतो.(Pakistan Hindu Temple Demolition)
त्यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तान सरकारने मंदिराचे पुनर्स्थापन करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत आणि अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याची आपली मूलभूत जबाबदारी पार पाडावी. शतकाहून अधिक जुन्या या मंदिराचे संरक्षण करण्यात पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे स्पष्ट अपयश आणि उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. अशा घटना पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदाय आजही किती असुरक्षित आहे, याची पुन्हा एकदा आठवण करून देतात. त्यांच्या धार्मिक अधिकारांचे आणि पूजास्थळांचे सातत्याने गंभीर उल्लंघन होत आहे. भारताने या घटनेची तातडीने आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.(Pakistan Hindu Temple Demolition)
पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' च्या अहवालानुसार, या मंदिराच्या पाडकामामुळे पाकिस्तानातही मोठा वाद निर्माण झाला आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांचा आरोप आहे की, जवळील एका मदरशाचा विस्तार करण्यासाठी हे मंदिर मुद्दाम पाडण्यात आले. मात्र, इवॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डने हा आरोप फेटाळत मुसळधार पावसामुळे मंदिर कोसळल्याचा दावा केला आहे. हे मंदिर २१ ऑगस्ट रोजी पाडण्यात आले, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.(Pakistan Hindu Temple Demolition)
अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पाकिस्तान मसिहा-ए-मिल्लत पार्टीने आरोप केला की, काही लोकांच्या गटाने मंदिर पाडल्यानंतर तेथील विटा, घुमटावरील धातूची सजावट आणि इतर साहित्यही काढून नेले. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान मसिहा-ए-मिल्लत पार्टीने संबंधित अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर सुमारे १२५ वर्षांहून अधिक जुने होते आणि स्थानिक हिंदू समाजाच्या धार्मिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानले जात होते.(Pakistan Hindu Temple Demolition)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक