लंडनमध्ये सरसंघचालकांचे भव्य स्वागत:१०० हून अधिक ब्रिटिश हिंदू संघटनांचा पाठिंबा

    04-Sep-2026   

Mohan Bhagwat London Visit
 
 
मुंबई (Mohan Bhagwat London Visit) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे गुरुवारी लंडनमध्ये १०० हून अधिक ब्रिटिश हिंदू आणि विविध हिंदू संघटनांनी उत्साहात स्वागत केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या जागतिक जनसंपर्क अभियानाच्या अंतिम टप्प्यात ते ब्रिटनमध्ये पोहोचले आहेत. यापूर्वी त्यांनी अमेरिका आणि कॅनडाचाही दौरा केला होता. दरम्यान, ब्रिटनचे सुरक्षा मंत्री डॅन जार्विस यांनी ब्रिटिश संसदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात पुन्हा स्पष्ट केले की, डॉ. भागवत यांचा हा दौरा ब्रिटनच्या विद्यमान स्थलांतर नियमांनुसार पूर्णपणे वैध आहे.(Mohan Bhagwat London Visit)
 
सरसंघचालकांच्या ब्रिटन दौऱ्याच्या सुरुवातीलाच हिंदू कौन्सिल यूके, हिंदू फोरम ऑफ ब्रिटन, हिंदू स्वयंसेवक संघ यूके आणि इनसाइट यूके यांसारख्या प्रमुख हिंदू संघटनांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्या दौऱ्याचे स्वागत केले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जगातील सर्वात मोठा स्वयंसेवी संघटनात्मक उपक्रम असून, चारित्र्यनिर्माण, स्वयंसेवा, नेतृत्व विकास, सामाजिक एकात्मता आणि जागतिक बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित आहे.(Mohan Bhagwat London Visit)
 
संघाच्या व्यापक सामाजिक कार्याचा उल्लेख करताना या संघटनांनी सांगितले की, संघ दुर्गम भागात शिक्षण पोहोचविणे, सामाजिक समता वाढविणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वप्रथम मदतीसाठी धावून जाणे यासाठी ओळखला जातो.(Mohan Bhagwat London Visit)
 
सरसंघचालकांच्या दौऱ्यादरम्यान ब्रिटिश-भारतीय खासदार नादिया व्हिटोम यांनी ब्रिटिश गृह मंत्रालयाला संसदेत प्रश्न विचारला होता. द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या किंवा अतिरेकी विचारसरणीच्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये प्रवेश रोखण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे मूल्यमापन करण्यात आले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना सुरक्षा मंत्री डॅन जार्विस यांनी सांगितले की, गृह मंत्रालय कोणत्याही विशिष्ट प्रकरणावर टिप्पणी करू शकत नाही. मात्र, हिंसा किंवा द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या विचारांचा प्रसार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात कारवाई करण्यासाठी ब्रिटन सरकार कटिबद्ध आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ब्रिटनमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्थलांतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.(Mohan Bhagwat London Visit)
 
सरसंघचालकांच्या यांच्या दौऱ्याला विरोध करत साउथ एशिया सॉलिडॅरिटी ग्रुप आणि हिंदूज फॉर ह्यूमन राइट्स यूके यांच्या नेतृत्वाखालील काही नागरी संघटनांनी ब्रिटिश सरकारला त्यांचा दौरा रोखण्याचे आवाहन केले होते. तथापि, ब्रिटन सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, डॉ. मोहनजी भागवत यांचा दौरा देशाच्या कायदेशीर स्थलांतर नियमांच्या चौकटीतच होत असून, त्यात कोणताही नियमभंग झालेला नाही. (Mohan Bhagwat London Visit)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर