मेक्सिकोचे ड्रग्ज वास्तव

    04-Sep-2026   
 
 Mexico Drug Cartels
 
कालपरवाच मेक्सिकोमध्ये ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी एका १८ वर्षांच्या युवकाला अटक केली. त्याला पकडले म्हणून ‘जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल’ या ड्रग कार्टेलने पोलीस मुख्यालयासमोरच हल्ला केला. या स्फोटात दोन पोलीस अधिकार्‍यांसह किमान ११ जण जखमी झाले आणि आसपासच्या ४० इमारतींचे नुकसान झाले. मेक्सिकोमध्ये बालक आणि युवकांना ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात गुलाम बनवणे, ही सामान्य बाब. पाश्चात्त्य देशात आणि अगदी अरब देशही ड्रग्जच्या कचाट्यात हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशात आणि राज्यात ड्रग्जविरोधात शून्य सहानुभूती आणि कठोर मोहीम सुरू आहे, हे नक्कीच दिलासादायक. भारताचा मेक्सिको होऊ द्यायचा नसेल, तर ही मोहीम आवश्यक अशीच.
 
मेक्सिकोमधली घटना. काही वर्षांपूर्वी ४३ विद्यार्थी बसने प्रवास करत होते, तर ‘गुएरेरोस युनिडोस’ या ड्रग्ज कार्टेलने त्या बसचे अपहरण झाले. या मुलांनी ड्रग्जच्या व्यापारात गुलाम बनण्यास नकार दिला म्हणून त्यांचा खून करण्यात आला. लहान बालकांच्या जगण्याचा असा क्रूर बाजार मांडणार्‍या या वास्तवाचा कोळसा उगाळावा तितका काळाच. अनेक घटना जगाच्या पटलावर समोर आल्या. त्यातली भीषणता आणि अमानवीपणा पाहून सुन्न व्हायला होते. ९०च्या दशकातली घटना. अलेहांद्रो होडेना हा अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत अमेरिकन कुटुंबातला युवक. ‘तिजुआना कार्टेल’ने त्याचे अपहरण केले. ‘तुझी आणि तुझ्या कुटुंबाची हत्या करू,’ अशी धमकी देऊन त्याला अमली पदार्थांच्या तस्करीत ओढले. ड्रग्जमाफियांना वाटले की, प्रतिष्ठित घरच्या युवकाने तस्करी केली, तर कुणीही त्याच्यावर संशय घेणार नाही. मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थेने त्याला पकडले. तो सरकारी साक्षीदार बनण्यास तयार झाला. परंतु, कोर्टात साक्ष देण्यापूर्वीच पुन्हा त्याचे अपहरण झाले. अनेक महिन्यांनंतर त्याचा छिन्नविच्छिन्न मृतदेह एका महामार्गावर सापडला. संपन्न आणि प्रतिष्ठित घरच्या तरुणाची ही भीषण जीवनकथा. तिथे गरीब बालक आणि युवकांचे काय होत असेल, हा विचार न केलेला बरा!
 
पण, हे ड्रग्ज कार्टेल केवळ अपहरण किंवा धाकदपटशा करून बालकांना-युवकांना या धंद्यात ओढत नाहीत, तर मोबाईल गेमच्या माध्यमातून जसे- ‘प्री पायर’, ‘ग्रँट थेप्ट ऑटोव्ही’, ‘कॉल ऑफ ड्युटी’ या गेमच्या माध्यमातून ड्रग्ज कार्टेलच्या सदस्यांनी मुलांना ड्रग्जच्या धंद्यात ओढल्याच्या घटना घडल्या. हे आणि इतर गेम खेळणार्‍या बालकांना सुरुवातीला सोपे टास्क दिले गेले आणि बक्षिसे दिली गेली. मूल पूर्ण गुंतल्यानंतर त्यांना ड्रग्जचे व्यसन लावले गेले. त्यांना ड्रग्ज तस्करी आणि संबंधित काम करायला भाग पाडले गेले. यातूनच मेक्सिकोमध्ये २००६ पासून आतापर्यंत ४ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, १ लाख ३० हजारांहून अधिक लोक बेपत्ता आहेत. हे बेपत्ता लोक कुठे गेले? तर, सँटियागो मेझा लोपेझ या व्यक्तीला पोलिसांनी पकडले. त्याच्या चौकशीत भयानक सत्य बाहेर आले. तो गवंडी होता. पण, ‘तिजुआना कार्टेल’ने त्याचे अपहरण केले. त्याला काम दिले गेले. ते म्हणजे ड्रग्जच्या धंद्यात काम करायला नकार देणार्‍या किंवा प्रतिस्पर्धी टोळीच्या व्यक्तीचे ड्रग्ज माफिया खून करत. हे मृतदेह अ‍ॅसिडच्या मोठ्या पिंपात टाकून पूर्णपणे विरघळवणे, हे काम सँटियागो मेझा लोपेझला दिले होते. त्याने पोलिसांसमोर कबुली दिली की, पोलीस ज्यांना बेपत्ता समजत होते, अशा तब्बल ३०० पेक्षा जास्त मृतदेह त्याने अ‍ॅसिडमध्ये विरघळवून नष्ट केले होते. असे शेकडो लोक याच कामासाठी ड्रग्ज माफियांनी ठेवले होते.
 
असो. जगावर राज्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकाखाली हे सगळे क्रूर धंदे सुरू आहेत. मेक्सिकोमध्ये सत्ता कोणाची? तर, मेक्सिकोमध्ये सत्ता या विविध ड्रग्ज कार्टेलची. त्यांच्यावर कारवाई केली की, ते सरळ प्रशासकीय व्यवस्था, पोलीस आणि सैन्यतळावरही हल्ला करतात. ड्रग्जच्या धंद्यातून त्यांच्याकडे मुबलक पैसा आहे. या पैशातून त्यांनी आधुनिक हत्यारे गोळा केली. मेक्सिकोच्या सैन्यापेक्षाही त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारे आहेत, असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर बेपत्ता झालेल्या मुलांचे पालक संशयास्पद वाटणार्‍या जागी जाऊन मुलांना शोधत आहेत. पण, मुले भेटतील का? की त्यांचा मृतदेह आधीच अ‍ॅसिडच्या टाकीत विरघळवलेला असेल? या भीषण विचारांनी पालकांचे जगणे नरक बनले आहे. पाश्चात्त्य देशांचे हे ड्रग्ज वास्तव!
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर