मुंबई (EOS-5 Satellite) : भारताच्या सीमा, सामरिक तळ आणि महत्त्वाच्या भागांवर २४x७ अखंड नजर ठेवणारा देशाचा पहिला भूस्थिर कक्षेतील इमेजिंग उपग्रह ईओएस-५ (EOS-5) इस्रोने आज पहाटे २.५५ वाजता श्रीहरिकोटा येथून जीएसएलवी-एफ१७ मोहिमेद्वारे प्रक्षेपित केला. सुमारे ३६ हजार किलोमीटर उंचीवरून हा उपग्रह पृथ्वीवरील त्याच भागावर सातत्याने लक्ष ठेवू शकणार असल्याने तो भारताचा अंतराळातील ‘हॉकआय’ ठरणार आहे.
इस्रोने ईओएस-५ ला भूस्थिर कक्षेतून कार्य करणारा भारताचा पहिला अत्याधुनिक इमेजिंग उपग्रह असे वर्णन केले आहे. यशस्वी प्रक्षेपणानंतर 'जीसॅट-१ए' या नावानेही ओळखला जाणारा हा उपग्रह दूरवरच्या सीमाभागांवर, सामरिक मालमत्तांवर आणि जागतिक संघर्षग्रस्त क्षेत्रांवर अंतराळातून सतत नजर ठेवू शकेल. हा उपग्रह लष्करी तसेच नागरी अशा दोन्ही उद्देशांसाठी उपयोगी ठरणार आहे. (EOS-5 Satellite)
सध्या इस्रोचे बहुतेक कार्टोसॅट आणि रिसॅट मालिकेतील पृथ्वी निरीक्षण उपग्रह लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच ६० ते २,००० किलोमीटर उंचीवरील कक्षेत कार्यरत आहेत. हे उपग्रह पृथ्वीभोवती सतत फिरत असल्याने एखाद्या विशिष्ट ठिकाणाचा पुन्हा फोटो घेण्यासाठी काही दिवस लागू शकतात. याउलट, भूस्थिर कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगाशी समांतर गतीने ३६ हजार किलोमीटर उंचीवर फिरत असल्यामुळे तो पृथ्वीवरील एका निश्चित भागावर कायम स्थिर असल्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याच प्रदेशावर रिअल-टाइममध्ये अखंड निरीक्षण शक्य होते. यामुळे सीमावर्ती हालचाली, तीव्र वादळे, विजांचा कडकडाट, जंगलातील आगी यांसारख्या वेगाने बदलणाऱ्या घटनांवर त्वरित लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे ईओएस-५ भारतीय उपखंडावर कायमस्वरूपी ‘अंतराळातील डोळा’ म्हणून काम करेल.
ईओएस-५ मध्ये मध्ये दोन मल्टीस्पेक्ट्रल इमेजर्स बसविण्यात आले आहेत. त्यापैकी एका कॅमेऱ्याची प्रति पिक्सेल ४२ मीटर इतकी स्पॅटिअल रिझोल्यूशन क्षमता असून, भूस्थिर कक्षेतील कोणत्याही उपग्रहावर बसविण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्च क्षमतेचा कॅमेरा मानला जात आहे. हा उपग्रह पृथ्वीची तपशीलवार छायाचित्रे घेऊन पर्यावरणीय निरीक्षण, भूभागातील बदलांचे विश्लेषण आणि नियमित निरीक्षण आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण माहिती पुरवेल. (EOS-5 Satellite)
जीसॅट-१ चे स्थान घेणार ईओएस-५
ईओएस-५ हा जीसॅट-१ या उपग्रहाची जागा घेणार आहे. १२ ऑगस्ट २०२१ रोजी जीएसएलवी-एफ१० रॉकेटच्या क्रायोजेनिक अपर स्टेजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जीसॅट-१ चे प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. तो यशस्वी झाला असता, भूस्थिर कक्षेतून कार्य करणारा भारताचा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह ठरला असता. श्रीहरिकोटा येथून होणारी जीएसएलवी-एफ१७ मोहीम इस्रोसाठी आणखी एका कारणाने महत्त्वाची आहे. जवळपास आठ महिन्यांच्या अंतरानंतर इस्रो पुन्हा एकदा प्रक्षेपणपॅडवरून मोठी मोहीम राबविणार असून, ईओएस-५ चे यशस्वी प्रक्षेपण भारताच्या अंतराळ-आधारित सुरक्षा आणि पृथ्वी निरीक्षण क्षमतेत मोठी भर घालणारे ठरणार आहे. (EOS-5 Satellite)