देवद्रोही काँग्रेस

    30-Sep-2026   
 
Revanth Reddy Congress Family Politics
 
"भगवान श्रीराम हे श्रीमंतांचे आणि भगवान शंकर हे गरिबांचे देव आहेत,” हे विधान कोणा अनाडी, निर्बुद्ध माणसाचे नाही; तर हा अजब तर्कट मांडणारे महाभाग आहेत, तेलंगणचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी! एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि पुनश्च काँग्रेसचा देव, देश आणि धर्मविरोधी चेहरा समोर आला.
 
एवढेच नाही, तर भाजपने ‘राम’ चोरल्याचा बाष्कळ आरोप करीत, मोदीजी आणि भाजपवाले कधीही ‘हर हर महादेव’ म्हणत नाहीत, असा हास्यास्पद आरोपही त्यांनी केला. खरेतर यावरून रेड्डींनी गांधी परिवाराला खूश करण्याचा प्रयत्न केला असला, तरी देशासमोर त्यांनी स्वत:चेच हसे करून घेतले. कारण, अख्खा देश हे जाणतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जितके कट्टर रामभक्त आहेत, तितकेच ते निस्सीम शिवभक्तही. अगदी वानगीदाखल जरी सांगायचे झाले, तरी मोदींचे केदारनाथजवळील गुहेतील ध्यान असो, काशी-विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार असो की, २०१७च्या महाशिवरात्रीला कोईम्बतूरच्या ‘ईशा फाऊंडेशन’मध्ये आदियोगी शंकराच्या ११२ फूट उंच तेजस्वी मूर्तीच्या त्यांच्या हस्ते अनावरणाचा प्रसंग असो, पंतप्रधानांची शिवभक्ती ही अगदी जगजाहीरच! पण, नाहक भाजपवरील राजकीय हल्ल्याआड हिंदू धर्माला बदनाम करण्याचा रेड्डींचा हा प्रयत्न निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल. हिंदूंना जातिपातीत, उत्तर-दक्षिण असे विभागून झाल्यानंतर, आता देवतांनाही चक्क गरीब-श्रीमंतांच्या तराजूत तोलण्याची काँग्रेसची ही कोती मनोवृत्ती! प्रभू राम श्रीमंत म्हणून भाजप त्यांचा उदोउदो करते, हा रेड्डींचाच तर्क क्षणभर मान्य केला; तर मग त्या न्यायाने भाजपने भगवान कुबेरांचाच जयघोष करायला नको का? असो. ज्यांना मुळात भगवान रामाचेच अस्तित्व मान्य नव्हते, ज्यांनी रामसेतूला विरोध केला, श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न कोर्टकचेरीत खितपत ठेवला, त्या काँग्रेसींना रामभक्ती सोडाच; देव-देश-धर्माविषयी बोलण्याचा कणभरही अधिकार नाही. त्यामुळे रेड्डींनी ‘राम विरुद्ध शंकर’, ‘गरीब विरुद्ध श्रीमंत’, ‘द्रविड विरुद्ध आर्य’ असे भेदभावाचे नाहक अवडंबर माजवून, हिंदूंमध्ये दुहीची बीजे पेरण्याचा कुटिल प्रयत्न करू नये. कारण, आजचा हिंदू हा प्रभू रामाप्रमाणे आपल्या मर्यादा जाणणाराही आहे आणि कुणी आपली मर्यादा सोडलीच, तर शंकराप्रमाणे तांडव करणाराही!
 
‘परिवार’वादी काँग्रेस
 
याच रेवंत रेड्डींनी मागेही असेच एक विधान करून काँग्रेसच्या हायकमांडला खूश करण्याचा प्रयत्न केला होता. या देशाची लढाई ‘गांधी परिवार विरुद्ध संघ परिवार’ अशी असल्याचे वक्तव्य रेड्डींनी केले. पण, रेड्डींनी दोन्हींची केलेली तुलना ही खरेतर तथ्यहीनच म्हणावी लागेल. कारण, काँग्रेससाठी ‘गांधी परिवार’ हाच सर्वोपरी असला, तरी भाजप आणि संघ हा प्रारंभीपासूनच ‘राष्ट्र प्रथम’ या विचारसरणीनुसार वाटचाल करणारा. मुळात ‘गांधी परिवार’ आणि ‘संघ परिवार’ या दोहोंमध्ये ‘परिवार’ हा शब्द जरी समान असला, तरी त्याचे अर्थ हे पूर्णपणे भिन्न आहेत. ‘गांधी परिवार’ हा सोनिया, राहुल, प्रियंका असा शब्दश: घराणेशाहीचा काँग्रेसी त्रिकोण! परंतु, ‘संघ परिवार’ ही संज्ञा कोणत्याही व्यक्तीभोवती, संघातील पदांभोवती अथवा कोणत्याही कुटुंबाभोवती पिंगा घालणारी नाही. संघविचारांनी कार्यरत सगळ्या संस्था, त्यांचे स्वयंसेवक असा हा देशविदेशातला ‘संघ परिवार.’ त्यामुळे ‘गांधी परिवारा’ची व्याख्या ही संकुचित आणि राजकीय स्वार्थाने बरबटलेली, तर ‘संघ परिवारा’ची व्याख्या ही अधिक व्यापक आणि सेवाभावी. खरेतर काँग्रेसमध्ये सहभागी होण्यापूर्वी आपल्या विद्यार्थीदशेत रेड्डींचाही ‘अभाविप’शी संबंध आला होताच. त्यामुळे ‘संघ परिवारा’ची विचारसरणी, कार्यशैली याच्याशी ते सर्वदूर परिचितच. पण, आधी म्हटले तसे, याच ‘गांधी परिवारा’ची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, म्हणूून रेड्डीच नव्हे; तर सगळ्याच काँग्रेसी नेत्यांना अधूनमधून अशी हिंदूविरोधी, संघविरोधी विधाने करण्याचा चेव येतो. रेड्डीही त्याच लाळघोटेपणाच्या शर्यतीत सहभागी झालेले आणखीन एक काँग्रेसचे नेते.
 
आज स्वत:ला ‘गांधी परिवार’ म्हणून मिरवणार्‍यांचा आणि महात्मा गांधी यांचा काडीमात्र संबंध नाही, हे देशवासीयही पुरते ओळखून आहेतच. त्यामुळे आडनावाच्या आडून स्वत:ला कितीही ‘गांधी’ म्हणून मिरवण्याचा प्रयत्न केला, तरी या परिवाराला ‘महात्मा’ होता येणार नाही, ही खूणगाठ त्यांनी बांधलेलीच बरी. एकूणच काय तर, काँग्रेस हा खरेतर एक ‘परिवार’ नसून, ती राजकीय स्वार्थासाठी सौदेबाजी करणारी कंपनीच आहे. त्यामुळे ‘संघ परिवारा’च्या सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाच्या अखंड संकल्पाशी त्याची दुरान्वयेही तुलना होऊ शकत नाही, हेच खरे!




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर