
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात मंगळवारी सायंकाळी रानकुत्र्याचा वावर आढळून आला (chandrapur city). दाट लोकवस्तीच्या भागात सायंकाळी चारच्या सुमारास हा वन्यप्राणी दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो रानकुत्रा असल्याचे स्पष्ट झाले (chandrapur city). मात्र, या निमित्ताने रानकुत्र्यासारख्या संकटग्रस्त प्रजातीचा वावर शहरी भागात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (chandrapur city)
तुकूम परिसरातील नागरिक पंकज बेले यांना सुरुवातीला एक रानटी कुत्र्यासारखा प्राणी दिसला. हा प्राणी लांडगा असल्याचे त्यांना वाटले. मात्र, घटनेची माहिती मिळाल्यानंतर हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी बेले यांची भेट घेऊन प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संबंधित प्राणी रानकुत्रा असल्याचे स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा रानकुत्रा राधाकृष्ण टॉकीज आणि केंद्रीय औद्योगिक परिसरातील (CSTPS) जंगलाच्या दिशेने तुकूम परिसरात दाखल झाला. त्यानंतर तो पोलीस मैदानाच्या मागील बाजूच्या परिसराकडे गेल्याचे सांगण्यात येते.
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र रानकुत्र्याचा ठावठिकाणा लागला नाही. तो ज्या मार्गाने शहरात आला, त्याच मार्गाने पुन्हा जंगलाच्या दिशेने परतला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चंद्रपूर परिसरात जंगल आणि मानवी वस्ती यांच्यातील अंतर कमी असल्याने वन्यप्राण्यांचा अधिवासाबाहेर वावर होण्याच्या घटना अधूनमधून समोर येतात. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ ‘वन्यप्राणी शहरात शिरला’ या दृष्टिकोनातून न पाहता, वन्यजीवांच्या हालचालींचे मार्ग आणि त्यांच्या अधिवासाशी जोडणारे परिसर समजून घेणे आवश्यक आहे. रानकुत्रा हा जंगलातील महत्त्वाचा मांसाहारी प्राणी असून तो सामान्यतः कळपाने वावरतो. शहरालगतच्या जंगलातून त्याची हालचाल झाल्याने संबंधित भागातील वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते. तसेच नागरिकांनी वन्यप्राणी आढळल्यास त्याचा पाठलाग अथवा गर्दी न करता तत्काळ वन विभागाला माहिती देणे गरजेचे आहे.