पारंपरिक भारतीय खेळ असलेल्या ‘मल्लखांब’चे कौशल्य अंगी बाणवत, जगभर त्याचा प्रसार करणार्या विश्वविक्रमवीर अश्विन रावल याच्याविषयी...
खेळाचा संबंध शरीराशी असतो, असे आपण म्हणतो. पण, चांगला खेळाडू घडताना शरीरापेक्षा मनाचीच परीक्षा अधिक होते. शरीर थकते, दुखते; मन मात्र पुन्हा उठायला तयार झाले की, सरावाची सुरुवात नव्याने होते. म्हणूनच, खेळातील यश हे एखाद्याच दिवसाचे नसते. त्यामागे सततची साधना असते. आपल्या देशातल्या पारंपरिक खेळांकडे पाहिल्यास ही गोष्ट अधिकच स्पष्ट जाणवते. काळ बदलला, खेळांकडे पाहण्याची दृष्टीही बदलली. काही खेळ प्रसिद्धीच्या प्रकाशात आले, काही मात्र त्या प्रकाशापासून दूरच राहिले. तरी त्यांची साधना थांबली नाही. ‘मल्लखांब’ हा त्याच परंपरेतला खेळ! खांबावर शरीराचा तोल सांभाळताना खेळाडू कसरतीबरोबरच, क्षमतेवरही पूर्ण विश्वास ठेवतो. हाताची पकड सुटली, तर खाली पडण्याची शयता असतेच; पण पकड घट्ट करण्याची शिकवण सराव देतो. अशाच एका भारतीय खेळाशी आयुष्याचे नाते जोडून, त्यात प्रावीण्य मिळवणार्या आणि पुढे ‘मल्लखांब’ प्रसारासाठी जगभ्रमंती करणार्या अश्विन रावल याची ही यशोगाथा!
अश्विनचा जन्म १९८२ मध्ये मुंबईतला. मुंबईच्या सांताक्रूझमध्येच त्याचे बालपण गेले. सांताक्रूझच्या साने गुरुजी आरोग्यमंदिर शाळेत दहावी झाली. शाळेत चौथीपर्यंत अश्विनही इतर मुलांसारखाच खेळायचा.त्यापलीकडे त्याचा काही विचार नव्हता. चौथीत असताना मात्र त्याने शाळेतील यशवंत साटम सरांना ‘मल्लखांब’चा सराव करताना पाहिले. एखादी गोष्ट पहिल्यांदा पाहताना तिच्याबद्दल कुतूहल वाटते, तसेच काहीसे अश्विनचे झाले. हा खेळ जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.
दरम्यान, शाळेचे विश्वस्त लीलाधर हेगडे यांनी विद्यार्थ्यांना खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले. खेळात सहभागी झाल्यास अतिरिक्त गुण मिळतात, हेही सांगितले. आता शाळेनेच सांगितल्यावर अश्विनची पावले मल्लखांबाकडे वळली. पाचवीत असताना त्याने, साटम सरांकडे ‘मल्लखांब’ शिकण्यासाठी प्रवेश घेतला. तिथूनच त्याचा सराव सुरू झाला. सरावाला सुरुवात करून सहा महिनेही पूर्ण झाले नव्हते, तोच शाळेत एक स्पर्धा झाली. नव्या मुलांसाठी ही स्पर्धा होती. त्यामुळे सहभागी होणारेही बरेच होते. अश्विननेही त्यात भाग घेतला. सहा महिन्यांच्या सरावावरच त्याने ‘कांस्यपदक’ मिळवले. मल्लखांबामधले हे त्याचे पहिले यश होते. एखादे छोटेसे यशच माणसाला पुढची वाट दाखवते. अश्विनच्या बाबतीतही तसेच झाले.
पदक मिळाल्यावर अश्विनने स्वतःच्या खेळात अजून काय सुधारता येईल, याकडे लक्ष दिले. सराव वाढला आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी त्याची निवड झाली. मात्र, राष्ट्रीयस्तरावर जाण्यासाठी अजून चार वर्षे वाट पाहावी लागली. चार वर्षे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तो खेळत राहिला. प्रत्येक स्पर्धा त्याच्यासाठी पुढच्या स्पर्धेची तयारी होती. निवड होत नाही म्हणून त्याने खेळ सोडला नाही. शेवटी चार वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ‘रौप्यपदक’ मिळवले. आजवर अश्विनने चार राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून, त्यात ‘रौप्यपदकां’ची कमाई केली आहे.
आयुष्याची वाट मात्र नेहमीच सरळ नसते. बारावीला असतानाच अश्विनच्या वडिलांचे निधन झाल्याने घराची जबाबदारी त्याच्यावरच आली. परिणामी, ‘मल्लखांब’ काहीसा मागे पडला. पण, शिक्षण त्याने सोडले नाही. सांताक्रूझच्याच रहेजा महाविद्यालयातून त्याने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. याच काळात दोन राष्ट्रीय महाविद्यालयीन स्पर्धांमध्येही तो खेळला. त्यापैकी एका स्पर्धेत वैयक्तिक ‘रौप्यपदक’ही मिळवले. आजवर अश्विनने २५हून अधिक पदके मिळवली आहेत.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ‘मल्लखांब’चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ते पाहून परदेशातील अनेकांनाही या खेळाची ओळख झाली. तिथूनच अश्विनकडे खेळाच्या प्रसारासाठी आमंत्रणे येऊ लागली. ज्या खेळाने आपल्याला इतके काही दिले, त्याच खेळासाठी आपणही काही करावे, असे त्याने ठरवले. येथूनच ‘मल्लखांब’च्या प्रसाराचा त्याचा प्रवास सुरू झाला. सहकार्यांच्या साथीने आजतागायत जगभरात त्याचे विविध कार्यक्रम झाले आहेत. जवळपास जगातील प्रत्येक देशात अश्विन आणि त्याच्या सहकार्यांनी एक हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत.
‘मल्लखांब’मधील साधारणतः दोन हातांनी केला जाणारा ‘दसरंक’ हा प्रकार अश्विनने एका हाताने केला. एका मिनिटात त्याने १३ ‘दसरंक’ केले. या कामगिरीची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’नेही घेतली. आज तो तरुणांना ‘मल्लखांब’ आणि ‘जिम्नॅस्टिक’चे प्रशिक्षण देतो. एवढे करूनही रात्री ९.३० ते १०.३० यावेळेत तो स्वतःचाही सराव करतो. यावरूनच त्याचे खेळावरचे प्रेम दिसते. खेळाचा प्रसार करण्याबरोबरच अधिकाधिक खेळाडू देशात तयार व्हावेत, त्यांनी नवे विक्रम प्रस्थापित करावेत, यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या अश्विन रावलला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर