अमेरिकेच्या दहशतवादावरील दुटप्पी धोरणावर उघडपणे बोट ठेवण्याइतका धीटपणा भारतात आला आहे, तो भारताने आपले अंगभूत सामर्थ्य ओळखल्यामुळेच! भारताला जितकी अमेरिकेची गरज आहे, तितकीच अमेरिकेलाही भारताची गरज आहेच. या वस्तुस्थितीचे भान अमेरिकेला आणून देण्याचे कार्य परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या भाषणातून केले. जागतिक राजकारणातील बहुध्रुवीय व्यवस्थेमुळे जगात अमेरिकेची एकाधिकारशाही लवकरच संपुष्टात येण्याचेच हे संकेत!
राजकारणात (आणि जागतिक राजकारणातही) कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्रदेश नसतो, कायम फक्त राष्ट्रीय हितसंबंधच असतात. हा नियम प्रत्येक देश पाळतो. प्रत्येक देश आपले राष्ट्रीय हितसंबंध कसोशीने जपत असतो. अमेरिकेसारखा देश तर आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांपुढे दुसर्या कोणत्याही देशांच्या हिताची पर्वा करीत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष बनल्यापासून त्यांनी अमेरिकेचे हितसंबंध जपण्याच्या नादात आपल्याच पारंपरिक मित्रराष्ट्रांना दुखावले. अगदी त्यांच्या राष्ट्रप्रमुखांचा अपमानही केला. पण, आपले राष्ट्रीय हितसंबंध जपण्याचा हक्क अमेरिकेइतकाच अन्य देशांनाही आहे, ही गोष्ट ट्रम्प विसरले असले; तरी त्यांना या वस्तुस्थितीचे भान आणून देण्याचे काम भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. न्यूयॉर्कमधील ‘एशिया सोसायटी’ या ‘थिंक टँक’च्या परिषदेत जयशंकर यांनी अमेरिकेला तिच्या दहशतवादावरील दुटप्पी भूमिकेवर काल चार खडे बोल सुनावले.
जगात दहशतवादाची भीषण झळ पोहोचलेले केवळ दोनच देश आहेत- पहिला इस्रायल आणि दुसरा भारत. इस्रायल त्याच्या देशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात मोगेपुढे पाहत नाही. ते करताना त्याने जागतिक दबावाची कधीच फिकीर केली नाही. भारतातील आजवरच्या काँग्रेस सरकारने मात्र आपल्या अंतर्गत राजकारणापायी भारताच्या राष्ट्रीय हितांना प्रसंगी तिलांजली दिली होती. म्हणूनच, भारतावर अधिकाधिक दहशतवादी हल्ले करण्याची पाकिस्तानची भीड चेपत गेली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र या भूमिकेत मूलभूत बदल झाला आणि भारताने आपल्यावर होणार्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.
इस्रायलप्रमाणेच भारताला त्याच्या शेजारी देशाकडून दहशतवादाचा उपद्रव होत असतो. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाची जननी आहे, ही गोष्ट अमेरिकेसह सर्व देशांना मान्य आहे. तरीही, अमेरिकेकडून वेळोवेळी पाकिस्तानच्या या दहशतवादी धोरणाकडे दुर्लक्ष केले जाते. पाकिस्तानने कारगिलमध्ये दु:साहस केल्यावरही भारताने नियंत्रण रेषा ओलांडू नये, यासाठी अमेरिकेने दबाव टाकला होता. पाकिस्तानने आपल्याच भूमीवर अनेक दहशतवादी संघटनांना आश्रय दिला असून, त्यांची दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे सुखेनैव चालू ठेवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर सर्व मदत करते.
हे सारे ठाऊक असूनही अमेरिका जागतिक पातळीवर नेहमी भारतापेक्षा पाकिस्तानला झुकते माप देते. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे, हे ठाऊक असूनही अमेरिकेकडून पाकिस्तानी लष्कराला भरघोस आर्थिक मदत आणि शस्त्रास्त्रे मिळत आहेत. पाकिस्तानवर भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले, तरी भारताविरोधात दहशतवादी हल्ले करण्याचे त्याने थांबविले नाही. गतवर्षी पहलगाम येथे झालेले हिंदू पर्यटकांचे हत्याकांड हा त्याचा ताजा पुरावा. तेव्हाही अमेरिकेने पाकिस्तानला कसलाच इशारा दिला नाही. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे या हल्ल्याला दणदणीत प्रत्युत्तर दिले. तरी आपल्याच सल्ल्यामुळे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबविल्याचा तद्दन खोटा दावा ट्रम्प यांनी आजवर अनेकदा केला आहे. अमेरिकेचा आपल्याला असा छुपा पाठिंबा कायम राहील, याची पाकिस्तानला खात्री असल्यामुळेच त्याचा दहशतवाद थांबलेला नाही. एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या या अलिप्त भूमिकेवर बोट ठेवताना सांगितले की, "दहशतवादाबाबत भारताची भूमिका अमेरिका समजून घेत नसल्याने या दोन देशांच्या राजनैतिक संबंधांवर त्याचा परिणाम होणे अटळ आहे.” अमेरिकेला, विशेषत: ट्रम्प यांना इतया स्पष्ट शब्दांत त्यांच्या दुटप्पी आणि तकलादू दहशतवादविरोधी भूमिकेबद्दल खडे बोल आजवर कोणी सुनावले नसतील.
दोन देशांमधील वादांवर चर्चेतून तोडगा काढला जावा, ही भारताची अढळ भूमिका राहिली आहे. अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशाच्या भारतविरोधी भूमिकेवर भारताने नेहमीच संयत प्रतिक्रिया नोंदविली आहे. पण, भारताचे हे नेमस्त धोरण म्हणजे, त्याचा कमकुवतपणा नाही, हे जयशंकर यांनी स्पष्ट केले. अमेरिका इस्लामी दहशतवादावर वरकरणी कठोर प्रतिक्रिया व्यक्त करीत असली, तरी अनेक कट्टरवादी इस्लामी राजवटींना ती गुप्तपणे मदत करीत असते. त्यात सीरिया, अफगाणिस्तान यांसारख्या देशांचा समावेश आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख ‘फेल्ड’मार्शल असीम मुनीर आणि नामधारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे ट्रम्प यांच्याशी निकटचे आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरोधात ट्रम्प कठोर भूमिका घेत नाहीत. उलट, भारतावर दबाव वाढविण्यासाठी त्यांचा वापर करून घेतात, हेही लपलेले नाहीच.
यापुढील काळात अमेरिकेची ही दादागिरी फारकाळ चालणार नाही, याचे जयशंकर यांनी त्यांच्या भूमीवरुन सूतोवाच केले. जग झपाट्याने बहुध्रुवीय सत्तेच्या दिशेने जात असून, जगात आता अमेरिकेची एकहाती हुकूमशाही फारकाळ चालणार नाही. चीन आणि भारतासह ‘ग्लोबल साऊथ’ यांचा नवा सत्तागट उदयाला येत आहे. त्यांच्याकडे अमेरिकेला आव्हान देण्याची शक्ती आहे. तसेच भारताचीही लष्करी ताकद वाढत चालली आहे. आपल्यावरील दहशतवादी आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतात आहे.
समस्येच्या गाभ्यालाच हात घालण्याच्या जयशंकर यांच्या कौशल्यामुळे त्यांचा स्पष्टवक्तेपणा फटकळ वाटतो. "युरोपचे प्रश्न हे जगाचे प्रश्न आहेत; पण जगाचे प्रश्न युरोपचे नाहीत, या त्यांच्या मानसिकतेतून त्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे,” असे सांगत यापूर्वी त्यांनी युरोपीय देशांसमोर त्यांच्या आत्मकेंद्री धोरणाचा आरसा धरला होता. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा रशियाकडून तेलखरेदी करण्याच्या भारताच्या भूमिकेवर अमेरिका व युरोपीय देश टीका करीत होते. तेव्हा भारतापेक्षा अधिक तेल आणि नैसर्गिक वायू हेच युरोपीय देश रशियाकडून खरेदी करतात, हेही जयशंकर यांनी दाखवून दिले होते. आता अमेरिकेचीही दहशतवादाबाबतची दुटप्पी आणि सोयीस्कर भूमिका जयशंकर यांनी जगापुढे मांडली आहे. भगवान शंकर हे संतप्त झाले, तर तांडवनृत्य करतात आणि त्यामुळे पृथ्वीवर प्रलय येतो, अशी धार्मिक समजूत. जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावलेले हे खडे बोल म्हणजे, या ‘शंकरा’चे ‘शाब्दिक तांडव’च आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबतील, यात शंका नाही!