महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक इतिहासात सहकाराचे स्थान मोठे आहे. राज्याला खर्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग वाढणे आवश्यक आहे. यामुळेच येत्या ऑक्टोबर महिन्यात ‘महाराष्ट्र महिला सहकारिता संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या स्वरुपाचा मागोवा घेणारा हा लेख...
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये, सहकार चळवळीचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. पिढ्यान्पिढ्या शेती, पाणलोट क्षेत्र, दुग्धव्यवसाय, पणन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम उभारी देण्याचे काम सहकाराने केले. मात्र, बदलत्या काळाबरोबरच, या चळवळीची परिभाषा आणि व्याप्तीही बदलली. आज या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासाला एका नव्या, आधुनिक आणि अधिक सर्वसमावेशक उंचीवर नेण्याचे महान कार्य आपल्या महाराष्ट्राची ‘नारीशक्ती’ करत आहे.
केवळ घरची चूल-मूल सांभाळण्यापुरतेच मर्यादित न राहता, थेट राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक गणितांमध्येही मोलाचा हातभार लावण्यापर्यंत महाराष्ट्रातील महिलांचा प्रवास थक्क करणारा आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुयात कार्यरत असणारे महिला बचत गट, गृहउद्योग, पापड-लोणचे उत्पादक गट, महिला सहकारी बँक, दुग्धव्यवसाय सोसायट्या आणि विविध महिला सहकारी संस्था या ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेचा कणा ठरत आहेत. जेव्हा एका महिलेच्या हातामध्ये आर्थिक प्रगतीची आणि स्वावलंबनाची सूत्रे येतात, तेव्हा केवळ ती महिलाच नव्हे; तर संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाज प्रगतिपथावर अग्रस्थानी जातो. हाच सहकार चळवळीचा मूळ आत्मा आहे.
जरी महाराष्ट्रातील महिलांनी सहकाराच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असले, तरी आजही अनेक ग्रामीण व निमशहरी भागांतील महिलांना त्यांच्या या कौशल्याला आणि उत्पादनांना योग्य व हक्काची बाजारपेठ मिळवणे, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये योग्य तो सहभाग मिळवण्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हीच मोठी पोकळी भरण्यासाठी आणि महिलांच्या उद्योगशीलतेला योग्य दिशा देण्यासाठी, येत्या ऑक्टोबर महिन्यात अत्यंत दिमाखात ‘महाराष्ट्र महिला सहकारिता संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाचे पूर्वनियोजन सध्या राज्यभरात अत्यंत वेगाने सुरू असून, याचदरम्यान महिलांच्या कलागुणांना आणि व्यावसायिक कौशल्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यावरही विशेष भर दिला जात आहे.
या संमेलनाचा मुख्य उद्देश केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे एवढाच नसून, त्यांना सहकार क्षेत्राच्या संचालक मंडळात, धोरणनिर्मितीत आणि उच्च निर्णयप्रक्रियेत, मुख्य प्रवाहात आणणे हा देखील आहे. आजच्या वेगाने बदलणार्या डिजिटलयुगात ‘ई-कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सचा वापर, समाजमाध्यम ब्रॅण्डिंग, पॅकेजिंगची आधुनिक तंत्रे, वित्तीय साक्षरता आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण महिलांपर्यंत पोहोचवणे, ही काळाची अत्यंत गरज आहे. हे संमेलन राज्यातील कानाकोपर्यातील महिला उद्योजिकांना एकाच मंचावर एकत्र आणून, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण घडवण्यासाठी एक सुवर्णसंधीच ठरणार आहे.
संमेलनात सहभागी महिलांना याचा नेमका लाभ काय?
व्यवसायाची वाढ आणि नेटवर्किंग : राज्यभरातील यशस्वी महिला उद्योजिका, बचत गटांच्या नेत्या आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट भेटून, अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची सुवर्णसंधी मिळेल.
शासकीय योजनांची माहिती : शासनाच्या महिला व सहकार क्षेत्रासाठी असलेल्या विविध अनुदान, कर्ज आणि आर्थिक योजनांची सविस्तर माहिती एकाच छताखाली मिळते.
आधुनिक प्रशिक्षण : व्यवसाय वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग, ‘पॅकेजिंग’, ‘ई-कॉमर्स’ आणि वित्तीय साक्षरतेचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.
हक्काची बाजारपेठ : महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवण्यासाठी आणि ब्रॅण्डिंग करण्यासाठी, नवे व्यासपीठही उपलब्ध होऊ शकते.
नेतृत्व संधी : केवळ व्यवसाय न करता, सहकार क्षेत्राच्या संचालक मंडळात आणि निर्णयप्रक्रियेत आपले नेतृत्व कसे सिद्ध करावे, याचीही दिशा मिळणार आहे.
केवळ चर्चाच नव्हे, तर यशस्वी महिलांच्या ‘यशोगाथा’!
या संमेलनाचे मोठे आकर्षण म्हणजे, राज्यातील तळागाळातून आपल्या कष्टाच्या जोरावर उद्योजकतेचा डोंगर सर करणार्या महिलांच्या ‘यशोगाथा’ येथे ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहेत. सामान्य बचत गटापासून ते मोठ्या सहकारी प्रकल्पांपर्यंतचा प्रवास कशाप्रकारे यशस्वी झाला, याची यशोगाथा त्या महिलाच मांडणार आहेत. इतरांच्या या प्रेरणादायी प्रवासातून आपल्यालाही आपल्या व्यवसायात किंवा उपक्रमात कोणकोणते नवे प्रयोग करता येऊ शकतात, याचे उत्तम मार्गदर्शन या सत्रांत मिळणार आहे. दुसर्यांच्या यशातून शिकून, स्वतःच्या प्रगतीचा नवा मार्ग शोधण्याची ही एक सुवर्णसंधीच असणार आहे.
विविध विषयांवर मार्गदर्शन करणारी विशेष
माहितीपर सत्रे : या संमेलनाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे, सहकार आणि महिला उद्योजकतेशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष माहितीपर सत्रे होणार आहेत. यामध्ये खालील विषयांचा समावेश असेल ः
वित्तीय साक्षरता : बँक खाती, सुलभ कर्जे, सरकारी अनुदान आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन.
कायदेशीर बाबी व नियम : सहकारी संस्थांची स्थापना, तिचे नियम, कायदेशीर कागदपत्रे आणि पारदर्शकता याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल मार्केटिंग : समाज माध्यमांचा वापर करून आपल्या उत्पादनांची विक्री कशी वाढवावी आणि ‘ब्रॅण्डिंग’ कसे करावे, याचे धडे.
‘पॅकेजिंग’ आणि गुणवत्ता नियंत्रण : उत्पादनाचा दर्जा कसा टिकवावा आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक ‘पॅकेजिंग’चे महत्त्व.
या पूर्वनियोजनाच्या टप्प्यापासूनच, आपण सर्वांनी यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. आपल्या भागातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, त्यांना सरकारच्या सहकार आणि उद्योगविषयक योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य ‘ब्रॅण्डिंग’ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हे आपले कर्तव्य आहे. जेव्हा राज्यातील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, तेव्हाच खर्या अर्थाने ‘समृद्ध महाराष्ट्राची’ संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. चला तर मग, या ऐतिहासिक आणि परिवर्तनवादी पर्वाचे साक्षीदार होऊया! सहकार चळवळीला अधिक बळकट करण्यासाठी आणि आपल्या भागातील प्रत्येक महिलेला ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी, या पूर्वनियोजनाच्या प्रवासात आपला खारीचा वाटा उचलूया! अधिक माहितीसाठी, पूर्वनियोजनाच्या सहभागासाठी आणि नोंदणीसाठी आजच वैशालीताई आवाडे, महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख मोबाईल क्रमांक- ९८२२२८८८०२ यांच्याशी संपर्क साधावा, ही विनंती.
महिलांच्या सक्षम सहभागाशिवाय ‘समृद्ध महाराष्ट्रा’ची स्वप्नपूर्ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही. यंदाच्या ऑटोबर महिन्यातील या महासंमेलनात, जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, आपल्या विचारांची शिदोरी वाटा आणि प्रगतीचा एक नवा इतिहास स्वतःच्या हाताने लिहा!
(लेखक सहकार भारतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटनप्रमुख पदावर कार्यरत आहेत.)
९४२२७६१६९९