शिक्षणातून समाजोन्नतीकडे... मूल्याधिष्ठित शिक्षणाची आदर्श यशोगाथा

    30-Sep-2026   
Chembur Education Society School Success Story
 
शाळेच्या नेतृत्वाद्वारे शाळांमध्ये पायाभूत साक्षरता, आनंददायी शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा साधला जातो, याचे थेट उदाहरण देशासमोर ठेवण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’अंतर्गत असलेल्या ‘नॅशनल सेंटर फॉर स्कूल लीडरशिप’द्वारे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील १०० शाळांची निवड करण्यात आली. त्या शाळांची यशोगाथा आणि त्यांच्या यशस्वितेचे दस्तऐवजीकरण नुकतेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन’च्या राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले. या १०० शाळांमध्ये मुंबईतील ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ची पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेचीही निवड झाली आहे. शाळा आणि शाळेचे नेतृत्व म्हणून मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे सर यांना मिळालेल्या या देदीप्यमान सन्मानाप्रीत्यर्थ शाळेच्या विविध आणि अमूल्य उपक्रमांचा मागोवा घेणारा हा लेख...
 
"आमची शाळा नेहमीच भारतीय संस्कृती आणि विचारधारेचे शैक्षणिक मूल्य जपत आली आहे. ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ची पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेची यशोगाथा ही केवळ आकडेवारी किंवा शैक्षणिक गुणवत्ता पूर्तता इतकीच मर्यादित नसून, ती पिढ्यान्पिढ्या घडवलेल्या आदर्श नागरिकांची आणि समाजाला दिलेल्या योगदानाचीसुद्धा आहे. इंग्रजी शाळांचे उपनगरात दिवसेंदिवस प्राबल्य वाढत असताना, महाराष्ट्रभर मातृभाषेतील शाळा फार वेगाने बंद होत असताना, माझी शाळा टिकवून ठेवण्यात यश आले, त्याचे श्रेय मराठी माध्यमाच्या शाळेत मिळणार्‍या संस्कार, जीवनमूल्ये यांवर विश्वास ठेवणार्‍या चेंबूरकर पालकांना, तसेच संस्थाचालक पदाधिकारी यांना जाते.” शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे सांगत होते. शाळेचा समावेश ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’अंतर्गत असलेल्या ‘नॅशनल सेंटर फॉर स्कूल लीडरशिप’च्या यशोगाथेमध्ये झाला, त्यासंदर्भात ते बोलत होते. शाळेला मिळालेल्या या सन्मानामुळे शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि अगदी विद्यार्थ्यांचे पालकही आनंदी झाले होते. पालक म्हणत होते की, "शाळेच्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांचीही सर्वच स्तरांवर प्रगती व्हावी, यासाठी मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांच्या दुरदृष्टीतून सातत्याने उपक्रम राबवले जातात.इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांच्या पालकांचे म्हणजे आमचेही प्रबोधन केले जाते.”
 
तर, ‘नॅशनल सेंटर फॉर स्कूल लीडरशिप’च्या अंतर्गत शाळेला सन्मान मिळाला. कारण, या यशोगाथेमध्ये स्थान मिळवण्यासाठी जे निकष होते, ते शाळेने पूर्ण केले होते. जसे१. शालेय नेतृत्वाची भूमिका : शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि प्राचार्यांच्या नावीन्यपूर्ण नेतृत्वामुळे शाळांचा कायापालट होणे २. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ३. आनंददायी आणि कृतीवर आधारित शिक्षण ४. कौशल्यांवर आधारित आणि व्यावसायिक शिक्षण (उदा. मंडाला आर्ट, ज्वेलरी मेकिंग इ.) ५. डिजिटल तंत्रज्ञान आणि विज्ञान (उदा. अचूक संगणक प्रयोगशाळा, रोबोटिक्स, अटल टिंकरिंग लॅब) ६. लोकसहभाग : पालकांचा आणि गावकर्‍यांचा शाळेच्या विकासातील सहभाग ७. सर्वोत्तम पद्धती शोधणे : ग्रामीण, शहरी आणि दुर्गम आदिवासी भागातील शाळांनी अत्यंत कमी संसाधनांमध्ये जे नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत, ते शोधून काढणे वगैरे वगैरे. या सगळ्या निकषांमध्ये ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा यशस्वी झाली. गेली दहा वर्षे विठ्ठल कांबळे सर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काय अडचणी येऊ शकतात किंवा त्यांच्या पालकांना काय प्रश्न पडत असतील, याची जाण सरांना आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणाने शाळाबाह्य होऊ नये, यासाठी ते युद्धपातळीवर प्रयत्न करतात. सात दशकांपासून शाळा विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक असलेले संस्कार, जीवनमूल्ये आणि कौशल्ये देत आहे. त्याचबरोबर मराठी शाळा बंद का पडतात; आर्थिक तंगी असतानाही पालकांना त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी आणि महागड्या शाळेत शिकावे असे का वाटते; याचा सर्वांगीण अभ्यास विठ्ठल सरांनी केला. त्यातूनच गेल्या दहा वर्षांत ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ची ही मराठी माध्यमाची शाळा तगली; नव्हे, नुसतीच तगली नाही, तर तिने यशस्वी घोडदौड केली. तसेही मुंबईसारख्या शहरात मराठी माध्यमाची शाळा टिकवून ठेवणे, हे खूप मोठे आव्हान आहे. मात्र ‘१९५४ साली अस्तित्वात आलेली मराठी माध्यमाची शाळा’ अशी महाराष्ट्रभर ओळख असलेली ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ची पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आजही तितयाच ताकदीने उभी आहे.
 
तर, ‘चेंबूर एज्युकेशन’ पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेचे नाव उच्चारताच, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बाबतींत शाळेची एक उत्तम प्रतिमा उभी राहते. चेंबूरमधील प्रत्येक मुलाला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या दूरदृष्टीने ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ संस्था सदैव कार्यरत आहे. ‘उद्धरेदात्मनात्मानम्|’ हे संस्थेचे ब्रीदवाय आहे. स्वतःचा उद्धार स्वतः करण्यास समर्थ होणे, असा त्याचा अर्थ आहे. शब्दशः शाळेतला प्रत्येक घटक स्वतःच आत्मनिर्भर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतो. त्यामुळेच की काय, शाळेतील विद्यार्थी, शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात अगदी कुटुंबासारखे नाते तयार झाले आहे. या कुटुंबाचा प्रमुख म्हणून विठ्ठल कांबळे सरांनी सगळ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या प्रवाहात आणण्याचा जणू विडाच उचलला आहे! त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. जसे,
 
वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशोत्सव
प्रत्येक वर्षी नवीन प्रवेशित होणार्‍या विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण पद्धतीने स्वागत केले जाते. त्यांचा शाळेचा पहिला दिवस सदैव अविस्मरणीय ठरावा, यासाठी शिक्षकांना शाळा अधिकृत सुरू होण्याआधी शाळेत बोलावून सहविचार सभा घेऊन शाळा प्रवेशोत्सव आगळावेगळा कसा घेता येईल, याबाबत निर्णय करण्यात येतो. नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करण्यात येते. संपूर्ण शाळा सजवली जाते. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ‘सेल्फी पॉईंट’ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आकर्षित, पर्यावरणपूरक ‘सेल्फी पॉईंट’ शिक्षक स्वनिर्मित असतो.
 
विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न
 
विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि पायाभूत संख्याज्ञान वाढविण्यासाठी अथक प्रयत्न केले जातात. पूर्व प्राथमिक वर्ग असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. खेळातून शिकण्यावर भर दिल्याने अक्षरांची ओळख, शब्दांचे ज्ञान आणि संख्यांची मूलभूत समज विकसित होते. शिक्षकांना पायाभूत साक्षरता आणि पायभूत संख्याज्ञान शिकवण्यासाठी आधुनिक आणि प्रभावी पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते.
 
आधुनिक प्रशिक्षण
 
विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासही इतरही कौशल्ये आत्मसात करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
कौशल्याधारित आणि व्यावसायिक शिक्षण
 
‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ कौशल्याधारित आणि व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सांगितले आहे. शाळा स्थापना झाल्यापासून या महत्त्वाच्या विषयावर शाळेने लक्ष दिले होते.
 
इंग्रजी भाषा कक्ष
 
मराठी माध्यमाची शाळा असल्याने मातृभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न असतातच. त्यासोबत इंग्रजी संवाद आणि लेखनकौशल्ये प्राप्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना स्वतंत्र इंग्रजी श्रवण कक्ष तयार केला आहे. कोणतीही भाषा नव्याने शिकत असताना श्रवण होणे फार महत्त्वाचे असते. प्रत्येक शब्द उच्चारण नेमके कसे होते, हे या कक्षात प्रत्यक्ष अनुभवांतून शिकवले जाते. प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी अस्खलित बोलू शकेल, उत्तम संवाद साधू शकेल, अशी संधी इथे विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील कौशल्ये प्राप्त होण्यास या कक्षाची मदत होत आहे.
 
खेळ आणि कृती आधारित शिक्षण
 
व्यावहारिक कामांची ओळख व्हावी, म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार झाडे लावणे, बागकाम करणे, परसबाग करणे, शैक्षणिक साहित्य शिक्षक, पालक यांच्या मदतीने तयार करणे, स्वच्छता राखणे, स्वतः हाताळलेले साधने, खेळणी पुन्हा जागेवर ठेवणे इत्यादी गोष्टीमुळे त्यांची निरीक्षण शक्ती, हाताळणी कौशल्यवाढीसाठी प्रयत्न केले. चित्रकला, चिकणमाती काम, कागदकाम, हस्तकला, पतंग तयार करणे, त्याची कणी बांधणे, भेळ तयार करणे, कोशिंबिरी तयार करणे, आठवडा बाजार भरवणे, विविध क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांकडून गुढी तयार करणे, कागदी हार-गजरे तयार करणे, भेटकार्ड तयार करणे, राखी तयार करणे, कागदी पिचकारी तयार करणे, लिफाफा तयार करणे, फोटो फ्रेम तयार करणे, गणपती मूर्ती तयार करणे असे अनेक उपक्रम वर्गात तयार करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सहकार्य वृत्ती, नीटनेटकेपणा, टापटीपपणा विकसित होण्यात खूपच मदत होत आहे. कलेचे विषय केवळ स्वतंत्र म्हणून न ठेवता, ते इतर विषयांशी शिक्षक समन्वय साधू शकतील, असे सातत्याने माझे मार्गदर्शन सुरू असे. या आणि अशा अनेक उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
 
सन २०२४-२५ (२१२ विद्यार्थी) आणि २०२५-२६ (२३५ विद्यार्थी) ‘भारत सर्च टॅलेंट परीक्षा’ नवीन शिक्षण शैक्षणिक धोरणावर आधारित असलेल्या स्पर्धात्मक परीक्षेला विद्याथ्यांना पालकांच्या मागणीमुळे बसवण्यात आले. शिक्षक जादा तास घेऊन या विषयाची तयारी करत आहेत. यामुळे स्पर्धात्मक परीक्षा कशी असते, याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहे. सन २०२४-२५ या वर्षीच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी, म्हणजेच १०० टक्के उत्तीर्ण झाले. लाभ पाटील, श्रेया सोनावले, मंथन पुजारी, कार्तिक पवार, सुयश झोरे केंद्रात, जिल्ह्यात गुणवत्ता यादीत आले. २०१८ ते आजपर्यंत दरवर्षी विद्यार्थी ‘चिन्मय मिशन’च्या माध्यमातून मिलिंद खोलकुटे शाळेत येऊन दर बुधवारी निशुल्क गीता अध्याय पठन करून घेतात. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थी आंतरशालेय स्पर्धेत सहभागी होतात. ‘कोरोना’ कालावधीत ऑनलाईन पद्धतीने हे तास घेतले गेले. प्रत्येक वर्षी विद्यार्थी स्पृहणीय यश मिळवत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त होते, कारण त्यांचे शिक्षकही तसेच प्रशिक्षित आहेत. शाळेतर्फे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन’ येथे सर्व शिक्षकांना प्रशिक्षण संस्थेने उपलब्ध केले होते. २०२० या वर्षीपासून राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावर विशेष कामगिरी करणार्‍या शिक्षकांना दि. २६ जानेवारी रोजी सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ संस्था प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करते. त्यामुळे शिक्षकांचे मनोबल उंचावते. वर्षभर काम करण्यासाठी प्रेरणा व ऊर्जा मिळते. या सर्व प्रशिक्षित शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम विकास होणारच. त्यामुळे आज शाळेतील माजी विद्यार्थी पोलीस दल, सैनिक दल, सायबर सुरक्षा, डॉटर, इंजिनिअर, शासकीय सेवेत उत्तम सेवा देत आहेत. हे विद्यार्थी एकत्र येऊन शाळेला भरीव आर्थिक साहाय्य करत आहेत. हेसुद्धा शाळेचे यशच आहे. शालेय पुस्तकांच्या बाहेरचे मोठे विश्व आहे आणि शाळेचे विद्यार्थी त्या जगाचा एक भाग आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी या विश्वात कुठेही मागे राहू नये, म्हणून सदैव दक्ष असणारी ही शाळा. या परिक्षेपात शिक्षण हे शिकण्यासोबतच जगण्याचा विषय आहे आणि त्यातून स्वतःची समाजाची आणि देशाची प्रगती करायची आहे, हे सूत्र विद्यार्थ्यांमध्ये रूजवणारी ही शाळा आणि शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी आदर्श आहेत.
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर