'बाप्पा सहित्य प्रसाद'

    30-Sep-2026
 
 Bappa Sahitya Prasad 2026
 
"ताई, यावर्षी ‘बाप्पा साहित्य प्रसादा’त काय काय द्यायचे,” हा प्रश्न गणपतीच्या दिवसांत मला अनेकदा विचारला जातो. खरं तर, हा केवळ साहित्य देण्याचा प्रश्न नाही; बाप्पाच्या उत्सवातून एखाद्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लावण्याची इच्छा त्यामागे असते. एका पेन्सिलीच्या बॉक्सपासून ते शाळेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या मोठ्या संचापर्यंत अनेक हात या उपक्रमाशी जोडले जातात आणि मग बाप्पाला अर्पण केलेला हा ‘प्रसाद’ गणेशोत्सवानंतर वाडा, विक्रमगड परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या हातात पोहोचतो.
 
ताई, यावर्षी बाप्पा साहित्य प्रसादात काय काय असणार आहे? वाड्यातील मुलांना कशाची गरज आहे? आपण हे देऊया का?”
गणपती आले की असे फोन मला येऊ लागतात. सहभागी होऊ इच्छिणार्‍या मंडळींना शाळांना आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती दिली जाते आणि मग सुरू होतो ‘बाप्पा साहित्य प्रसाद’चा प्रवास! ‘लेट्स इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’तर्फे २०१९ पासून हा उपक्रम राबवला जात आहे. सुरुवातीला चार-पाच गणपती या उपक्रमात सहभागी झाले होते; आज ही संख्या जवळपास ३० पर्यंत पोहोचली आहे.
 
यावर्षी आमचे परिचित पंडोलस्कर सरांचा फोन आला. "माझ्या सासरच्या गणपतीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्हाला या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
सरंबळकर परिवाराने केवळ साहित्य गोळा केले नाही, तर शैक्षणिक साहित्याचाच वापर करून बाप्पाची सजावटही केली. या उपक्रमाशी जोडल्याचा त्यांचा अनुभव त्यांनीच शब्दांतून मांडला,"सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव असल्याने अविस्मरणीय असे काहीतरी करायचे, असे ठरलेच होते. पण काय आणि कसे करायचे, हे ठरत नव्हते. ‘लेट्स इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’च्या सहकार्याने आम्हाला सामाजिक भान जपत, हा उत्सव साजरा करण्याची संकल्पना साकार करता आली. वंचित आणि गरजू मुलांच्या प्रगतीसाठी आपला खारीचा वाटा उचलता आला.
 
या ‘साहित्य प्रसाद’ उपक्रमाला दर्शनासाठी घरी आलेल्या किंवा येऊ न शकलेल्या अनेकांनी आपल्या इच्छेप्रमाणे काही ना काही मदत केली. म्हणजे त्यात अगदी एका पेन्सिलीच्या बॉक्सच्या छोट्या मदतीचाही समावेश आहे. एकाने आपले बालपण आठवत लाकडी पट्टी आणली. कारण या पट्टीचा मार खाऊनच आपण घडलो, ही त्यांची समजूत! मदत ही छोटी किंवा मोठी असे नसते. ती करावीशी वाटणे, हेच सामाजिक जाणिवेचे खरे द्योतक आहे.” तर सरंबळकर परिवारातील सदस्य आता केवळ मदत करून थांबणार नाहीत; दि. ३ ऑक्टोबरला प्रत्यक्ष साहित्यवाटपासाठी ते आमच्यासोबत वाड्यालाही येणार आहेत.
 
असाच एक अनुभव अदिती तळपदे यांनीही सांगितला आहे,"गेल्या चार वर्षांपासून ‘लेट्स इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’च्या ‘बाप्पा साहित्य प्रसाद’ या उपक्रमाशी जोडले जाण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप आनंददायी आणि समाधान देणारा आहे. बाप्पा घरी आले की प्रसाद म्हणून वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली व इतर शैक्षणिक साहित्य अर्पण करून, उत्सवानंतर हेच साहित्य पालघर जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील मुलांपर्यंत पोहोचवले जाते. या उपक्रमाची सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे, तो अनेकांना एक विचार देतो, आपणही या सेवेत कसे सहभागी होऊ शकतो! कुणी आवर्जून साहित्य घेऊन येते, कुणी आपल्या परीने योगदान देते, तर कुणी हा विचार पुढे पोहोचवते. अशा छोट्या छोट्या सहभागातून माणसे जोडली जातात आणि त्याचे रूपांतर एका सुंदर, अर्थपूर्ण कार्यात होते. आणि जेव्हा हे साहित्य मुलांच्या हातात पोहोचते, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान पाहताना मनापासून वाटते, बाप्पाचा आशीर्वाद खरोखरच योग्य ठिकाणी पोहोचला आहे.
 
गणपती बाप्पा ही विद्येची देवता. मग विद्येच्या देवतेला असा प्रसाद अर्पण करून तो पुढे त्या सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत आशीर्वाद म्हणून पोहोचणे, यासारख्या सुंदर सेवा उपक्रमाचा भाग होणे, ही खूप सुखावह गोष्ट आहे. म्हणूनच ‘बाप्पा साहित्य प्रसाद’ हा माझ्यासाठी केवळ एक उपक्रम नाही; माणसांना जोडणारी, शिक्षणाला प्रोत्साहन देणारी आणि मनाला समाधान देणारी एक सुंदर सेवा आहे. या सेवेत माझाही एक छोटासा खारीचा वाटा आहे, याचे समाधान खूप मोठे आहे. या सुंदर अनुभवाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल पूर्णिमा नार्वेकर आणि ‘लेट्स इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’चे मनापासून आभार.”
 
हे असे अनुभव आम्हाला हे कार्य करण्यासाठी खूप मोठे बळ देतात. ज्यांच्या घरी बाप्पा येतात, त्यांनी आपल्या परीने या सेवेत सहभागी व्हावे. कारण बाप्पाच्या चरणी शालेय साहित्याच्या रूपातून अर्पण केलेला हा छोटासा प्रसाद एखाद्या मुलाच्या शिक्षणाच्या प्रवासात मोठा आशीर्वाद ठरू शकतो. असे अनेक अनुभव आणि असंख्य छोट्या-छोट्या मदतीचे हात या उपक्रमाला गेली आठ वर्षे बळ देत आहेत. त्यामुळेच दरवर्षी ‘बाप्पा साहित्य प्रसाद’मध्ये सहभागी होणार्‍यांची संख्या वाढत आहे. पण बाप्पाच्या विसर्जनानंतर या उपक्रमाचे खरे मोठे काम सुरू होते.
 
दहिसर, बोरिवली, मालाड, दादर, चर्नी रोड, चर्चगेट, विरार अशा मुंबईतील विविध ठिकाणांहून आलेला ‘साहित्य प्रसाद’ एका ठिकाणी जमा करायचा. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार साहित्याचे खोके तयार करून ते व्यवस्थित बंद करायचे. या सगळ्या कामासाठी आता आमची टीम सज्ज झाली आहे.
 
दि. ३ ऑक्टोबरला वाडा आणि विक्रमगडमधील जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना या ‘बाप्पा साहित्य प्रसादा’चे वाटप करण्यात येणार आहे. याच काळात आमचा ‘श्री बा मेथड’ हा शिक्षकांसाठीचा उपक्रमही सुरू आहे. दि. २ ऑक्टोबरला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शाळेतील मुलांसोबत निरीक्षण कार्यशाळाही होणार आहे. या कार्यशाळांसाठी चित्रकला साहित्याची गरज आहे. मुलांसाठी पौष्टिक खाऊ आणि स्वच्छतेचे साहित्यही यावेळी देण्यात येणार आहे.
 
हा प्रसाद मुलांच्या हातात पोहोचतो आणि त्यांच्या चेहर्‍यावर उमटणारा आनंद पाहायला मिळतो, तो क्षण शब्दांत सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा असतो. म्हणूनच, यंदा आमच्यासोबत शाळांना भेट देण्यासाठी अनेक नवीन मंडळीही येत आहेत. आमचे हितचिंतक आमच्या सोबत उभे आहेत, म्हणूनच एवढ्या शाळांपर्यंत पोहोचणे आम्हाला शय होत आहे. ‘साहित्य प्रसाद’ हे या कामाचे केवळ एक निमित्त आहे. या माध्यमातून मुलांना शाळेची आणि अभ्यासाची गोडी लागावी, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात थोडी मदत व्हावी, हाच आमचा मुख्य ध्यास आहे. हा ध्यासच आम्हाला नवनवीन कल्पना सुचवतो, त्या प्रत्यक्षात आणण्याचे बळ देतो आणि मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने काम करत राहण्याची प्रेरणा देतो. ‘लेट्स इमॅजिन टुगेदर’ म्हणजेच ‘चला, एकत्र कल्पना करूया.’
 
या गणेशोत्सवात शालेय साहित्याच्या रूपात बाप्पाला अर्पण केलेला एक छोटासा प्रसाद एखाद्या मुलाच्या हातात जाऊ शकतो. त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात तो प्रसाद मोठा आधार ठरू शकतो. चला, आपणही आपल्या परीने या ‘बाप्पा साहित्य प्रसाद’मध्ये सहभागी होऊया!
 
पूर्णिमा नार्वेकर
९८२०००३८३४
 




संबंधित मजकूर