पुणे (Vidyanand Bapat attack) : गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करत भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात अज्ञात व्यक्तीकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधत असताना बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला. पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत त्यांनी गणेशोत्सवात डीजे नको, अशी भूमिका मांडली होती. याच भूमिकेवरून माध्यमांशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु आहे. गुरुवारी टिळक रोडवरील कशाळे चौकात याच विषयावर विद्यानंद बापट माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी तरुणाला रोखले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली.
काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये 'पुण्यात गणेशोत्सव कसा असावा?' याविषयी पुणेकरांचे मत जाणून घेण्यात आले. या बैठकीदरम्यान विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात डीजे नको, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवर गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर उपस्थित सुरक्षारक्षकांनी बापट यांना सुरक्षित बाहेर काढले होते. तेव्हापासून विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काही धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज आहेत. (Vidyanand Bapat attack)
सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला
एक वेडा अचानक आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो हे पाहून आणि माझ्या आजूबाजूला पोलीस नव्हते, हे पाहून त्याने हल्ला केला. त्याला फक्त चीप पब्लिसिटी पाहिजे होती; सवंग प्रसिद्धीसाठी. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. झोंबीसोबत युक्तिवाद होतो का उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला. - विद्यानंद बापट (Vidyanand Bapat attack)
विद्यानंद बापट नास्तिक असून त्याची भूमिका गणेशोत्सव विरोधी आहे. अशा नास्तिकाने गणेशोत्सवाबद्दल बोललेच नाही पाहिजे. तो चुकीचे बोलतो, टीका करतो; हे चालणार नाही. पुणे शहरात फक्त गणेशोत्सवाबद्दलच मुद्दे आहेत का? जो गणेशोत्सवाच्या विरोधात बोलणार त्याच्या कानशीलात लगावणारच. तो मानसिक रोगी आहे, अशा लोकांना डोक्यावर घ्यायची गरज नाही. - मारहाण करणाऱ्या व्यक्तीची भूमिका (Vidyanand Bapat attack)