
मुंबई - (Satish Pulekar )'द्विधा' या वडील आणि मुलीच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारा हृदयस्पर्शी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सतीश पुळेकर आणि मानसी कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असून पुळेकर वेगळ्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहेत. याच निमित्ताने सतीश पुळेकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी विविध विषयांवर गप्पा रंगल्या. यावेळी बोलताना आपल्याला कोणी कधी कुठल्या पुरस्कार सोहळ्याला बोलवत नसल्याची खंत व्यक्त केली.
सतीश पुळेकर म्हणाले , माझी बायको श्रद्धाने खूप सहन केलं. आमच्या लग्नाला 52व वर्ष चालू आहे. मला या क्षेत्रात स्थिर होण्यासाठी तिने खूप तपश्चर्या केली होती. मला या क्षेत्रात स्थिर होण्यासाठी तिने मला मुभा दिली, स्वतः नोकरी करत माझ्या संघर्षाच्या काळात माझी ढाल बनून उभी राहिली. आई-वडील, काका- काकी, मोठा भाऊ -बहीण हे सगळे होतेच पण नंतरची ही 52 वर्ष ज्या पद्धतीने तिने माझं फ्रस्ट्रेशन, माझं डिप्रेशन, माझे होणारे अपमान, मला हाकलून देणं, माझ्याकडन स्क्रिप्ट काढून घेणं अशा असंख्य प्रसंगी ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. नंतर ज्या पिढीला मी तयार केलं त्यांनीही विचारलं नाही तेव्हा तिने दिलेली साथ शब्दात व्यक्त होणार नाही. ति नेहमी म्हणते तू उत्तम कलाकार आहेस, यश तुझ्यामागे येणारच. तेव्हा मला जाणवायचं मी काही टाकाऊ अभिनेता नाही, माझ्यात पण काहीतरी खास आहे. ती दूरचित्रवाणीवर कुठला पुरस्कार सोहळा चालू असताना मला नेहमी विचारते तू का नाही जात ? यावर मी नेहमी म्हणतो मला कोणी बोलवतच नाही तर मी जाऊ? मला कधीच कुठल्या पुरस्कार सोहळयाला कोणी बोलवत नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. (Satish Pulekar )