भारत दिसू नये म्हणून...

    03-Sep-2026
Pakistan SCO summit photo
 
आंतरराष्ट्रीय राजकारणात छायाचित्रे अधिक बोलकी ठरतात. पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या ‘बिश्केक एससीओ शिखर परिषदे’च्या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि अन्य नेत्यांना वगळून, शाहबाज शरीफ यांना मध्यभागी दाखवण्याचा प्रयत्न केला. यावर टीका झाल्यावर मूळ छायाचित्रही प्रसिद्ध केले. त्यामुळे हा प्रकार एक विनोदी प्रयोगच ठरला. असे असले, तरी त्यामागची मानसिकता मात्र अधिक गंभीर आहे. पाकिस्तान भारताला कायमच बरोबरीच्या चौकटीत पाहतो. भारत मात्र त्या चौकटीच्या पलीकडे केव्हाच निघून गेला आहे.
 
भारत-पाकिस्तान संबंधांचा इतिहास पाहिल्यास, या बदलाचे महत्त्व लक्षात येते. १९९०च्या दशकात दक्षिण आशियाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ या द्वंद्वाभोवती मांडले जाई. प्रत्येक प्रश्नात, दोन्ही देश एकाच तराजूत मोजले जात. आज ती स्थिती नाही. भारताचा राजकीय आणि आर्थिक विस्तार दक्षिण आशियाच्या पलीकडे झाला आहे. हिंद-प्रशांतापासून मध्य आशियापर्यंत, रशियापासून आखाती देशांपर्यंत आणि अमेरिकेपासून इराणपर्यंत भारताचे हितसंबंध आहेत. त्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्थान, पाकिस्तानबरोबरच्या संबंधांनी निश्चित होत नाही. शांघाय सहकार्य संघटना याचे उत्तम उदाहरण. तिचे वैशिष्ट्य असे की, ती कोणत्याही एका शक्तीची संघटना नाही. चीन आणि रशिया तिला पाश्चिमात्य प्रभावावरचे उत्तर मानतात; पण त्याच संघटनेत भारत-चीन सीमाप्रश्न आणि भारत-पाकिस्तान संघर्षही आहेत. त्यामुळे ‘एससीओ’ ही परस्परविरोधी हितसंबंधांना व्यासपीठ देणारीही रचना ठरते.
 
याच रचनेत चीन भारताचा सामरिक प्रतिस्पर्धी आहे; तरीही शी जिनपिंग भारताशी संवाद ठेवतात. रशिया भारताचा जुना संरक्षण आणि ऊर्जा भागीदार आहे; पण युक्रेनच्या युद्धाबाबत भारताने रशियाला शांततेचा आग्रह केलाच. इराणशी भारताचे संबंध ऊर्जा आणि मध्य आशियाशी संपर्काच्या दृष्टीने महत्त्वाचेच. बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पेझेश्कियन यांच्याशीही स्वतंत्र चर्चा झाली. म्हणजे, भारताचे परराष्ट्र धोरण मित्र कोण आणि शत्रू कोण, या जुन्या वर्गीकरणावर चालत नसून, हितसंबंधांच्या आधारावर चालते. हीच भारताची सामरिक स्वायत्तता. हे संबंध विरोधाभासी नाहीत, बहुध्रुवीय जगात जास्तीत जास्त पर्याय खुले ठेवण्याचे ते धोरण आहे.
 
हीच पाकिस्तानची अडचण आहे. चीन हा पाकिस्तानचा अत्यंत महत्त्वाचा सामरिक आधार असून, रशियाशीही संबंध वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तान अलीकडे करत आहे. परंतु, भारताप्रमाणेच विविध शक्तींमध्ये संतुलन निर्माण करण्याऐवजी, पाकिस्तानची राजनैतिक गणिते दीर्घकाळ बाह्य आधाराभोवतीच फिरत राहिली. त्यामुळेच भारताचे वाढते वजन, पाकिस्तानच्या प्रादेशिक प्रतिमेला धक्का असल्याचे पाकिस्तान मानतो. शरीफ यांना छायाचित्रात मध्यभागी आणण्याचा प्रयत्न, हा कदाचित त्याच हरवत चाललेल्या प्रतिमेची भरपाई करण्याचा क्षणिक प्रयत्न असावा. या पार्श्वभूमीवर आणखी एक बाब महत्त्वाची. ‘एससीओ’ची पुढील शिखर परिषद पाकिस्तानमध्ये होणार आहे. यजमानपदामुळे पाकिस्तानची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा होईल. परंतु, चर्चा आणि प्रभाव या दोन भिन्न गोष्टी. परिषद कुठे होते, यापेक्षा त्या परिषदेत कोणत्या देशाशिवाय समीकरण अपूर्ण राहते, हे अधिक महत्त्वाचे. बिश्केकमध्ये मोदींनी दहशतवादाविरुद्ध स्पष्ट भूमिका मांडली. त्याच वेळी मोदी-पुतीन-शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक संवादानेही दाखवून दिले की, भारताला वगळून आज जगाचा विचार होऊ शकत नाही.
 
त्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध आता केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान या चौकटीत पाहण्याची गरज नाही. भारताच्या दृष्टीने पाकिस्तान हा अनेक प्रश्नांपैकी एक आहे; पाकिस्तानच्या दृष्टीने मात्र भारत अजूनही परराष्ट्रनीतीच्या केंद्रस्थानी आहे. म्हणूनच, पाकिस्तानने छायाचित्र कापले, ही घटना पाकिस्तानच्याच मानसिकतेचा अभ्यास करण्याचा विषय ठरतेे. एखाद्या राष्ट्राची खरी उंची दुसर्‍याला किती लहान दाखवता यात नसते. ती स्वतःचे हित साधताना किती मोठ्या शक्तींशी समान पातळीवर बोलता येते, किती परस्परविरोधी संबंध एकाच वेळी सांभाळता येतात आणि संकटाच्या वेळी किती पर्याय खुले ठेवता येतात, यात असते. भारताने ती उंची गाठली आहे.
 
- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर