कृष्णमय झाले चित्त, कर्म झाले भगवंत

    03-Sep-2026
 
Lord Krishna Life Lessons
 
कृष्ण म्हटला की, मनात एखादी प्रतिमा उमटते. तिच्याभोवती अनेक अर्थांचे तरंगही उठतात. तो एकाच चौकटीत सामावणारा नाही. त्याच्याकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी, म्हणून प्रत्येकाला दिसणारा कृष्णही वेगळाच. कुणाला त्यात माधुर्य दिसते, कुणाला गूढता; कुणाला प्रेमाचा स्पर्श जाणवतो, तर कुणाला प्रखर बुद्धी. हजारो वर्षे उलटली, साम्राज्ये आली-गेली, समाज बदलला, माणसाच्या प्रश्नांचे स्वरूप बदलले; पण कृष्णाला जाणून घेणे आजही सुरुच आहे. सध्याच्या पिढीसमोरील अडचणींवरील कृष्णसंदेशाचा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आढावा घेणारा हा लेख...
 
श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण दहीहंडीच्या रूपाने साजरी करतो. कृष्ण हा विष्णूचा अवतार म्हणून आपल्यासाठी उपास्यच आहे. परंतु श्रीकृष्णाकडे आजच्या तरुण पिढीने ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून बघणेही अधिक आवश्यक झाले आहे. आजच्या तरुण पिढीकडे मागच्या कोणत्याही पिढीपेक्षा अधिक सुविधा आहेत. हातात तंत्रज्ञान आहे, माहितीचे जग खुले आहे, करिअरच्या असंख्य वाटा आहेत. पण त्याचबरोबर स्पर्धा, अपेक्षा, तुलना, अपयशाची भीती आणि एकाकीपणाचा दबावही आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत, नोकरी मिळाली नाही, व्यवसायात अपयश आले, प्रेमभंग झाला किंवा आपल्या मनासारखे काही घडले नाही की, आयुष्य संपल्यासारखे वाटू लागते. अशा पिढीने श्रीकृष्णाची केवळ पूजा करण्याऐवजी, त्याचे जीवन समजून घेतल्यास प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करावा, याचा वस्तूपाठच मिळेल.
 
श्रीकृष्णाच्या जीवनाची सुरुवात कारागृहात झाली. जन्माच्या क्षणापासूनच मृत्यू त्याची वाट पाहात होता. मामा कंस त्याला मारण्यासाठी टपलेला होता, तर जन्मदात्या आई-वडिलांपासूनच त्याला दूर व्हावे लागले. रात्रीच्या अंधारात, मुसळधार पावसात वसुदेवाने त्याला यमुना ओलांडून गोकुळात नेले. पुढे पूतना आली, शकटासुर आला, तृणावर्त आला, कालियाचा प्रसंग आला. बालपण म्हणजे सुरक्षितता, लाड आणि निखळ आनंद अशी आपली रम्य कल्पना असते. कृष्णाच्या बालपणात मात्र संकटामागून संकटे येत गेली. तरीही आपल्याला रडणारा, निराश झालेला कृष्ण कधीही दिसत नाही. आपल्याला दिसतो, तो बासरी वाजवणारा, मित्रांसोबत खेळणारा, लोणी चोरणारा आणि संकट आले की त्यावर मात करणारा कृष्ण. संकट नसणे म्हणजेच आनंद नव्हे; संकटाच्या मध्यभागीही आनंद शोधता येणे, म्हणजेच कृष्णत्व!
 
कृष्णाच्या बाललीलांमधील आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे, त्याचा मित्रपरिवार. तो गोपाळांमध्ये मिसळतो, जंगलात गुरे चारायला जातो, मित्रांसोबत खेळतो, प्रत्येकाच्या शिदोरीतील पदार्थ एकत्र करून गोपाळकाला करतो आणि सर्वांसोबत खातो. आजच्या व्यवस्थापनशास्त्रात ज्याला ’टीम बाँडिंग’ म्हणतात, त्याचे किती सुंदर प्रतीकच या गोपाळकाल्यात दडलेले आहे!
 
गोवर्धन पर्वताच्या प्रसंगाकडेही याच नजरेने पाहता येते. परंपरेनुसार कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलून गोकुळाचे रक्षण केले. पण त्या चित्रांमध्ये एक सुंदर तपशील असतो, कृष्ण पर्वत उचलतो आणि भोवतीचे गोपाळही आपल्या काठ्या पर्वताला लावून उभे राहतात. कृष्णाला त्यांच्या काठ्यांची आवश्यकता होती का? देवत्वाच्या दृष्टीने अर्थातच नाही. पण, नेतृत्वाच्या दृष्टीने त्या काठ्यांचा अर्थ फार मोठा आहे. खरा नेता ‘सगळे मीच केले’ असे सांगत नाही; तो विजयामध्ये आपल्या संघातील प्रत्येकाला सहभागी करून घेतो. सामान्य गोपाळाच्या मनातही गोवर्धन उचलताना ‘माझी काठी लागली होती’ हा आत्मविश्वास निर्माण करणे, हेच खरे नेतृत्वाचे काम आहे.
 
कृष्ण गोपाळांचा नेता होता; परंतु तो त्यांचा सवंगडीसुद्धा होता. म्हणूनच गोकुळातील सामान्य गोपाळ त्याच्यासाठी जीव द्यायला तयार होते; अर्जुन त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो; द्रौपदी त्याला सखा मानते आणि सुदामा राजवैभवाच्या दरवाजात उभा राहिल्यावर द्वारकाधीश त्याला मिठी मारण्यासाठी धावतो. कृष्णाच्या मैत्रीत सामाजिक दर्जा आड येत नाही. सुदामा गरीब झाला, म्हणून मैत्री संपत नाही आणि अर्जुन संकटात सापडला, म्हणून त्याला तो एकटा सोडत नाही. आज समाजमाध्यमांवर हजारो ’फ्रेंड्स’ असूनही, संकटात बोलण्यासाठी एक माणूस नसलेल्या पिढीला मैत्री कशी विकसित करावी आणि आयुष्यभर जपावी, याचा आदर्श कृष्ण चरित्र शिकवते.
 
पुढे कृष्ण मथुरेला जाऊन, कंसवध करतो. पण स्वतः राजा होत नाही. उग्रसेनालाच पुन्हा सिंहासनावर बसवतो. नेतृत्व म्हणजे, प्रत्येक विजयाचे पद स्वतःकडे घेणे नव्हे, हेच तो दाखवतो. पुढे जरासंधाच्या वारंवार आक्रमणांमुळे यादवांचे नुकसान होणार, हे लक्षात आल्यावर तो मथुरा सोडून द्वारकेकडे जाण्याचा निर्णय घेतो. शत्रूच्या भाषेत त्याला ‘रणछोड’ म्हटले गेले; पण रणनीतीच्या भाषेत हा strategic retreat होता. प्रत्येक लढाई अहंकारासाठी लढायची नसते. कधी मागे हटून आपली शक्ती वाचवणे, हा पराभव नसून पुढच्या विजयाची तयारीच असते. करिअर किंवा व्यवसायातील एका अपयशाला आयुष्याचा पराभव समजणार्‍या तरुणांनी, हा कृष्ण समजून घेण्याचीच आज अधिक गरज आहे.
 
महाभारतात तर कृष्णाचा ‘व्यवस्थापन गुरू’ म्हणून सर्वोच्च अविष्कार दिसतो. त्याच्याकडे स्वतःची नारायणी सेना आहे. एका बाजूला ती संपूर्ण सेना आणि दुसर्‍या बाजूला शस्त्र न उचलणारा एकटा कृष्ण, असा पर्याय दिला जातो. दुर्योधन सैन्य निवडतो; अर्जुन कृष्णाला निवडतो. हाच व्यवस्थापनाचा मूलभूत धडा. संसाधनांपेक्षा योग्य दिशा देणारा मेंदू कधीकधी अधिक महत्त्वाचा असतो. मोठा संघ, पैसा, तंत्रज्ञान आणि सत्ता असूनही दिशा चुकीची असेल, तर पराभव होतो; मर्यादित साधने असून योग्य नेतृत्व असेल, तर विजय शक्य होतो.
 
कृष्णाला युद्ध नको होते. पण, अन्याय सहन करावा, असेही त्याचे म्हणणे नव्हते. पण युद्ध अटळ दिसत असतानाही त्याने शेवटपर्यंत शांततेचाच मार्ग शोधला. "पांडवांना त्यांचा पूर्ण अधिकार मिळत नसेल, तर पाच गावे द्या,” एवढ्यापर्यंत तडजोडीची तयारी त्याने दाखवली. स्वतः शांतिदूत म्हणून हस्तिनापुरात गेला, याचा अर्थ दुर्बलता नव्हे. चांगला नेता युद्ध करण्याची क्षमता ठेवतोच; पण युद्ध टाळण्याची प्रत्येक शक्यता आधी वापरतो. संवाद संपल्यानंतरच संघर्षाचा पर्याय असतो.
 
जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुन खचला, तेव्हा कृष्णाची सर्वांत मोठी भूमिका सुरू झाली. अर्जुनासमोरही एक प्रकारचे मानसिक संकटच होते. समोर आप्तस्वकीय पाहून त्याचे हात थरथरले, गांडीव खाली पडले आणि ‘मी लढणार नाही’ अशी मनोवस्था झाली. कृष्णाने त्याची खिल्ली उडवली नाही; त्याला सोडूनही दिले नाही. त्याने अर्जुनाला परिस्थितीकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली. कर्तव्य समजावले, कर्मयोग सांगितला, परिणामाच्या भयापेक्षा योग्य कर्मावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. भगवद्गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा संदेश, आजच्या तरुणांसाठीही विलक्षण महत्त्वाचा आहे. प्रयत्न आपल्या हातात आहे; प्रत्येक परिणाम आपल्या हातात नसतो. निकालाच्या भीतीने प्रयत्नच सोडणे, हा पर्याय नाही.
 
कृष्णाच्या नेतृत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याने सामान्य माणसांच्या असामान्य क्षमतांना ओळखले. कोणत्या प्रसंगी भीम उपयोगी पडेल, कुठे अर्जुनाची आवश्यकता आहे, युधिष्ठिराची शक्ती काय, सहदेव-नकुलाची भूमिका काय, याचे त्याला पूर्ण आकलान होते. नेता प्रत्येक काम स्वतः करणारा ‘सुपरमॅन’ नसतो. योग्य माणसाला योग्य वेळी योग्य काम देऊन, त्याच्याकडून सर्वोत्तम करून घेणारा माणूस, म्हणजेच नेता! आजच्या corporate management मध्ये यालाच delegation, resource optimisation आणिteam management म्हटले जाते.
 
श्रीकृष्णाचे आयुष्य आपल्याला आणखी एक फार मोठा धडा देते, तो म्हणजे जीवनाला अतिगंभीर करू नका! युद्धभूमीवर गीता सांगणारा कृष्ण आणि गोकुळात बासरी वाजवणारा कृष्ण एकच आहे. जबाबदारी आणि आनंद हे परस्परविरोधी नाहीत. कर्तव्य करताना हसता येते, संकटातही मित्र जोडता येतात, पराभवातून नवी रणनीती आखता येते आणि आयुष्य कितीही कठीण झाले, तरी त्यातील आनंद संपवण्याची गरज नसते.
 
आजच्या तरुण पिढीने म्हणून जन्माष्टमीला कृष्णाच्या मूर्तीपुढे फुले वाहताना, दहीहंडी फोडताना कृष्णाच्या जीवनातील काही गुण स्वतःमध्ये आणण्याचा संकल्प करावा. अपयश आले, तर पुन्हा उभे राहणे; संकट आले, तर घाबरून न जाता उपाय शोधणे; यश मिळाले तर त्याचे श्रेय सर्वांसोबत वाटणे; मित्र संकटात असताना त्याच्यामागे उभे राहणे, संघर्षापूर्वी संवादाची संपूर्ण संधी वापरणे आणि आपल्या नियंत्रणाबाहेरच्या परिणामाची चिंता करण्याऐवजी, आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे, हेच ‘कृष्ण मॅनेजमेंट’ आहे.
 
जन्म कारागृहात झाला, म्हणून कृष्णाने नियतीला दोष दिला नाही. बालपण संकटांत गेले, म्हणून आनंद सोडला नाही. वारंवार युद्धे आली, म्हणून मुत्सद्देगिरी सोडली नाही. सत्ता मिळवण्याची संधी आली, म्हणून प्रत्येक सिंहासन स्वतःसाठी घेतले नाही आणि कुरुक्षेत्र समोर आले, म्हणून कर्तव्यापासून पळ काढला नाही. म्हणूनच, कृष्ण जगण्याची कला शिकवणारा गुरू आहे. आयुष्यात तुमच्या वाट्याला कोणते कुरुक्षेत्र येईल, हे तुम्ही ठरवू शकत नाही; पण त्या कुरुक्षेत्रात गांडीव खाली ठेवायचे की कृष्णाने दाखवलेल्या सकारात्मकतेने, मैत्रीने, संघभावनेने आणि कर्मयोगाने उभे राहायचे, हा निर्णय मात्र तुमचा असतो. जन्माष्टमी साजरी करताना हे तत्त्व आत्मसात करणे आवश्यक आहे.
 
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज




संबंधित मजकूर