आलिशान व्यायामशाळा आणि काही तंदुरुस्त जीवनशैलीमुळे लोकप्रिय असणार्या ‘प्रोटीन्स’चा आता प्रत्येक घराच्या किराणामालाच्या यादीत समावेश होऊ लागला आहे. पूर्वी केवळ एका छताखाली विकले जाणारे प्रोटीन्स आणि प्रोटीन्सयुक्त पदार्थ आता सहज घरपोच उपलब्ध होऊ लागल्याने त्याचा भडिमार ग्राहकांवर केला जात असताना, त्याचा अतिरेक तर नाही ना? त्याबद्दलचे हे आकलन...
‘प्रोटीन्स’ हा शब्द जरी समाज माध्यमांतून व्यवहारात आला असला, तरीही पूर्वापार पाठ्यपुस्तकात ‘प्रथिने’ असा सोपा शब्द अस्तित्वात होताच. मात्र, शाळेतील वाचलेले विस्मृतीत जाण्याची आणि नवा ट्रेंड काय तो आत्मसात करण्याची आपल्या सर्वांचीच सवय बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हेरत, आपल्या ताटात नेमके किती ‘प्रोटीन’ बसते, हे सांगण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा पायंडा मुळातच ‘जेन-झी’ने पाडला असला, तरीही त्याचा अनुनय आता त्यांच्या वडीलधार्यांनीही करण्यास सुरुवात केली आहे. एका संशोधनानुसार, ‘जेन-झी’ आपल्या आहार पद्धतींबद्दल विशेष संवेदनशील आहेतच. शिवाय, प्रोटीनचे प्रमाण किती असावे, याबद्दलही त्यांच्यात सजगता दिसून येते.
‘मिलेनियल्स’ने केवळ व्यायामशाळेपुरता (जिम) मर्यादित ठेवलेला विषय, ‘जेन-झीं’नी स्वयंपाकघरापर्यंत नेला आहे. याचा फायदा ‘क्वीक कॉमर्स’ उद्योगांनी घेतला असून, उत्पादन विक्रीच्या वेळी प्रथिनांच्या उपलब्धतेचा तक्ताच, किमतीसोबत उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. २०२४ ते २०२५ पर्यंत ‘प्रोटीन्स’चे पर्याय २३० टक्क्यांनी वाढल्याचे निष्पन्न झाले. ‘कन्झ्युमर इंटेलिजन्स फर्म’ आणि ‘एनआययू’ यांच्या अनुसार, ३७ टक्के भारतीय पुढील वर्षभरात केवळ आपल्या ताटात प्रोटीनयुक्त अन्नच सामाविष्ट करतील. त्यामुळे, भविष्यात दूध, दही, पनीर, स्नॅस आणि अन्य खाद्यपदार्थांच्या जाहिरातींचाही, असाच प्रचार केला जाणार आहे.
अशा जाहिरातींच्या दबावात येऊन, ग्राहकही दामदुप्पट किमतीला या वस्तू विकत घेण्यास बळी पडत असल्याचेही दिसून येत आहे. नियमित व्यायाम करणारे आणि आपल्या आरोग्याबद्दल सजग असणारे ४० टक्के जण, या ‘प्रोटीन’युक्त पदार्थांच्या यादीकडे वळत असल्याचेही निष्पन्न झाले. बाजारात ‘हाय-प्रोटीन’ आणि सर्वसामान्य उत्पादनांच्या किमतीत, भरपूर तफावत दिसते. त्यातील प्रथिनांचे प्रमाण आणि अन्य सत्त्वांचे प्रमाण, हे समसमान असतीलच असे नाही. याशिवाय, कुठल्याही खाद्यपदार्थांतील प्रथिनांची गुणवत्ता सर्वोत्तम असेल असा दावा मात्र, कुठलाच ‘ब्रॅण्ड’ करताना दिसत नाही.
‘क्विक कॉमर्स’द्वारे आता किराणा मालासोबतच, प्रथिनयुक्त आहारही घरोघरी पोहोचू लागले आहेत. आता लोक ‘ग्रीक योगर्ट’ आणि ‘प्रोटीन बार’सारख्या गोष्टी चवीसाठी नव्हे; तर आरोग्यासाठी लाभदायक म्हणून खातात. त्यातच ‘वीगन’ म्हणजे ज्यात दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार, ‘व्हे प्रोटीन’सारख्या गोष्टी ‘वर्ज्य’ असतील, अशा ‘प्रोटीन्स’ची मागणीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी तर ‘प्रोटीन्स’च्या ‘प्रॉडट पॅकेजिंग’वर, ‘हाय प्रोटीन्स’ असा ठप्पा लावूनच विक्री सुरू आहे. त्यातही काही कंपन्या ‘प्रोटीन्स’ विक्रीत, ‘मिलेट्स’, डाळी आणि कडधान्यांच्या घटकांचा अंतर्भाव असल्याचीही जाहिरात करत आहेत.
अशा जाहिरातींच्या जंजाळात फसून जाण्यापेक्षा, आहारतज्ज्ञांकडूनच पारंपरिक खाद्यपदार्थांचा आपल्या जेवणाच्या थाळीत सामावेश करुन घेणे केव्हाही सोयीचेच. अशा ‘प्रोटीन्स’वर पैसे वाया घालविण्यापेक्षा, भारतीय आहारातील डाळी, कडधान्ये, दही, पनीर, अंडी, मासे, सोयाबीन, सुकामेवा हेच पूर्वापार आपल्या आहारांतील प्रथिनांचा स्रोत होते. ‘आयसीएमआर-एनआयए डायटरी’ मार्गदर्शक प्रणाली २०२४ नुसार, प्रतिव्यक्ती त्याच्या वजनाच्या निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी ०.८३ ग्राम प्रतिकिलो इतक्या ‘प्रोटीन’ची गरज आहे. म्हणजेच ६५ किलो वजनाच्या व्यक्तीसाठी, ‘आरडीए’ ५४ ग्रॅम प्रथिने/दिवस इतकीच गरज आहे. म्हणजेच, रोजच्या ऊर्जेपैकी साधारण १०-१५ टक्के ऊर्जा प्रथिनांद्वारे मिळावी, अशीच अपेक्षा आहे.
हा आकडा मुले, किशोरवयीन, गर्भवती महिला किंवा स्तनदा मातांसाठी सरसकट लागू होत नाही; त्यांच्या प्रोटीनच्या गरजा वेगळ्या असतात. या संस्थेच्या मते, स्वतंत्र प्रोटीन घेण्याची गरजच नाही, केवळ संतुलित आहार आणि दैनंदिन आहारच त्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे केवळ एकाच प्रकारचा आहार घेण्याऐवजी, विविध पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
‘प्रोटीनचा ट्रेंड’ नेमका कुठून आला? तर ‘जेन-झी’ आणि ‘फिटनेस कल्चर’, सोशल मीडिया ‘इन्फ्लूएन्सर्स’, आरोग्यदायी जीवनशैलीची वाढती मागणी, मिनिटांत घरपोच सेवा देणार्या सेवांमुळे, उत्पादने सहज उपलब्ध होतात. प्रोटीनच शरीराला ताकद पुरवते अशी झालेली भावना, यातूनच या ट्रेंडची चलती आली. यातून उभी राहिली एक मोठी बाजारपेठ. आता त्यात विपणन आणि वितरणाच्या सुरू असलेल्या गळेकापू स्पर्धेत, आरोग्यदायी आहारच आपल्या ताटातून बाहेर गेला.
भारतीय पारंपरिक जेवणात डाळी, उसळ, कडधान्ये, दूध-दही-पनीर, अंडी-मांस, सोयाबीन, शेंगदाणे, बिया आदी पूर्वापार उपलब्ध आहेत. रोजचा सकस आहार घेतला, तर अन्य हाय प्रोटीन पुरवणीची गरजच काय असणार? हा सवाल उपलब्ध होतो.
तेव्हा यापुढे फक्त ‘हाय प्रोटीन’ अशी ठळक ठसठशीत केलेली जाहिरात पाहून, खरेदी करणे सुजाण ग्राहकांनी टाळले पाहिजे. त्याऐवजी प्रोटीन किती ग्रॅम? संपूर्ण पाकिटातील प्रमाण किती? साखरेचे प्रमाण किती? कॅलरीज् किती? इतर घटक कोणते? प्रति १० ग्रॅम प्रोटीन किती? दोन उत्पादनांची तुलना केल्यास, कोणते प्रमाण योग्य? असे प्रश्न ग्राहकांना पडणेही गरजेचे आहे. हे प्रश्न विचारून झाल्यानंतर आपल्याला खरेच इतक्या वाढीव प्रोटीन्सची गरज आहे का? असा सवालही स्व:ताला विचारणे गरजेचे आहे. आपण प्रोटीन विकत घेत आहोत की, सोशल मीडियाद्वारे विकल्या जाणार्या भावना? हा प्रश्नही प्रत्येकाला पडणे गरजेचे आहे.