पांडवांचा वनवास आणि एक वर्षांचा अज्ञातवास अशाकरिताच, दुर्योधनाकडून रचला गेला. ‘द्यू’ म्हणजे भ्रमात्मक अवस्था आणि ‘द्यूत’ म्हणजे मायेचा खेळ. धर्मराज मायेचा खेळ दुर्योधनाशी खेळतो आणि आपले पंचप्राणरूपी पाच गावे, स्वतःसकट पाच वृत्तीरूप बंधू आणि शेवटी कायावृत्ती द्रौपदीही पणात गमावतो. पूर्ववत् पांडव होण्याकरिता त्यांना वनात जाऊन प्रभू श्रीरामांप्रमाणे तापसी जीवन जगावे लागते. यामुळे त्यांची पूर्वीची पुण्यावस्था प्राप्त होते. यालाच व्यास १२ वर्षांचा वनवास म्हणतात. त्या काळात तपाकरिता १२ वर्षांचा काळ मान्य होता. म्हणून पांडवांचा वनवासही १२ वर्षांचा आहे. तपस्येनंतर शक्ती येते. त्या शक्तीचा गर्व होऊन साधक जगासमोर सामर्थ्याचे प्रदर्शन करू इच्छितो. यातच त्याचे अधःपतन होऊन तो वाया जातो. म्हणूनच तपस्या कालानंतर खर्या साधकाने कोणासमोर आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन न करता, अज्ञात राहिले पाहिजे. १२ वर्षे वनवास झाल्यावर एक वर्षाचा त्याचा अज्ञातवास म्हणजे, खर्या साधकाचे गर्वविरहित अज्ञात वागणे होय.
अज्ञात राहायचे असल्यास एखाद्या संन्याशाप्रमाणे साधकाला आपले नाव-गाव व जीवनाचा उद्योग बदलावा लागतो. म्हणूनच विराट नगरीत गेल्यावर, सर्व पांडवांनी आपापली नावे व पूर्वउद्योग बदलून नवीन नावे व उद्योग स्वीकारल्याचे दाखविले आहे. साधना परिपूर्ण झाल्यावर साधकाचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मशक्ती पूर्वीपेक्षा अगदी नवीन, म्हणजेच ‘उन्नत’ बनते. अशा नूतन अवस्थेलाच पूर्वीची नावे आणि गुण ठेवणे योग्य नसते. एखाद्या तांब्याच्या तुकड्याचे सोने केल्यावर, त्याला पूर्वीचे तांबे समजून नामाभिधान करता येणार नाही. त्या नूतनीकरण झालेल्या तुकड्याला सोनेच म्हणावे लागेल. तद्वत् तपस्यापूत तन, मन आणि बुद्धीचे समूळ परिवर्तन म्हणजेच नवीन जन्म होय. द्विजावस्था आल्यावर त्या साधकावस्थेचे जुने नाव बदलून, नवीन उन्नत अवस्थांना धरून नवीन नाव ठेवणे आवश्यक असते. संन्यासी आपला पूर्वीचा धर्म बदलून सर्व धर्माच्या वर जातो, म्हणजेच व्रात्य बनतो; म्हणूनच संन्यास घेणारा आपले पूर्वीचे नाव बदलून संन्यास धर्माला धरूनच असलेले आनंद, पुरी, सरस्वती अथवा गिरी अशा विशेषणांनी युक्त असे नवीन नाव ठेवतो. १२ वर्षांच्या तपस्यापूर्ण वनवासानंतर, पांडव आपल्या नवीन पिंडरूप विराट नगरीत जाण्यापूर्वी आपले पूर्वीचे व्यवसाय, छंद व नावे बदलतात. यावरूनच व्यासांची सूक्ष्म दृष्टी लक्षात येते.
धर्म आपले नाव ‘कंक’ ठेवतात. वेदात ‘कंकतो कंकः’ नावाची ऋचा आहे. त्यात कंकाचा आशय ‘पूर्णत्व’ असा आहे. धर्मराजाचे ‘कंक’ नाव, धर्मराजाची हीच कंक अवस्था दाखवते. भीम आपला मल्लाचा व्यवसाय सोडून, पाकसिद्धी करणारे वल्लभ होतात. मूळ ‘वल’ शब्दापासूनच ‘वलय’, ‘वल्लभ’ आणि ‘वल्ली’ हे शब्द झाले आहेत. ‘वल’ म्हणजे पुढे सरकणे अथवा प्रगती करणे. ‘वल्ली’सारखी वाढतच जाते, म्हणजे पुढे सरकते तद्वत् ‘वल्लभ’ म्हणजे पुढे सरकणार्या गतिमान जीवनाचा स्वामी होय. अर्जुनाने आपले नाव ‘बृहन्नडा’ म्हणजे ‘बृहत् + नडा’ असे ठेवून, तो दुनियादारीच्या व्यवहारात आपला पिता पंडुसारखा षंढ झाला. पूर्वीच्या सर्व नाड्या आता निष्काम बनून जो काम, ईर्षेच्याही वर गेला आहे. वीर अर्जुन अज्ञातवासात षंढ बृहन्नडा होतो; परंतु उत्तर गोग्रहण प्रसंगी तो आपला आध्यात्मिक पराक्रम व शौर्य पुनः जगाला दाखवू शकतो. द्रौपदी ‘सहरंध्री’ म्हणजे पूर्वीच्या बद्ध शरीरापेक्षा, पारदर्शक रंध्र्यासह शरीर असलेली ‘सैरंध्री’ होते आणि पूर्वीचा राणीपणाचा तोरा त्यागून, आता विराटाच्या राणीची दासी होते. तपस्यापूर्ण साधकही तपस्येनंतर नम्र होत असतो.
नकुल आणि सहदेव असेच नम्र होऊन, विराट नगरीत राहतात. एका वर्षाच्या अज्ञातवासात जर कौरवांना पांडव ओळखता आले, तर पुनः त्यांना १२ वर्षे वनवास म्हणजेच तपस्या आणि एक वर्ष अज्ञातवासाची द्यूताची अट होती आणि खरेच आहे. १२ वर्षे तपस्या केल्यानंतरही ज्या साधकाचा पूर्वीचा तोरा आणि अहंकार राहात असेल, तर त्याला पुन्हा १२ वर्षे तपस्या आणि एक वर्ष निरहंकारी जीवन जगणारा अज्ञातवास करणे आवश्यक नाही काय? पांडवांना आपल्या विराट नगरीत, त्यांच्या ऐन आपत्तीच्या काळात साथ देणारा विराट राजा आता वृत्तीरूप महाभारत युद्धात त्यांना साथ देणार नाही काय?
उत्तर गोग्रहण, उत्तर आणि उत्तरा
पांडव अज्ञातवासात असतानाच दुर्योधनाला गुप्त बातमी समजली की, पांडव विराटाच्या विराट नगरीत नावे बदलून सेवेत आहेत. पांडवांना ओळखून त्यांना पुन्हा १२ वर्षे वनवास घडविण्याच्या हेतूने, स्वतःच्या चांगल्या वृत्तींशी वाईट तर्हेने युद्ध करणार्या दुर्योधनाने विराट नगरीवर हल्ला करून विराटाच्या गायी पळविण्याचा घाट रचला. तसे करताना धन्याचे रक्षण करण्याकरिता, प्रामाणिक पांडव युद्ध करण्यास येणारच, तेव्हा त्यांना त्यावेळी ओळखून परत १२ वर्षे वनवास व आणखी एक वर्ष अज्ञातवास घडविण्याचा दुष्ट हेतू धरूनच, उत्तर गोग्रहणाचा डाव दुर्योधनाने रचला होता. आपल्या पक्षातील भीष्म, कर्ण, कृप, द्रोण, त्रिवर्ग आदी वीरांना घेऊन, दुर्योधन विराट नगरीवर चाल करून आला आणि कार्य कोणते, तर विराटाच्या गायी पळविण्याचे? त्या काळात भारतात घरोघरी इतया गायी होत्या की, दुसर्याच्या राज्यात जाऊन त्यांच्या गायी पळवून आणण्याचे कारणच नव्हते. एखाद्या पाटलाच्या घरीच खंडोगणती गायी असत, तर राजा असणार्या दुर्योधनाच्या मालकीच्या काय कमी गायी असतील? मग असे असताना, दुर्योधनाने विराटाच्या गायी पळविण्याकरिता युद्धासारखे अती खर्चिक शस्त्र उपसावे, हे योग्य होते काय? आणि शेजारच्या राज्याशी मैत्रीचे संबंध ठेवण्याऐवजी, केवळ गायींचे हरण करण्याकरिता दुर्योधनासारख्या धुरंधर राजाने विराट नगरीवर हल्ला करावा, हे कोणत्याच राजनीतीत बसतच नाही. यावरून उत्तर गोग्रहणाचा व्यास अर्थ अन्य आध्यात्मिक असला पाहिजे, हे उघड आहे. ‘गो’ म्हणजे इंद्रिये आणि ‘ग्रहण’ म्हणजे ओढून नेणे होय. गीतेत असल्या उत्तर गोग्रहणाची कल्पना, दुसर्या अध्यायातील ६० व्या श्लोकात दिली आहे.
‘यततो हापि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः|
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः’॥
अध्यात्मात अग्रेसर म्हणजेच अध्यात्मातील उच्च उत्तर अवस्थेत असणार्या साधकांचे मनसुद्धा, त्याची प्रबल इंद्रिये हरण करीत असतात. व्यासांच्या भाषेत विराटाच्या नगरीवर हल्ला करून, पांडव साधकाच्या साधना कालातील उत्तर अवस्थेतील गोरूप इंद्रियांचे हरण करणे होय.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७