बापट, एवढा तर्कदुष्टपणा बरा नव्हे!

    03-Sep-2026
Ganeshotsav DJ Ban Debate
 
 
गणेशोत्सवातील डीजेबंदीची मागणी रास्त असली, तरी त्यासाठी पुण्याच्या विद्यानंद बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून चालवलेला तर्कदुष्टपणा हा बरा नव्हेच! त्यातच त्यांना काल झालेल्या मारहाणीचा प्रकार हा सर्वस्वी चुकीचा असून, निषेधार्हच! पण, यानिमित्ताने हे समजून घ्यायला हवे की, समाजसुधारणा या पोलिसांच्या किंवा कायद्याच्या बडग्याने होत नाहीत. ही समाजातील एक आंतरिक प्रक्रिया असते, ती समजून घ्यावी लागते व ती पूर्ण होण्यासाठीचा वेळही द्यावा लागतो.
 
निवृत्त चाकरांचे बघ काय हाल झाले,
काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले...
 
अशोक नायगावकरांची ही खट्याळ कविता अशा गंभीर परिस्थितीत आठवण्याचे कारण म्हणजे, डीजेसारख्या गंभीर विषयावर विद्यानंद बापट व संतोष पंडित नावाच्या दोन इसमांनी पुण्यात घातलेला धुमाकूळ! पुण्यातले ढोल-ताशे, डीजे, गणेशोत्सवाच्या रेंगाळलेल्या मिरवणुका हा गेली अनेक वर्षे चिंतेचा व चर्चेचा विषय झाला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ डीजेचा समर्थक नाही, हे आम्ही अग्रलेखाच्या प्रारंभीच स्पष्ट करू इच्छितो. मात्र, कायद्याच्या बडग्याने किंवा न्यायालयाच्या धाकाने सामाजिक सुधार घडून येतात, असे मानणारे आम्ही नाही. आमच्या या म्हणण्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात डीजेबाबतचा निर्णय पुणेकरांच्या विवेकावर सोडला होता. विद्यानंद बापट नावाच्या स्वत:ला ‘निधर्मी’, ‘साम्यवादी’ म्हणून अभिमानाने म्हणविणार्‍या व्यक्तीने रटाळ टीव्ही चॅनेलची मोकळी जागा व्यापून या विषयावर एक चर्चा घडवून आणली. बापट ज्याप्रकारे विषय मांडतात, त्यातून टीव्ही चॅनेलच्या गंडलेल्या ‘टीआरपी’ला एक नवा ‘हिरो’ सापडला. जोवर हा मुद्दा डीजेच्या बाबतचा होता, तोवर ते ठीकच होते.
 
कारण, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने केवळ ध्वनिप्रदूषणच होते असे नाही, तर अगदी बहिरेपणाची समस्याही उद्भवते. लहान मुलांपासून ते अगदी आबालवृद्धांच्या, रुग्णांच्या आरोग्यावरही डीजेच्या असहनीय आवाजाचे दुष्परिणाम वारंवार समोर आले आहेत. म्हणूनच, गणेशोत्सव असेल किंवा अन्य सण-उत्सवांत, मिरवणुकांमध्ये डीजेवर बंदी हवी, ही मागणी मागील काही वर्षांपासून सातत्याने होताना दिसते. ती मुळात चुकीचे मानण्याचे काही कारणच नाही. मात्र, हीच मागणी करणार्‍या बापटांना हळूहळू जसजशी यानिमित्ताने प्रसिद्धी मिळायला लागली, तसे ते त्यांच्या मूळ रूपात यायला लागले. डावे, शहरी नक्षल या सगळ्या मंडळींना सणवारांतल्या सुधारणांपेक्षा परंपरा बंद पाडण्यातच जास्त रस असतो. ईद, मोहरम, मशिदींवरील भोंगे, पशुबळी अशा मुद्द्यांवर चिकित्सा, प्रबोधन, आंदोलन असे काहीही करण्याची या मंडळींची इच्छा नसते. पर्यावरणीय लढे हे तर यांचे खास ‘होमग्राऊंड’च! तिथेही पर्यावरणीय समस्या सोडविण्यापेक्षा प्रकल्प बंद पाडण्यातच यांना रस असतो. पण, मुळात डीजेचेच काय, तर कुठल्याही कर्कश वाद्यवादनाचे समर्थन कुणीही करू शकत नाही.
 
मात्र, सामाजिक सुधार जर आपल्याला हवे असतील, तर समाजसुधारणेची स्वत:ची एक प्रक्रिया आहे, ती समजून घ्यावी लागते व ती पूर्ण होण्यासाठीचा वेळही द्यावा लागतो. यातील अनेक वाईट परंपरा बंद होतात, मर्यादित होतात, कधी त्या पुन्हा सुरू होतात व पुन्हा बंदही होत जातात. ढोबळमानाने बदलत्या काळानुसार अशा विकृती दूर होण्याची एक आंतरिक प्रक्रिया हिंदू समाजात सतत चालू असतेच. हिंदू समाजाने स्वत:मध्ये असलेल्या अनेक विकृत परंपरा कधीच मागे सोडल्या आहेत. यात सतीची परंपरा, विधवांचे पुनर्विवाह, केशवपन, स्पृश्यास्पृश्य भेद, स्त्रीशिक्षण, उपचारांपेक्षा अंगारे-धुपारे, पशुबळी या त्यांपैकी काही. मात्र, या बदलांमध्ये समाजसुधारकांनी तितकेच कष्ट घेतले, समाजाचा विरोध सहन केला, अपमान सहन केले, प्रसंगी मारही खाल्ला. परंतु, ते आपल्या मार्गापासून ढळले नाहीत. यात राजा राममोहन रॉय होते, धोंडो केशव कर्वे होते, जोतिबा व सावित्रीबाई फुले होत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या सगळ्यांनीही प्रबोधनपर लिखाण केले. मात्र, समाजसुधारणा करीत असताना आपण किती विद्वान आहोत आणि आपण कोणत्या विचारसरणीला मानतो, याच्या टिमक्या कुणीही नाचवल्या नाहीत. यातल्या अनेक सुधारणांच्या प्रक्रियांनी नंतर कायद्याचे स्वरूप प्राप्त केलेदेखील. मात्र, त्या कायद्यामुळे या समस्यांमध्ये सुधारणा झाल्या नव्हत्या, तर समाजसुधारकांच्या प्रयत्नांतून त्या झाल्या होत्या. गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची गणेशमूर्ती हा सर्वच घरांमधला रूढ प्रकार होता. आज प्रबोधनामुळे किमान ३५ ते ४० टक्के मंडळी शाडूच्या गणेशमूर्तींसाठी आग्रही दिसतात. हिंदू समाजाचा हाच सुधारणावादी स्वभाव लक्षात घेता, हा टक्का भविष्यात १०० टक्क्यांवर गेला, तरीही आश्चर्य मानावे लागू नये. मात्र, या बदलासाठी कुणी पुण्यातून ‘चमकोगिरी’ केली नव्हती. आजच्या काळात सोशल मीडियावर असणे चांगले. परंतु, त्याचा अतिरेक झाला की, तिथेही सुधारणांची गरज भासू लागावी, अशी स्थिती सध्या दिसते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर पुण्यातील संतोष पंडित नावाच्या इन्फ्ल्युएन्सरने फडणवीसांनी कसे फसविले आहे, याची विकटहास्य करीत रीलही बनविली होती. याउलट, फडणवीसांच्या आवाहनानंतर पुण्यातल्या अनेक मंडळांनी डीजे वाजविणार नसल्याची ग्वाही दिली. दुसरीकडे नागपुरातही मिरवणुकीत वापरल्या जाणार्‍या डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टमवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पोलिसांकडून कालच जाहीर करण्यात आला. ही बंदी दि. ३ सप्टेंबर मध्यरात्री १२ वाजेपासून ते दि. १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या निर्णयामुळे सण-उत्सवकाळात डीजेच्या दणदणाटाला निश्चितच आळा बसणार आहे. आता इथला मजेशीर विरोधाभास असा की, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मंडळे किंवा लोक प्रतिसाद देतात; पण बापट मात्र टीव्ही चॅनेलवर आदळआपट करीत असतात.
 
(ता. क. - हा अग्रलेख लिहून होईपर्यंत विद्यानंद बापट यांना कुणीतरी जोरदार चापट मारली होती. हा प्रकार सर्वस्वी चुकीचा असून, निषेधार्हच आहे. त्यांच्या समर्थनार्थ लगेचच सर्वच विषयांत मते असणारे असीम सरोदेही प्रकट झाले. आता सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे वगैरे जुने-नवे पुरोगामीसुद्धा यात उतरतील, यात शंका नाही. बापटांची तुलना दाभोलकरांशी करण्याची शक्यताही नाकारता येत नाही!)




संबंधित मजकूर